माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हैदराबादमध्ये आयलाईन स्टुडिओ चा प्रारंभ, भारताच्या एव्हीजीसी (AVGC) परिसंस्थेला बळ मिळण्याची अपेक्षा

Posted On: 12 MAR 2026 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2026

नेटफ्लिक्सने हैदराबादमध्ये आयलाईन स्टुडिओ हा त्यांचा जागतिक निर्मिती आणि नवोन्मेष स्टुडिओ सुरू केला आहे. हा स्टुडिओ सुरू करून नेटफ्लिक्सने भारताच्या विस्तारत असलेल्या अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) परिसंस्थेने मोठी गुंतवणूक केली आहे. या उपक्रमामुळे जागतिक निर्मिती साखळीतील भारताची भूमिका अधिक बळकट होईल तसेच प्रगत व्हिज्युअल इफेक्ट्ससह देशातील नेक्स्ट जनरेशन निर्मिती तंत्रज्ञानाच्या विस्ताराला बळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या उद्घाटन समारंभाला तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमूल रेवंत रेड्डी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, आयलाईन स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ शापिरो यांच्यासह भारतीय चित्रपट अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबती उपस्थित होते.

हैदराबादमधील हा स्टुडिओ सुमारे 32,000 चौरस फुट परिसरात विस्तारलेला आहे. हा स्टुडिओ प्रगत व्हिज्युअल इफेक्ट्स आणि आभासी निर्मिती तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या स्टुडिओला हायब्रिड क्लाउड पायाभूत सुविधांचेही पाठबळ असणार आहे. उच्च गुणवत्तापूर्ण दृश्यस्वरुपातील कथात्मक मांडणीला पाठबळ मिळू शकेल अशा रितीने या स्टुडिओची आखणी आणि रचना केली गेली आहे. हा स्टुडिओ नेटफ्लिक्सच्या लॉस एंजेलिस, व्हँकुव्हर, सेऊल आणि लंडन इथल्या केंद्रांच्या सोबतीने, आयलाईन स्टुडिओच्या जागतिक जाळ्याचा एक भाग म्हणून कार्यरत राहणार आहे.

भारताने धोरणात्मक पाठबळ आणि उदयोन्मुख माध्यम क्षेत्रातील कौशल्य विकासावर भर दिला आहे. त्यामुळेच सर्जनशील तंत्रज्ञान आणि डिजिटल निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान सातत्याने बळकट होऊ लागले आहे.हैदराबाद इथे आयलाईन स्टुडिओ सुरू झाल्यामुळे देशातील प्रतिभेच्या विकासाला, तंत्रज्ञानाच्या अवलंबाला आणि जागतिक निर्मिती साखळीसोबत जोडून घेण्याच्या प्रक्रियेला पाठबळ मिळेल, आणि यातून देशातील याद्वारे एव्हीजीसी परिसंस्थेच्या प्रगतीला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुल रेवंत रेड्डी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. हैदराबाद हे सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि जागतिक प्रतिभेचा संगम साधणारे  एक बहुआयामी केंद्र म्हणून उदयाला आले असल्याचे ते म्हणाले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. कथात्मक मांडणीची भारताची समृद्ध परंपरा आणि वाढत असलेली तांत्रिक क्षमता, मनोरंजन क्षेत्राच्या विस्ताराला चालना देणारा घटक ठरू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. हैदराबादला एव्हीजीसी क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे, अनेक जागतिक स्टुडिओ या शहरात कार्यरत आहेत ही बाब त्यांनी नमूद केली. हैदराबादमधील भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्थेच्या (IICT) येऊ घातलेल्या संकुलामुळे सर्जनशील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कौशल्ये आणि क्षमता वृद्धीला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी पार पडलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदे (WAVES) दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑरेंज इकॉनॉमीच्या (सर्जनशील क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्था) प्रगतीवर भर दिला होता, असेही त्यांनी नमूद केले. आता हाच दृष्टिकोन धोरणात्मक कृतीत रूपांतरित होत आहे, देशभरात 15,000 कंटेंट क्रिएटर लॅब्स (आशय-सामग्री निर्माती प्रयोगशाळा) उभारण्याची घोषणा केली गेली आहे, यामुळे सर्जनशील अर्थव्यवस्थेत सुमारे 20 लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.

आयलाईन स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ शापिरो यांनीही उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. सक्षम सर्जनशील आणि तांत्रिक प्रतिभेच्या बळावर भारताने जागतिक व्हिज्युअल इफेक्ट्स उद्योगक्षेत्रात दीर्घकाळापासून महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबती यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. आयलाईन स्टुडिओसारख्या उपक्रमांमुळे या शहरातील सर्जनशील परिसंस्थेला अधिक बळकटी मिळेल तसेच कलाकार आणि कथात्मक मांडणीकारांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील असे ते म्हणाले.

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2239244) अभ्यागत कक्ष : 9