पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री सातत्याने सुरू असून 1 एप्रिलपासून 17.83 लाखांहून अधिक सिलिंडर विकले गेले आहेत


या भागातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित; गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित कोणतीही दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे; भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण यावर मुख्य भर आहे

एकूण विमान वाहतूक परिस्थितीत सुधारणा झाली आहे; 28 फेब्रुवारीपासून या प्रदेशातून सुमारे 12.38 लाख प्रवाशांनी भारतात प्रवास केला आहे

Posted On: 24 APR 2026 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 एप्रिल 2026

 

पश्चिम आशियातील सतत‌‌ बदलत्या परिस्थितीमुळे भारत सरकार नागरिकांना माहिती देण्यासाठी सातत्याने अद्ययावत माहिती देत आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधनाची उपलब्धता

अंमलबजावणी आणि देखरेख कार्यवाही

  • एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात अंमलबजावणीची कारवाई सुरू आहे. काल देशभरात 2300 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
  • सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी अचानक तपासण्या अधिक तीव्र केल्या असून त्या सुरूच ठेवल्या आहेत. तसेच 307 एलपीजी वितरकांवर दंड आकारण्यात आला आहे आणि कालपर्यंत 70 एलपीजी वितरकांना निलंबित करण्यात आले आहे.

एलपीजी पुरवठा

देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती:

  • सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
  • घरगुती वापरासाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
  • एलपीजी वितरक केंद्रांवर पुरवठा खंडित झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
  • काल उद्योग पातळीवर ऑनलाइन एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये 98% वाढ झाली आहे.
  • गैरवापर टाळण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) आधारित डिलिव्हरी सुमारे 94% पर्यंत वाढल्या आहेत. डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त होतो.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:

  • 1 एप्रिल 2026 पासून 17.83 लाखांपेक्षा जास्त - 5 किलो एफटीएल (FTL) सिलिंडरची विक्री झाली आहे.
  • काल देशभरात 81,000 हून अधिक 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री झाली.
  • 3 एप्रिल 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी 5 किलो एफटीएल सिलिंडरसाठी 8500 पेक्षा जास्त जनजागृती शिबिरे आयोजित केली आहेत, ज्यामध्ये 1,33,000 पेक्षा जास्त 5 किलो एफटीएल सिलिंडरची विक्री देखील झाली. 
  • काल 250 हून अधिक शिबिरांमध्ये 5 किलोचे 5549 एफटीएल विकले गेले.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

  • मार्च 2026 पासून सुमारे 5.27 लाख पीएनजी जोडण्यांमार्फत पुरवठा सुरू करण्यात आला असून आणखी 2.60 लाख जोडण्या देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. एकूण जोडण्यांची संख्या 7.87 लाख असून पुढे, सुमारे 5.97 लाख ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.
  • 23 एप्रिल 2026 पर्यंत, 42,000 पेक्षा अधिक पीएनजी ग्राहकांनी मायपीएनजी डॉट इन या संकेतस्थळावर एलपीजी जोडणी बंद करण्यासाठी अर्ज केले आहेत.

कच्च्या तेलाची स्थिती आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे कार्यान्वयन

  • सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्पांकडे कच्च्या तेलाचे पुरेसे साठे उपलब्ध असून प्रकल्प उच्च क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचेही पुरेसे साठे राखून ठेवले जात आहेत.
  • घरगुती वापरासाठी मागणीचा पुरवठा करण्यासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये एलपीजी उत्पादनात वाढ करण्यात आली आहे.
  • 9 एप्रिल 2026 पासून, मुंबई, कोची आणि मथुरा इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांनी रासायनिक आणि औषधनिर्माण उद्योगाला 6400 मेट्रिक टनांहून अधिक प्रोपिलीनची विक्री केली आहे.

सागरी सुरक्षा आणि नौवहन कार्यान्वयन

पर्शियाच्या आखातातील सागरी सद्यस्थितीबाबत बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले,

  • बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचा परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय दूतावासे आणि सागरी भागधारकांसोबत समन्वय कायम असून ते नाविकांचे कल्याण आणि नौवहन अखंड सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील आहे.
  • या प्रदेशातील सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत. गेल्या 24 तासांत भारतीय ध्वज असलेल्या जहाजांशी संबंधित घटनेची नोंद झालेली नाही.
  • नौवहन महासंचालनालयाचा नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत आहे. सक्रिय झाल्यापासून या कक्षाने 7,553 दूरध्वनी कॉल आणि 16,033 पेक्षा अधिक ई-मेल हाताळले आहेत. या आकडेवारीत गेल्या 24 तासांतील 150 कॉल आणि 394 ई-मेलचा समावेश आहे.
  • नौवहन महासंचालनालयाने आतापर्यंत 2,729 पेक्षा अधिक भारतीय नाविकांना मायदेशी सुरक्षित आणण्यासाठी मदत केली आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून परतणाऱ्या 49 जणांचा समावेश आहे.
  • देशभरातील बंदरे सामान्य स्थितीत कार्यरत आहेत. कोणत्याही बंदरात अतिरिक्त गर्दीची नोंद झालेली नाही.

प्रदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षितता

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियाई प्रदेशांतील बदलत्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तिथे निवासी भारतीय समुदायाच्या कल्याण, सुरक्षितता आणि सहाय्याला मंत्रालयाचे प्राधान्य आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

  • परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आखाती आणि पश्चिम आशियाई प्रदेशातील घडामोडींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे, भारतीय समुदायाची सुरक्षितता आणि कल्याणाची खात्री करण्यावर भर देत आहे.
  • माहितीची देवाणघेवाण आणि सहाय्यासाठी मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांसह निकट समन्वय राखून आहे.
  • भारतीय नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी एक समर्पित विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.
  • या प्रदेशातील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास चोवीस तास हेल्पलाईन चालवत आहेत आणि नागरिकांना सक्रिय सहाय्य करत आहेत.
  • दूतावास स्थानिक सरकारांच्या सतत संपर्कात असून सुरक्षा विषयक मार्गदर्शक तत्त्वे, प्रवासाबाबतची अद्ययावत माहिती, दूतावास सेवा आणि कल्याणकारी उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना नियमितपणे जारी करत आहेत.
  • आपले दूतावास भारतीय समुदायाच्या संस्था, व्यावसायिक गट आणि भारतीय कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहेत, आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत.
  • भारतीय खलाशांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य असून, दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, दूतावासाशी संबंधित सहाय्य पुरवणे आणि आवश्यकतेनुसार त्यांची भारतात परतण्याची सोय करणे यासह इतर सहाय्य करत आहे.
  • विमानसेवेची एकूण परिस्थिती सुधारत असून, या प्रदेशातून भारतासाठी अतिरिक्त विमानांचे संचालन सुरू आहे. 28 फेब्रुवारीपासून सुमारे 12,38,000 प्रवाशांनी या प्रदेशातून भारतात प्रवास केला आहे.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये, विमान कंपन्या परिचालन आणि सुरक्षाविषयक बाबींचा विचार करून मर्यादित व्यावसायिक उड्डाणे चालवत आहेत, यात यूएई मधून भारतात सुमारे 110 उड्डाणे अपेक्षित आहेत.
  • सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतातील विविध ठिकाणी विमानसेवा सुरू आहे.
  • कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले झाल्यामुळे, कतार एअरवेज भारतातील विविध ठिकाणांसाठी विमानांचे संचालन करत आहे.
  • कुवेतचे हवाई क्षेत्र आता खुले झाले असून, विमान कंपन्या लवकरच मर्यादित स्वरूपातील विमानसेवा पुन्हा सुरू करतील अशी अपेक्षा आहे. सौदी अरेबियातील दम्माम येथून अनियोजित उड्डाणे सुरू आहेत.
  • बहरीनचे हवाई क्षेत्र खुले असून गल्फ एअरने भारतासाठी विमान सेवा सुरू ठेवली आहे.
  • इराकचे हवाई क्षेत्र मर्यादित विमान संचालनासाठी खुले असून, भारतात पुढे येण्यासाठी याचा वापर होऊ शकतो.
  • इराणचे हवाई क्षेत्र कार्गो आणि चार्टर्ड उड्डाणांसाठी अंशतः खुले आहे. दुतावासाने आपल्या मार्गदर्शक सूचना पुन्हा एकदा अधोरेखित केल्या असून, भारतीय नागरिकांनी इराणचा प्रवास टाळावा, तसेच सध्या तिथे उपस्थित असलेल्यांनी जमिनीवरील सीमांच्या मार्गे बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत 2,432 भारतीय नागरिकांना आर्मेनिया आणि अझरबैजान मार्गे मायदेशी परतण्यासाठी सहाय्य करण्यात आले असून, यात 1,096 विद्यार्थी आणि 657 मच्छिमार, यांचा समावेश आहे.
  • इस्रायलचे हवाई क्षेत्र खुले असून, भारतात पुढील प्रवासासाठी मर्यादित विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/रेश्मा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255385) अभ्यागत कक्ष : 23