रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवासी सुविधा आणि सुरक्षेचा घेतला आढावा; प्रवेश नियंत्रण आणि एआय सुधारणा वेळेत लागू करण्याचे दिले निर्देश


एआय कॅमेऱ्यांच्या सततच्या देखरेखीमुळे सुखकर प्रवासाबरोबर रेल्वेस्थानकावरील सोयी-सुविधांचा सुरक्षित अनुभव घेता येणार

रेलवन ॲप भारत टॅक्सीशी जोडल्यानंतर प्रवाशांना स्थानकावरूनच पुढील प्रवासासाठी सोयीची टॅक्सी सेवा मिळणार

Posted On: 20 MAR 2026 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मार्च 2026

 

रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल भवन येथे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत स्टेशनवर प्रवेश, प्रवासी सुविधा सुधारणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. प्रवाशांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करणे हे उद्दिष्ट होते. बैठकीत प्रवेश नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, तंत्रज्ञानावर आधारित देखरेख आणि स्टेशन परिसरात सहज हालचाल यावर भर देण्यात आला. या सुधारणा प्रथम नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर लागू केल्या जातील आणि त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे इतर स्थानकांवरही राबवल्या जातील.

एआय (कृत्रिम प्रज्ञा) आधारित कॅमेऱ्यांचे जाळे

 नवी दिल्ली स्थानकावर कृत्रिम प्रज्ञेवर आधारित कॅमेऱ्यांचे जाळे असेल. हे कॅमेरे प्लॅटफॉर्म (रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेलगाडीमध्ये चढण्यासाठी किंवा उतरायला असलेली जागा), कॉनकोर्स (स्थानकातील मोठी खुली जागा जिथे प्रवासी एकत्र येतात, स्टेशनमध्ये आत जाण्याचे आणि बाहेर पडण्याचे दरवाजे) आणि अनधिकृत होऊ शकणाऱ्या भागांवर सतत देखरेख (दिवस-रात्र लक्ष ठेवणे) ठेवतील.

रंगानुसार वेगळे केलेले गणवेश आणि ओळखपत्रे

स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी रंगानुसार वेगळे केलेले गणवेश आणि ओळखपत्रे अनिवार्य करण्यात येतील. रेल्वे कर्मचारी ‘फ्लुरोसंट’- चमकदार  जॅकेट घालतील, तर विक्रेते, सहाय्यक, करारावर काम करणारे कर्मचारी आणि भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) कर्मचारी वेगळ्या रंगाची जॅकेटस घालतील. सर्वांना ओळखपत्रे दिली जातील.

क्यूआर कोड आधारित प्रवेश नियंत्रण

नवी दिल्ली स्थानकावर क्यूआर कोड आधारित प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रायोगिक स्वरूपात सुरू केली जाणार आहे. दिवाळी आणि छठ उत्सवाच्या गर्दीपूर्वी ही प्रणाली लागू केली जाईल.

रेलवन ॲपचे भारत टॅक्सी सोबत एकत्रीकरण

प्रवाशांच्या शेवटच्या टप्प्यातील प्रवासासाठी रेल वन ॲपचे भारत टॅक्सी सोबत एकत्रीकरण केले जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना सहज सुविधा मिळतील.

होल्डिंग एरिया आणि दिशादर्शक फलक सुधारणा

76 स्थानकांवर प्रवाशांसाठी थांबण्याच्या जागा सुधारल्या जाणार आहेत. आरक्षित आणि अनारक्षित तिकीटधारकांसाठी वेगळे, स्पष्ट फलक लावले जातील. प्रवाशांना रेल्वेगाड्यांची माहिती वेळेवर मिळण्यासाठी असलेली सेवा अधिक चांगली केली जाईल.

रेल्वे मंत्रालयाची थेट देखरेख

रेल्वे मंत्रालयाकडून थेट देखरेख सुरू राहील. जास्त गर्दी असलेल्या स्थानकांवर प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळेल.

या उपायांमुळे भारतीय रेल्वे देशातील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांना सुरक्षित, नीटनेटकी आणि प्रवाशांसाठी सोयीची बनवत आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243193) अभ्यागत कक्ष : 11