रेल्वे मंत्रालय
विविध विभागांमधे 'कवच' प्रणाली बसविण्यासाठी आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी रेल्वेने केले 1,364.45 कोटी रुपये मंजूर
Posted On:
06 APR 2026 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 एप्रिल 2026
भारतीय रेल्वेने आपल्या जाळ्यातील सुरक्षा, सिग्नल यंत्रणा आणि दळणवळण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 1,364.45 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मंजूर केलेल्या कामांमध्ये इंजिनवर कवच' प्रणाली बसवणे, ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कचा विस्तार करणे आणि विविध रेल्वे परिमंडळांमधील पॅनेल इंटरलॉकिंग ऐवजी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्याचा (रेल्वेची जुनी बटण पद्धत बदलून तिथे आधुनिक कॉम्प्युटर सिस्टीम बसवली जात आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होईल) समावेश आहे.
दक्षिण रेल्वेच्या 232 इंजिनांवर 'कवच' यंत्रणा बसवणार
भारतीय रेल्वेने दक्षिण रेल्वेच्या 232 इंजिनांवर 'कवच' यंत्रणा बसवण्यासाठी ₹208.81 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
उत्तर रेल्वेमधील दळणवळण यंत्रणा 2×48 ऑप्टिकल फायबर केबलची (ओएफसी) व्यवस्था किंवा सुविधा मजबूत करणार
भारतीय रेल्वेने उत्तर रेल्वेमधील दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी 400.86 रुपये कोटींच्या एकूण खर्चासह तीन कामांना मंजुरी दिली आहे.
या कामांचा उद्देश विविध विभागांमधील दळणवळण यंत्रणेची क्षमता आणि विश्वासार्हता वाढवणे हा आहे. आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि 'कवच' प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची आहे.
उत्तर मध्य रेल्वेमध्ये 2,196 मार्ग किलोमीटरवर 'कवच'साठी ओएफसी सुविधा
भारतीय रेल्वेने उत्तर मध्य रेल्वेमध्ये 'कवच' यंत्रणेसाठी 2×48 फायबर ओएफसी केबल्स टाकण्याच्या कामाला ₹176.7699 कोटींच्या खर्चासह मंजुरी दिली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग'च्या कामांना मंजुरी
भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेमध्ये 'पॅनेल इंटरलॉकिंग'ऐवजी आधुनिक 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' प्रणाली बसवण्यासाठी ₹578.02 कोटींच्या दोन महत्त्वाच्या कामांना मंजुरी दिली आहे.
मंजूर केलेले हे सर्व प्रकल्प भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा एक भाग असून, सुरक्षा, विश्वासार्हता आणि क्षमता वाढवण्यावर यात विशेष भर देण्यात आला आहे. या कामांमुळे 'कवच' प्रणालीच्या अंमलबजावणीला मदत होईल, मुख्य दळणवळण यंत्रणा मजबूत होईल आणि मुख्य मार्गांवरील सिग्नल यंत्रणा अद्ययावत होईल. या बदलांमुळे रेल्वेच्या कामकाजाची कार्यक्षमता सुधारेल आणि संपूर्ण रेल्वे जाळ्यावर अधिक सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.
निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249506)
अभ्यागत कक्ष : 23