आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पंतप्रधान उद्या अजमेर येथून 14 वर्षे वयाच्या मुलींसाठी देशव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे उच्चाटन आणि 'स्वस्थ नारी' हा दृष्टीकोन पुढे नेण्याच्या दिशेने ही मोठी झेप
Posted On:
27 FEB 2026 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2026
प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा बळकट करण्याच्या आणि भारताच्या कन्यांचे भविष्यातील आरोग्य सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:30 वाजता राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ करतील.
या कार्यक्रमाची देशव्यापी अंमलबजावणी, भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेच्या प्रवासातील एक निर्णायक पाऊल असून, महिलांच्या आरोग्यसेवेच्या केंद्रस्थानी प्रतिबंध, संरक्षण आणि समता सुनिश्चित करणारा "स्वस्थ नारी" हा दृष्टीकोन पुढे नेण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पूर्तता करत आहे.
या कार्यक्रमांतर्गत, दर वर्षी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 14 वर्षे वयोगटातील अंदाजे 1.15 कोटी मुलींचे लसीकरण केले जाईल. निर्धारित सरकारी आरोग्य सुविधांमध्ये ही लस मोफत दिली जाईल. आयुष्मान आरोग्य मंदिरे (प्राथमिक आरोग्य केंद्रे), सामुदायिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाईल.
प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली प्रत्येक सत्र आयोजित केले जाईल, आणि त्यांना कुशल आरोग्यसेवा पथकांचे पाठबळ असेल. सर्व ठिकाणी कोल्ड चेन पॉइंट्स (सीसीपी) कार्यरत असतील आणि लसीकरणानंतरच्या (एईएफआय) कोणत्याही दुर्मिळ प्रतिकूल घटनांवर त्वरित वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी ही केंद्रे 24×7 सरकारी आरोग्य सुविधांशी जोडली जातील.
लसीकरण ऐच्छिक असेल आणि लसीकरणापूर्वी पालक / जबाबदार व्यक्तींकडून लेखी संमती घेतली जाईल.
तीन महिन्यांच्या कालावधीत मिशन मोडमध्ये ही विशेष मोहीम राबवली जाईल, या कालावधीत पात्र मुलींचे निर्धारित सुविधांमध्ये दररोज लसीकरण केले जाईल. त्यानंतर, ही लस नियमित लसीकरणाच्या दिवसांमध्ये उपलब्ध राहील.
पार्श्वभूमी:
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. ग्लोबोकॅन 2022 च्या आकडेवारीनुसार भारतात कर्करोगाच्या या प्रकारची दरवर्षी 1 लाख 20 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे आढळून येतात आणि सुमारे 80 हजार मृत्यूची नोंद होते.
या कार्यक्रमाच्या शुभारंभानंतर भारताचा समावेश अशा 160 हून अधिक देशांमध्ये होईल, ज्यांनी त्यांच्या लसीकरण वेळापत्रकात एचपीव्ही लसीकरण समाविष्ट केले आहे. 90 हून अधिक देशांनी एकल-डोस एचपीव्ही लसीकरण वेळापत्रक लागू केले असून, त्याची पोहोच वाढवली आहे, किफायतशीपणा आणि कार्यक्रमाच्या कार्यक्षमतेत सुधारणा केली आहे.
व्यापक लसीकरणानंतर अनेक देशांनी एचपीव्ही संसर्गाचा दर, कर्करोग-पूर्व जखमा आणि गर्भाशय मुखच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे.
अखंड पुरवठा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता भारत सरकारने पारदर्शक आणि जागतिक स्तरावर समर्थन असलेल्या खरेदी यंत्रणेद्वारे गावी (जीएव्हीआय) या लस आघाडीच्या भागीदारीतून एचपीव्ही लसीचा पुरवठा सुरक्षित केला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लसी भारताच्या औषध नियामकाने मंजूर केल्या आहेत आणि त्या गुणवत्ता आणि शीत-साखळी बाबतची कठोर मानके पूर्ण करतात.
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या लक्ष्यित गटाच्या अनुषंगाने पुरेशा मात्रा आधीच पुरवण्यात आल्या आहेत आणि अखंड अंमलबजावणी आणि तळागाळा पर्यंतच्या घटकापर्यंत वितरण करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पालक आणि जबाबदार व्यक्तींना विनंती केली आहे की त्यांनी हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांच्या 14 वर्षांच्या मुलींना एचपीव्ही लस मिळेल याची खात्री करावी.
एचपीव्ही लसीकरण हे एक शक्तिशाली प्रतिबंधात्मक पाऊल आहे जे जीव वाचवू शकते. लसीकरणाची निवड करून, कुटुंबे भारतातील कन्यांसाठी आरोग्यपूर्ण, कर्करोगमुक्त भविष्य सुरक्षित करू शकतात.
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233735)
अभ्यागत कक्ष : 47