पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जेरुसलेम येथील तंत्रज्ञान प्रदर्शनाला दिली भेट
Posted On:
26 FEB 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह विविध क्षेत्रांमधील अग्रगण्य इस्रायली नवोपक्रमांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात कृषी-तंत्रज्ञान, जल-तंत्रज्ञान, हवामान-तंत्रज्ञान, आरोग्य-बायोटेक, स्मार्ट मोबिलिटी, एआय, सायबरसुरक्षा आणि क्वांटम तंत्रज्ञानात विशेष कार्य करणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आणि संशोधन संस्थांचा समावेश होता.
नवोन्मेष आणि तंत्रज्ञान भागीदारी हा भारत-इस्रायल द्विपक्षीय संबंधांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. "भारत-इस्रायल नवोन्मेष पूल" उपक्रमाद्वारे आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपाय तयार करण्यासाठी उभय देश एकत्र काम करत आहेत.प्रदर्शन पहात असताना, पंतप्रधानांनी अनेक कंपन्या/संस्थांचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान-उद्योजक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला,यात पुढील क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे:
* क्वांटम आणि डीप टेक: इस्रायली क्वांटम कॉम्प्युटिंग सेंटर (IQCC) आणि क्वांटम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सुलभ करणाऱ्या क्लासिक या कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या क्वांटम मशीन्सशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.
* आरोग्य-तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा: आयसॅप(एआयएसएपी) या स्टार्ट-अप कंपनीने त्यांचे कृत्रिम प्रज्ञा-संचालित पॉइंट-ऑफ-केअर अल्ट्रासाऊंड मशिन प्रदर्शित केले, जे रिअल-टाइम चाचणी मार्गदर्शन प्रदान करते. इस्रायली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या होरायझन स्कॅनिंग विभागाने "टेक स्काउट" सादर केले, जे धोरणात्मक जोखीम शोधण्यासाठी आणि ट्रेंड विश्लेषणाचा कल ओळखण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा-संचालित साधन आहे.
* स्मार्ट मोबिलिटी: मोबाईलआय या तंत्रज्ञान-उद्योगाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी तयार केलेल्या त्यांच्या सेन्सर आणि चिप तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले.
*सायबरसुरक्षा: चेक पॉइंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीजने भारतासाठी बनविलेल्या प्रगत धोक्यांपासून बचाव उपायांवर आणि सहकार्यावर प्रकाश टाकला.
* जल आणि कृषी: याद्वारे शाश्वततेसाठी नवकल्पनांवर लक्ष केंद्रित करणारे उपाय प्रदर्शित केले आहेत. वॉटरजेनने हवेपासून पिण्याचे पाणी तयार करण्याचे तंत्रज्ञान प्रदर्शित केले, तर एन-ड्रिपने गुरुत्वाकर्षणावर चालणाऱ्या सूक्ष्म-सिंचन प्रणालींचे प्रदर्शन केले. नॅचरल ऑफसेट फार्मिंगने (एनओएफ) शेतातील कापणीनंतर विजेची उपपलब्धता नसल्यास अन्नाचे नुकसान कसे कमी करता येईल याविषयी उपाय सादर केले.
* हवामान आणि जैव-तंत्रज्ञान: रिमिल्कने प्रयोगशाळेत बनविलेल्या दुधातील प्रथिनांसाठी आवश्यक एकत्रित किण्वनांचे प्रदर्शन केले आणि बारअल्गेने मशीन-लर्निंग-इंटिग्रेटेड सूक्ष्म शैवाल लागवडीचे सादरीकरण केले.मायनोरा बायोने विशेष जैव-रूपांतरण ॲडिटीव्ह वापरून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कसे करावे हे प्रदर्शित केले.
* ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने: जिओफिजिकल इन्स्टिट्यूट (GII) ने खनिज संसाधनांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी उच्च-रिझोल्यूशन मॉडेलिंगचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
* अंतराळ: इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने त्यांचे लघु संप्रेषण उपग्रह आणि एकात्मिक सिंथेटिक एपर्चर रडारचे [SAR] सादरीकरण केले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये विशेषतः शेती, पाणी व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि डिजिटल सेवा यासारख्या क्षेत्रात,भारत-इस्रायल यांच्यात नवोन्मेष, स्टार्ट-अप्स आणि व्यवसाय भागीदारीचा विकास करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे या नवोन्मेषक प्रदर्शकांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी नमूद केले. यावेळी त्यांनी या कंपन्यांना भारतात गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान भागीदारी निर्माण करण्याची संधींचा लाभ घेण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.
नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233130)
अभ्यागत कक्ष : 16