पंतप्रधान कार्यालय
महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाचे उद्घाटन
सम्राट सम्प्रती संग्रहालयातून जैन संस्कृतीच्या खोलवर रुजलेल्या परंपरा आणि मानवतेसाठी त्यांच्या कालातीत मूल्यांचे दर्शन – पंतप्रधान
भगवान महावीरांसमोर नतमस्तक होत मी कोबा तीर्थावरुन देशवासियांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो – पंतप्रधान
सम्राट सम्प्रती संग्रहालय म्हणजे भारतातील लाखो लोकांसाठीचा वारसा, भारताच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा – पंतप्रधान
राजसत्ता स्वीकारल्यानंतर सम्राट सम्प्रती यांनी अहिंसेचा प्रचार केला. सत्य, अस्तेय व अपरिग्रह यांचा त्यांनी प्रसार केला – पंतप्रधान
भारतातील ज्ञान परंपरा नेहमीच मुक्त प्रवाहाप्रमाणे वाहत आली आहे – पंतप्रधान
प्रत्येक युगात तीर्थंकर, संत आणि विचारवंतांनी अवतार घेत ज्ञानाचे भांडार वाढवत नेले, काळानुसार त्यात नवीन भर पडत गेली - पंतप्रधान
Posted On:
31 MAR 2026 1:07PM by PIB Mumbai
भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गांधीनगरमधील कोबा तीर्थ येथील सम्राट सम्प्रती संग्रहालय या जैन वारसा संग्रहालयाचे उद्घाटन झाले. “कोबा तीर्थ आध्यात्मिक शांततेने भरुन गेले आहे, याठिकाणी अनेक जैन मुनींची आणि संतांची तपस्या फळाला आली आणि इथे सर्जनशीलता व सेवाभाव नैसर्गिकरित्या फुलला,” असे मोदी म्हणाले.
कोबा तीर्थाची शाश्वत परंपरा अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की कित्येक वर्षांपासून ज्ञान, साधना आणि आत्मसंयमनाची परंपरा या पवित्र ठिकाणी बहरते आहे. मूल्यांचे जतन, संस्कारांचे पालनपोषण आणि ज्ञान संवर्धन यांची त्रिवेणी धारा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असे त्यांनी अधोरेखित केले. “ही त्रिवेणी धारा विनाअडथळा अव्याहत सुरू ठेवणे ही आपल्या सर्वांची मिळून जबाबदारी आहे,” असे मोदी म्हणाले.
जैन वारसा संग्रहालयातून जैन धर्माचे कालातीत ज्ञान व भारताची समृद्ध परंपरा यांचे शतकानुशतके जतन होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. प्राचीन ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत नव्या व आधुनिक स्वरुपात पोहोचवण्याचे काम संतांनी केले, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. “आज ते भव्य स्वप्न सम्राट सम्प्रती संग्रहालयाद्वारे साकार झाले आहे, हे संग्रहालय जैन विचारधारा, भारतीय संस्कृती आणि आपला प्राचीन वारसा याचे पवित्र केंद्र बनले आहे,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी सर्व जैन मुनी, संत व समर्पित भावनेने या संग्रहालयाच्या कामी योगदान दिलेल्या हजारो भाविकांचे अभिनंदन केले. वारसा संवर्धनातील नवोन्मेषाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की जेव्हा प्राचीन ज्ञान नवीन पद्धतीने सादर केले जाते तेव्हा वारसा समृद्ध होतो आणि भविष्यातील पिढ्यांना नवी प्रेरणा मिळते. “सम्राट सम्प्रती संग्रहालय भारतातील करोडो लोकांचे आहे आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे ते प्रतीक आहे,” असे मत त्यांनी नोंदवले.
सम्राट सम्प्रती यांच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी बोलताना पंतप्रधानांनी असे निरीक्षण नोंदवले की कित्येक संस्कृतींमध्ये मोठमोठे विचारवंत, तत्त्वज्ञ होऊ गेले. जगभरातल्या अनेक राज्यातल्या राजांनी सत्तेचा प्रश्न आल्यावर विचार व सत्ता यामध्ये फरक करत नेहमीच आदर्शांकडे पाठ फिरवली. सम्राट सम्प्रती केवळ इतिहासातील एक राजा नव्हते तर ते भारताची विचारधारा व व्यवहार यातील दुवा बनले. “भारतातील सम्राट सम्प्रतींसारख्या राजांनी सत्तेला सेवा आणि साधनेचा मार्ग मानले, सत्तेद्वारे अहिंसेचा प्रसार केला आणि अत्यंत अलिप्त व निस्वार्थ भावनेने सत्य, अस्तेय, व अपरिग्रह यांचा प्रचार केला,” असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की या संग्रहालयाची रचना अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली आहे. प्रत्येक पायरी भारतीय गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवते. येथील सात दालनांमधून देशाची विविधता व सांस्कृतिक समृद्धी दिसून येते. नवपाद, अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधु व सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, सम्यक तप या त्यांच्या चार तत्त्वांचे दर्शन पहिल्या दालनात घडते आणि तिसऱ्या दालनात तीर्थंकरांच्या कथा व शिकवण कलात्मक चित्रांमधून जिवंत करण्यात आली आहे असे त्यांनी अधोरेखित केले. जेव्हा ज्ञान सम्यक, न्याय्य असते तेव्हा ते समता व सेवा यांचा पाया रचते असे निरीक्षण पंतप्रधान मोदी यांनी नोंदवले.
या संग्रहालयात जैन वारशासोबतच वेदिक, बौद्ध आणि भारताच्या इतर धार्मिक परंपरांचीही दिमाखदार मांडणी करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधत, विविधता आणि विविधतेतील एकता हे भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे असे पंतप्रधान म्हणाले. जगात धर्म व वर्ग यावरुन संघर्ष सुरू असताना या संग्रहालयाने सर्व परंपरांचे इंद्रधनुष्य सादर केले आहे. वेद, पुराणे, आयुर्वेद, योग आणि दर्शन एकमेकांसोबत सलोख्याने उभे आहेत. “हे फक्त भारतातच घडू शकते,” असे मोदी म्हणाले.
सध्याचे जागतिक अस्थैर्य व अशांतता यांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की हा वारसा व संग्रहालयातून दिलेला संदेश यांचे महत्त्व केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी अनन्यसाधारण आहे. जगभरातून येऊन या संग्रहालयाला भेट देणारे उत्सुक अभ्यागत, विद्यार्थी व संशोधकांच्या संख्येत वाढ होत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “इथे भेट देणाऱ्यांनी भारत व जैन धर्माची शिकवण जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचवावी,” अशी विनंती मोदी यांनी केली.
तक्षशीला व नालंदा यासारख्या भारतातील प्राचीन विद्यापीठांमध्ये एकेकाळी लाखो हस्तलिखिते होती. संकुचित धार्मिक वृत्तीच्या परकीय आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. त्या कठीण काळात सामान्य नागरिकांनी ही हस्तलिखिते पिढ्यानपिढ्या जपली असे सांगून आचार्य भगवंत श्री पद्मसागर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या असामान्य कार्याची त्यांनी प्रशंसा केली. सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी साठ वर्षे देशातल्या गावागावात, शहराशहरात फिरुन हस्तलिखितांचा शोध घेतला. “हजारो वर्षांपूर्वीची ताडपत्र व भूर्जपत्रावरील तीन लाखांपेक्षा जास्त हस्तलिखिते आज कोबा इथे सुरक्षितरित्या संकलित करण्यात आली आहेत. भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यासाठी ही संस्मरणीय सेवा आहे,” असे मोदी म्हणाले.
हस्तलिखिते जतन करण्याबाबतची सरकारची वचनबद्धता अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की आधीच्या सरकारांच्या दुर्लक्षामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी ज्ञान भारतम अभियान सुरू केले आहे. प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायजेशन, शास्त्रीयदृष्ट्या जतन, स्कॅनिंग, रासायनिक प्रक्रिया आणि डिजिटल संग्रह यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या अलिकडील भागाचाही संदर्भ दिला. नागरिकांनी जपून ठेवलेली प्राचीन हस्तलिखिते अपलोड करता यावीत यासाठी सुरू केलेया देशव्यापी सर्वेक्षणाची माहिती त्यांनी या भागात दिली होती. “देशातील कोनाकोपऱ्यात विखुरलेली हस्तलिखिते एकत्र करण्यात हे अभियान लक्षणीय भूमिका बजावेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रशासकीय पातळीवरील ज्ञान भारतम अभियानातील एकत्रित प्रयत्न आणि कोबा तीर्थचे असामान्य योगदान हे भारताच्या नव्या सांस्कृतिक पर्वाचे प्रतीक आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे, समजून घेण्याचे व प्रदर्शित करण्याचे प्रयत्न आज सर्व पातळ्यांवर सुरू आहेत. प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, धार्मिक स्थळांचा विकास ते आयुर्वेद व योग प्रसाराच्या ठिकाणांचा विकास असे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लोथलचे भव्य सागरी संग्रहालय, वडनगर येथील संग्रहालय आणि दिल्लीतील युगे युगे भार संग्रहालय यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय प्रभावाला न जुमानता भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचे सत्य चित्र लोकांसमोर आणण्यासाठी प्रथमच अर्थपूर्ण व सर्वसमावेशक काम केले जात आहे. “राजकीय चष्म्यातून इतिहासाकडे पाहण्याची वृत्ती आम्ही संपुष्टात आणली आहे आणि विकसित भारताचा आत्मा असलेल्या सबका साथ सबका विकास या मंत्रानुसार भविष्याकडे वाटचाल करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
भारताचा वारसा जपण्यासाठी संतांनी केलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा करत पंतप्रधानांनी दिल्लीतील ऐतिहासिक नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमाची आठवण करुन दिली. या कार्यक्रमात जैन धर्माचे चारही पंथ एकत्र आले होते. या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेल्या दहा निश्चयांची त्यांनी आठवण करुन दिली. पाणी वाचवा, एक पेड मा के नाम, स्वच्छता अभियान, व्होकल फॉर लोकल, देश दर्शन, नैसर्गिक शेती, निरोगी जीवनशैली, योग व खेळ, गरीबांना मदत आणि भारताच्या वारशाचे जतन हा दहावा निश्चय समाजातूनच यामध्ये समाविष्ट झाला होता. “आजचा कार्यक्रम त्या निर्धारांचे मूर्तीमंत प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
भविष्याबाबत विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की भारताची एकता व सांस्कृतिक ताकद देशापुढील मोठी ध्येये साकार करण्यात मदत करेल. लोक जेव्हा वैयक्तिक आकांक्षांपलिकडील विचार करतात आणि समाज व देशाच्या ध्येयासाठी काम करतात तेव्हा विकासाची गती अनेक पटींनी वाढते. “सम्राट सम्प्रती संग्रहालय ज्ञान, साधना व संस्कृतीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल, भविष्यात नवीन पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि समाजाला उर्जा देत राहील असा विश्वास मला आहे,” असे मोदी भाषणाचा समारोप करताना म्हणाले.
***
माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2247304)
अभ्यागत कक्ष : 11