राष्ट्रपती कार्यालय
राज्य नागरी सेवांमधून नियुक्त झालेल्या आणि एलबीएसएनएएमधून 128 व्या प्रेरण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
02 MAR 2026 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
राज्य नागरी सेवांमधून नियुक्त आणि लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (एलबीएसएनएए) येथे 128 व्या प्रेरण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांनी आज 2 मार्च, 2026 रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रउभारणी प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. आता त्यांच्याकडे जिल्हा किंवा राज्य प्राधान्यांच्या पलीकडे जाणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत. या मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी विभागीय सीमा ओलांडून त्या पलीकडे जाऊन विचार करणारा दृष्टिकोन आवश्यक आहे. सहकार्याने काम करून, ते संस्थात्मक सुसंगतता वाढवू शकतात आणि प्रशासन यंत्रणा मजबूत करू शकतात. त्यांचे सामूहिक व्यावसायिक कौशल्य, समन्वय आणि बांधिलकी ही विकासाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी तसेच सार्वजनिक सेवेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ते आता केवळ एखाद्या प्रदेशाचे प्रशासक राहिलेले नाहीत, तर संपूर्ण देशभर जपल्या जाणाऱ्या शासन मानकांचे संरक्षक आहेत, असे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत असला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

आयएएस अधिकारी म्हणून, लोकांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धोरणे प्रभावीपणे अंमलात आणण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाईल.अधिक जटिल आव्हानांना तोंड देताना त्यांचा मौल्यवान अनुभव आणि 'राष्ट्र प्रथम' ही भावना त्यांची मार्गदर्शक ठरली पाहिजे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी समावेशक विकासासाठी सक्रिय योगदान देणे अपेक्षित असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. भारताचे विकसित राष्ट्रात रूपांतर तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल, जेव्हा विकासाचे लाभ समाजातील सर्वात दुर्बल आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचतील. भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणांमुळे कोणताही समुदाय विकासापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. शाश्वतता आणि हवामान लवचिकता हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र असून यांसाठी अधिकाऱ्यांची वचनबद्धता आवश्यक आहे. वरिष्ठ प्रशासक म्हणून त्यांनी पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करणे, हवामान-अनुकूल प्रशासनाला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणे यासाठी पुढाकार घ्यावा. आज आपण घेतलेली सामूहिक कृतीच भविष्यातील पिढ्यांच्या जीवनमानाचा दर्जा ठरवेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234592)
अभ्यागत कक्ष : 18