राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 'सशक्त नारी, समृद्ध दिल्ली' या कार्यक्रमात झाल्या सहभागी
Posted On:
02 MAR 2026 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (2 मार्च 2026) नवी दिल्ली येथे एनसीटी दिल्ली सरकारने आयोजित केलेल्या 'सशक्त नारी, समृद्ध दिल्ली' या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केले.

महिला आज प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. सैनिक म्हणून त्या देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. मात्र, हे देखील एक सत्य आहे की महिलांना अजूनही हिंसाचार, आर्थिक विषमता, सामाजिक रूढी आणि आरोग्यविषयक उपेक्षा यांचा सामना करावा लागतो, असे राष्ट्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाल्या. महिला सक्षमीकरणाचे ध्येय हे अडथळे दूर करूनच साध्य होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा एखाद्या स्त्रीला स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा असेल तेव्हाच तिला स्वाभिमानाने जीवन जगता येईल. तसेच जेव्हा तिला समान संधी आणि सुरक्षितता मिळेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सक्षम होईल, हे त्यांनी अधोरेखित केले. एक सक्षम महिला केवळ तिचे स्वतःचे जीवनच नाही तर समाजाची आणि भावी पिढ्यांची दिशा देखील बदलू शकते, यावर राष्ट्रपतींनी प्रकाश टाकला.

भारत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मुलींच्या शिक्षण आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाखो महिलांना धुरापासून मुक्त करून त्यांच्या आरोग्याचे रक्षण करत आहे, असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजना महिलांना स्व-रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. लखपती दीदी योजनेसारखे उपक्रम महिलांना स्वावलंबी होण्याच्या संधी प्रदान करत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसारखे उपक्रम महिलांच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असे त्या म्हणाल्या. हे सर्व प्रयत्न महिलांची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थिती सुधारत आहेत. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की महिला सक्षमीकरण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. महिलांना शिक्षित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे, हे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. महिलांनी स्वप्ने पहावीत आणि ती पूर्ण करावीत यासाठी आपण त्यांच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांना द्यायला हवा, हे त्यांनी अधोरेखित केले.

दिल्ली ही देशाची राजधानी आहे. प्रत्येक राज्य आणि प्रदेशातील लोक येथे राहतात. जर दिल्लीतील महिला सुरक्षित, शिक्षित आणि स्वावलंबी असतील आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने नेतृत्व करतील, तर देशभरात सकारात्मक संदेश जाईल, असेही त्या म्हणाल्या. दिल्लीने संपूर्ण देशासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे उदाहरण मांडले पाहिजे, असे त्यांनी सांगितले
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234543)
अभ्यागत कक्ष : 108