कृषी मंत्रालय
सीएसआयआरकडून स्वदेशी 'बायो-बिटुमेन' तंत्रज्ञानाचे हस्तांतरण: शेतीतील अवशेषांचे शाश्वत रस्त्यांमध्ये रूपांतर
सीएसआयआर-केंद्रीय रस्ते संशोधन संस्था आणि सीएसआयआर-भारतीय पेट्रोलियम संस्था यांनी केले संयुक्तपणे विकसित
Posted On:
30 MAR 2026 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मार्च 2026
शाश्वत आणि चक्राकार पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएस आय आर) आपल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक वापरासाठी “लिग्नोसेल्युलोसिक बायोमासपासून बायो-बिटुमेन – शेतातील अवशेषांपासून रस्त्यांपर्यंत” या एका तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमाचे आज नवी दिल्ली येथे आयोजन केले.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

'बायो-बिटुमेन' तंत्रज्ञानाचा विकास एक "ऐतिहासिक आणि परिवर्तनशील पाऊल असल्याचे केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले. हे संशोधन, कृषी क्षेत्राला पायाभूत सुविधा आणि नवतंत्रज्ञानाशी जोडणारे असल्याचे ते म्हणाले. बायो-बिटुमेनचा वापर, भारताची हवामानविषयक वचनबद्धता, 'नेट झिरो’ म्हणजेच निव्वळ शून्य उद्दिष्टे आणि 'आत्मनिर्भर भारत', 'राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियान' आणि चक्राकार अर्थव्यवस्था' यांसारख्या प्रमुख उपक्रमांशी सुसंगत असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च-मूल्याच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शेतीतील अवशेषांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील, तसेच पिकांचे अवशेष जाळण्याचे प्रमाण आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होते, असेही ते म्हणाले.
हा उपक्रम भारताची आत्मनिर्भरता, स्वच्छ ऊर्जेकडे होणारे संक्रमण आणि ‘कचऱ्यापासून संपत्ती’ या तत्त्वाप्रती असलेली कटिबद्धता दर्शवतो, असे डॉ जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. हे तंत्रज्ञान कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तसेच पायाभूत सुविधांचा विकास यांसारख्या विविध क्षेत्रांचा प्रभावी संगम घडवून आणते. तसेच याला भक्कम सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा आधार लाभला असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक वर्षांच्या संशोधनातून विकसित झालेल्या बायो-बिटुमेन तंत्रज्ञानात कृषी बायोमास आणि पिकांचे अवशेष यांचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. एका थर्मोकेमिकल रूपांतरण प्रक्रियेद्वारे हे तंत्रज्ञान पेट्रोलियम-आधारित बिटुमेन हा एक अक्षय आणि पर्यावरणासाठी अनुकूल पर्याय निर्माण करते. या तंत्रज्ञानाने पारंपरिक बिटुमेन इतकीच क्षमता सिद्ध केली असून यामुळे महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आणि आर्थिक फायदे देखील मिळतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते बांधकामात याचा अवलंब करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
* * *
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2247022)
अभ्यागत कक्ष : 14