सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अमली पदार्थांच्या मागणीत कपात करण्यासाठीचा राष्ट्रीय कृती आराखडा NAPDDR याअंतर्गत देखरेख आणि संस्थात्मक समन्वय बळकट करण्यासाठी 'नशामुक्त भारत अभियान' 2.0 ॲपचा शुभारंभ
Posted On:
25 APR 2026 12:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2026
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाद्वारे, अंमली पदार्थांच्या व्यसनासंदर्भात अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखल्या गेलेल्या 272 जिल्ह्यांमध्ये 'नशामुक्त भारत अभियान' (NMBA) 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू करण्यात आले होते. तर, 15 ऑगस्ट 2023 पासून या अभियानाचा विस्तार देशातील सर्व जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला आहे. जनसामान्यांपर्यंत पोहोचून अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जनजागृती करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
आतापर्यंत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभरातील 26 कोटींहून अधिक लोकांना अंमली पदार्थांच्या सेवनाबाबत जागृत करण्यात आले आहे, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांसह विविध स्तरांवर आयोजित 8.3 लाखांहून अधिक कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये 9.5 कोटींहून अधिक तरुण, 6.47 कोटींहून अधिक महिला आणि 28,000 हून अधिक 'नशा मुक्ती मित्र' (पूर्वीचे 'मास्टर व्हॉलंटियर्स') यांचा समावेश आहे.
'अमली पदार्थांच्या मागणीत कपातीसाठीचा राष्ट्रीय कृती आराखडा' (NAPDDR) अंतर्गत देखरेख आणि अंमलबजावणी यंत्रणेला बळकट करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंजाबचे राज्यपाल आणि चंडीगढचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी 24 एप्रिल 2026 रोजी चंडीगढ येथे आयोजित चिंतन शिबिराच्या उद्घाटन सत्रात, अद्ययावत 'नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 2.0' ॲपचा शुभारंभ केला. हे सुधारित ॲप्लिकेशन राज्ये, जिल्हे आणि इतर संबंधित भागधारकांसाठी मध्यवर्ती डिजिटल टूल म्हणून विकसित करण्यात आले आहे. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि संस्थात्मक स्तरांवर अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमध्ये वास्तविक वेळी रिपोर्टिंग करणे, देखरेख आणि समन्वय साधण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा यामागचा उद्देश आहे. या अद्ययावत आवृत्तीमध्ये सद्य क्षमतांचा अधिक विकास करण्यात आला असून, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि माहितीवर आधारित प्रशासन यांना चालना देणारी नवीन वैशिष्ट्येही यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
हे ॲप सध्या अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि राज्ये, जिल्हे, आध्यात्मिक संस्था, तसेच इतर हितधारकांना नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उपक्रम अपलोड करण्यात आणि त्यांचा मागोवा घेण्यात मदत करते. हे ॲप जवळपास वास्तविक वेळेच्या दृश्यमानतेसह एकत्रित डॅशबोर्डवर काम करते. जनजागृतीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी नशामुक्ती मित्रांना माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) साहित्य, तसेच मूलभूत संवाद साहाय्य पुरवून हे ॲप संसाधनाचे व्यासपीठ म्हणूनही काम करते. या ॲपमध्ये प्रमुख स्वयंसेवकांना (नशामुक्ती मित्र) सामील करून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सुलभ प्रणाली आहे. याव्यतिरिक्त, हे ॲप व्यसनमुक्ती हेल्पलाइन आणि मानस (MANAS) हेल्पलाइन यांसारख्या प्रमुख हेल्पलाइनचे क्रमांक उपलब्ध करून देते. यामध्ये व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य मदत सेवांचा समावेश आहे आणि मूलभूत तांत्रिक साहाय्यासाठी संपर्क क्रमांकही उपलब्ध आहेत.
नशा मुक्त भारत 2.0 ॲपमधील नवीन वैशिष्ट्ये
सद्य वैशिष्ट्यांखेरीज, NMBA 2.0 ॲप बळकटीकरण यंत्रणेमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- आता ई-प्रतिज्ञा घेणे, माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्याची उपलब्धता, हेल्पलाइन साहाय्य आणि व्यसनमुक्ती केंद्राचे तपशील यांसारख्या वैशिष्ट्यांसह नागरिकांसाठी उपलब्ध.
- अनुदानित संस्थांसाठी समर्पित प्रवेश: अनुदानित संस्थांना आता त्याच्या भूमिका- आधारित प्रवेशासह प्लॅटफॉर्मवर सामील केले जाईल, ज्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रांमधील उपक्रमांचे वास्तविक वेळी रिपोर्टिंग आणि निरीक्षण करणे शक्य होईल.
- अनुदानित संस्थांसाठी अनुदानाची वास्तविक स्थिती: ॲपमध्ये DoSJE, राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि अनुदानित संस्थांसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाची स्थिती समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक पारदर्शकता, निधीचा सुव्यवस्थित मागोवा आणि अनुदानाच्या वापरामध्ये वाढलेले उत्तरदायित्व सुनिश्चित होते.
- जवळच्या व्यसनमुक्ती केंद्रांचे वैशिष्ट्य: वापरकर्त्यांना सर्वात जवळचे व्यसनमुक्ती केंद्र मिळण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे जलद आणि सुधारित संदर्भ आणि उपचार सेवा उपलब्ध होतात.
- अभिप्राय यंत्रणा: सातत्याने सुधारणा करत राहण्यासाठी लोकांना अभिप्राय देण्याची सुविधा मिळते.
नशामुक्त भारत अभियान 2.0 ॲप, अमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रयत्नांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डिजिटल माध्यमांच्या मदतीने संस्थात्मक यंत्रणा सशक्त करणे या सरकारच्या वचनबद्धतेवर भर देते.
* * *
नेहा कुलकर्णी/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255481)
अभ्यागत कक्ष : 16