पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील सिल्चर येथे 23,550 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


ईशान्य भारत आज भारताच्या अ‍ॅक्ट ईस्ट धोरणामध्ये केंद्रस्थानी; तो भारताला आग्नेय आशियाशी जोडणारा सेतू बनत आहे: पंतप्रधान

बराक खोऱ्यातील शेतकरी आणि येथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे आसामच्या विकासात लक्षणीय योगदान; सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने पावले उचलत आहे: पंतप्रधान

आम्ही सीमावर्ती गावांना देशातील पहिली गावे मानतो; सीमावर्ती भागांच्या विकासासाठी, व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याचा खुद्द कचर जिल्ह्यातूनच आरंभ केला गेल्याने बराक खोऱ्यातील अनेक गावांमध्ये सुधारणा होण्याची खात्री: पंतप्रधान

Posted On: 14 MAR 2026 1:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली: 14 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील सिल्चर येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संस्कृती आणि चैतन्यशीलता अशी खास ओळख असलेल्या बराक खोऱ्याला भेट देणे हा माझ्यासाठी नेहमीच विशेष अनुभव असतो. इतिहास आणि भाषांच्या मिलाफामुळे अद्वितीय प्रादेशिक ओळख निर्माण करणाऱ्या या खोऱ्याचे सिल्चर हे प्रवेशद्वार म्हणून काम करते,असे मोदी यांनी नमूद केले. या प्रदेशाची ताकद त्याच्या विविधतेत आहे, बंगाली, आसामी आणि आदिवासी परंपरा इथे एकोप्याने बहरतात. "बराक खोऱ्याची विविधता ही त्याची सर्वात मोठी संपत्ती असून ती येथील नागरिकांमध्ये बंधुत्वाच्या भावनेस चालना देते," असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

या प्रदेशातील सुपीक पठारी भाग आणि चहाचे मळे हे स्थानिक अर्थव्यवस्थेचा आणि व्यापारी मार्गांचा कणा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज उद्घाटन झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे बराक खोरे संपूर्ण ईशान्य भागाचे लॉजिस्टिक हब बनण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम होईल. रेल्वे, रस्ते आणि शिक्षणाशी संबंधित हे उपक्रम स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या अनुषंगाने आखण्यात आले आहेत, असेही मोदी यांनी नमूद केले. हा प्रदेश आता केवळ राज्यालाच नव्हे तर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील लगतच्या प्रदेशांना देखील जोडण्याच्या स्थितीत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. "बराक खोरे ईशान्येसाठी प्रमुख लॉजिस्टिक आणि व्यापार केंद्र बनणार आहे," असेही मोदींनी स्पष्ट केले. 

सध्याचे सरकार या प्रदेशाला भारताच्या 'ॲक्ट ईस्ट धोरणा'चा केंद्रबिंदू बनवत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सध्याचे प्रशासन या प्रदेशाचे पूर्वीचे औद्योगिक वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले. 24,000 कोटी रुपयांच्या 'शिलाँग-सिल्चर हाय-स्पीड कॉरिडॉर'च्या भूमिपूजन समारंभामुळे आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला आहे, असे त्यांनी नमूद केले. हा नियंत्रित प्रवेश कॉरिडॉर ईशान्य भारतातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असून यामुळे स्थानिक जनतेची अनेक दशकांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हा कॉरिडॉर सिल्चरला मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुराशी, तसेच कालांतराने आग्नेय आशियातील मोठ्या बाजारपेठांशी जोडेल, अशी माहिती त्यांनी दिली. या संपर्क प्रणालीमुळे स्थानिक उद्योग, कृषी आणि पर्यटन क्षेत्राला प्रचंड चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "बराक खोरे आता एका अत्यंत उज्ज्वल भविष्याशी जोडले जाणार आहे," असे ते म्हणाले.

नवीन सिल्चर उड्डाणपूलामुळे शहरातील रहिवाशांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे, असे ते म्हणाले. ही पायाभूत सुविधा सिल्चर वैद्यकीय महाविद्यालय, NIT आणि आसाम विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठे वरदान ठरेल आणि त्यांचा मौल्यवान वेळ वाचवेल, हे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या रेल्वे जाळ्यातील 2500 किलोमीटरहून अधिक मार्गांचे विद्युतीकरण झाल्यामुळे प्रवास अधिक वेगवान होईल, असे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की : "वेगवान आणि पर्यावरणपूरक रेल्वे वाहतुकीमुळे बराक खोऱ्याच्या निसर्गरम्य पर्यावरणाला मोठा लाभ होईल."

या खोऱ्यातील चहा मळ्यांमधील कामगार आणि शेतकऱ्यांनी आसामच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. 'पीएम-किसान सन्मान निधी' अंतर्गत आतापर्यंत 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम आसामच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अगदी कालच बराक खोऱ्यातील हजारो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्येही ही रक्कम जमा झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित त्यांच्या छोट्या पण महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यास सहाय्यक ठरत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. पाथरकांडी येथे या प्रदेशातील पहिल्या कृषी महाविद्यालयाची स्थापना झाल्यामुळे हे खोरे कृषी संशोधनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून विकसित होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की, ही संस्था स्थानिक तरुणांना यशस्वी 'कृषी-स्टार्टअप्स' सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. "बराक खोरे आता कृषी अभ्यास आणि संशोधनासाठी ओळखले जाईल," असे पंतप्रधान म्हणाले. सध्याचे सरकार विकासाच्या शर्यतीत मागे राहिलेल्यांना प्राधान्य देण्याच्या मंत्राचे पालन करत आहे, यावर त्यांनी भर दिला. सीमावर्ती गावे एकेकाळी "शेवटची" गावे मानली जात असत, परंतु सध्याचे सरकार त्यांना देशाची "पहिली" गावे मानते, हे त्यांनी स्पष्ट केले. कछार जिल्ह्यातून विस्तारित व्हायब्रंट व्हिलेज उपक्रम सीमावर्ती वस्त्यांमध्ये नजरेत भरणाऱ्या सुधारणा घडवून आणत आहे, असे त्यांनी सांगितले. आजवर या भागाकडे झालेले ऐतिहासिक दुर्लक्ष आता सक्रिय विकास आणि धोरणात्मक लक्ष केंद्रित करून बदलले जात आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. "आम्ही सीमावर्ती गावांना देशाची पहिली गावे मानतो," असे पंतप्रधान म्हणाले.

आसाम सरकारने चहाच्या हजारो मळ्यातील कुटुंबांना जमीन हक्क प्रदान करून ऐतिहासिक कर्तव्य पार पाडले आहे, असे पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले. गेल्या दोन शतकांपासून सेवा करणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने हे जमीन हक्क देणे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मोदी यांनी नमूद केले. या कायदेशीर सुरक्षिततेमुळे या कुटुंबांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळेल, असे त्यांनी सांगितले. या जमीन हक्कांमुळे आता या कुटुंबांना कायमस्वरूपी घर, वीज आणि पाणी यांसारख्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य होईल, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, सरकारने चहाच्या मळ्यातील तरुणांसाठी शाळा, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर दिला आहे. या प्रयत्नांमुळे पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या कामगारांच्या मुलांसाठी उज्वल भविष्याची दारे उघडत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. ते म्हणाले की शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य हे सध्याच्या सरकारच्या प्रादेशिक धोरणाचे प्रमुख आधारस्तंभ बनले आहेत. आसाम राज्य जलद गतीने आरोग्य केंद्र म्हणून उदयास येत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आता येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स आणि कर्करोग रुग्णालयांचे बळकट जाळे तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. चहाच्या बागांतील तरुणांसाठी उज्ज्वल भविष्याची दारे आता उघडत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.

आसाममधील तरुणांसमोर आता सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संधींचे खुले आकाश उपलब्ध झाले आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. मात्र, शांतता आणि प्रगतीचा हा सध्याचा काळ मोठा त्याग आणि बलिदानांमधून प्राप्त झाला असून, त्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्याला पुन्हा त्याच्या अस्थिर भूतकाळाकडे ढकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शक्तींना योग्य प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आसाम आता भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राचा महत्त्वाचा भाग बनत आहे. पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाशी संबंधित परिसंस्था आणि कौशल्यसंपन्न मनुष्यबळ येथे तयार होत आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी असेही निरीक्षण नोंदवले की, जागतिक संकटे आणि युद्धांच्या काळात भारतीय नागरिकांवर त्याचा परिणाम कमीत कमी राहावा यासाठी सध्याचे सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. या प्रदेशाची प्रगतीच्या मार्गावरील वाटचाल आता रोखता येणार नाही, तिच्या पाठीशी येथील समृद्ध भाषा व संस्कृतीचा आधार आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

आज उद्घाटन करण्यात आलेले विकास प्रकल्प हे खोऱ्यासाठी नव्या युगाची सुरुवात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. राज्यातील जनतेचा सामूहिक संकल्प संपूर्ण राज्यासाठी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करेल, असेही त्यांनी अधोरेखित केले. लवकरच असा दिवस येईल, जेव्हा बराक खोरे हे विकासाचे नवे केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे मोदी यांनी समारोपाच्या वेळी सांगितले.

****

शैलेश पाटील/मंजिरी गानू/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2240177) अभ्यागत कक्ष : 17