माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मल्याळम चित्रपट 'अचप्पाज अल्बम'चा प्रीमियर शो कोचीमध्ये संपन्न, वैविध्यपूर्ण कथाकथनाप्रती एनएफडीसीची वचनबद्धता दिसून आली

Posted On: 22 APR 2026 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2026

 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसीने कोची येथे 21 एप्रिल 2026 रोजी एका दिमाखदार सोहळ्यात आपली नवीन मल्याळी कलाकृती "अचप्पाज अल्बम" (आजोबांचा अल्बम) या चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो आयोजित केला. हा चित्रपट देशभरात येत्या 24 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यापूर्वी चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि एनएफडीसीचे महाव्यवस्थापक (निर्मिती  आणि विकास)  तरुण तारेजा यांच्यासह  चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अच्चप्पा’ज अल्बम हा अनोख्या अभिव्यक्ती शैलीला प्रोत्साहन देण्याच्या ध्येयाचा एक उत्तम पुरावा आहे, असे एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यावेळी म्हणाले.  काळाच्या प्रवासाच्या काल्पनिक संकल्पनेशी पिढीजात भावनांचा अद्वितीय संगम साधल्याने, या चित्रपटात सर्व वयोगटातील प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची क्षमता आहे. अशा अर्थपूर्ण चित्रपटांना पाठिंबा देण्यासाठी एनएफडीसी कायम वचनबद्ध आहे आणि भविष्यातही आम्ही भारताच्या मूलाधारातून उदयाला येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कथांना निरंतर प्रोत्साहन देऊ, यामुळे आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे वैभव जागतिक स्तरावर येऊ शकेल. या हृदयाला भिडणाऱ्या कथानकाला चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या दीप्ती पिल्लई सिवन यांचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.  

प्रीमियरमध्ये चित्रपटाचा सर्जनशील गाभा अधोरेखित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शिका दीप्ती सिवन पिल्लई, लेखक संजीव सिवन आणि प्रमुख कलाकार प्रियांका नायर, अंजना अप्पुकुट्टन आणि सुधांशू संजीव सिवन यांचा समावेश होता. तसेच, चित्रपटातील बालकलाकारासह इतर कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ड्रीम बिग फिल्म्सचे वितरक सुजित नायर आणि त्यांची टीम देखील सहभागी झाली होती. एनएफडीसी निर्मित हा चित्रपट भूतकाळात पुन्हा डोकावण्याच्या सार्वत्रिक आकर्षणाचा शोध घेतो. हा चित्रपट 24 एप्रिल 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

एनएफडीसी संबंधी

एनएफडीसीची स्थापना 1975 मध्ये झाली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ एनएफडीसी - ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली भारतीय चित्रपटांच्या विकासासाठीची सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था चित्रपट निर्मितीची परिसंस्था विकसित करण्यात सहाय्य करते, त्याअंतर्गत चित्रपट निर्मिती पासून ते प्रसिद्धी आणि देशभरातील विविध भाषांमधील चित्रपटांचे जतन करण्याचे काम करत असते.

 

* * *

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2254531) अभ्यागत कक्ष : 13