वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम गतिशक्ति अंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 109 व्या बैठकीत झाले महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन


रेल्वे मंत्रालय, गृहनिर्माण तथा शहरी कामकाज मंत्रालय आणि नागरी विमानवाहतूक मंत्रालयांच्या प्रकल्पांचे एनपीजी कडून मूल्यमापन

Posted On: 25 FEB 2026 6:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

पीएम गतिशक्ति अंतर्गत एनपीजी म्हणजेच नेटवर्क नियोजन गटाची 109 वी बैठक डीपीआयआयटी अर्थात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागात घेण्यात आली. पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टरप्लॅन या आराखड्याशी मिळत्याजुळत्या पद्धतीने बहुविध (मल्टिमोडल) दळणवळण आणि वाहतुकीची कार्यक्षमता उंचावण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. एकात्मिक बहुविध पायाभूत सुविधा, दुर्गम भागात शेवटच्या टोकापर्यंत दळणवळण सेवा देऊन त्यांना आर्थिक आणि सामाजिक केंद्रांशी जोडणे, तसेच 'सर्व जबाबदारी सरकारने उचलणे' या दृष्टिकोनाच्या संबंधाने एनपीजीने 02 रेल्वे प्रकल्प, 01 मेट्रो प्रकल्प, 01 विमानतळ प्रकल्प यांचे मूल्यमापन केले. या उपक्रमांमधून सर्व प्रकारच्या वाहतूक व दळणवळणाची कार्यक्षमता वाढणे, प्रवासाचा वेळ कमी होणे, आणि प्रकल्प क्षेत्रात लक्षणीय सामाजिक-आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पांचे मूल्यमापन आणि अंदाजित परिणाम, पुढीलप्रमाणे:

सदर प्रकल्पांचे थोडक्यात वर्णन पुढील प्रमाणे:

जालंधर छावणी क्षेत्र आणि जम्मू तावी स्थानक (पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू) यादरम्यान प्रस्तावित तिसरा रेल्वेमार्ग-: रेल्वे मंत्रालयाने जालंधर छावणी क्षेत्र आणि जम्मू तावी यांदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मांडला आहे. याद्वारे पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 210.750 किमी अंतर जोडले जाणार आहे. या प्रस्तावित मार्गात 27 स्थानकांचा समावेश असेल आणि तो- जालंधर, होशियारपूर, कांगरा, पठाणकोट, कथुआ आणि सांबा या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून प्रवास करेल. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या या मार्गिकेवरील रेल्वे क्षमता वाढवणे आणि वाहतूक व दळणवळणास बळकटी देणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. 

या प्रस्तावित रेल्वेमार्गाला सामरिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. सीमावर्ती भागात संरक्षण दलाच्या जवानांची, सामग्रीची आणि संसाधनांच्या पुरवठ्याची वाहतूक अधिक वेगवान आणि अधिक विश्वासार्ह पद्धतीने करण्यासाठी, हा रेल्वेमार्ग महत्त्वाची पायाभूत सुविधा म्हणून काम करेल. आर्थिकदृष्ट्या विचार करता या प्रकल्पामुळे, शेतमाल; बांधकाम साहित्य आणि अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत सुधारणा होऊन व्यापारउदीमामध्ये वाढ होईल. 

मानिकपूर आणि जबलपूरमधील इटारसी यांदरम्यान (मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश) प्रस्तावित तिसरा रेल्वेमार्ग-: रेल्वे मंत्रालयाने मानिकपूर आणि इटारसी यांदरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मांडला आहे. याद्वारे उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांतील एकूण 518.532 किमी अंतर जोडले जाणार आहे. हा प्रस्तावित मार्ग चित्रकूट, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर आणि नर्मदापुरम या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून प्रवास करेल. याद्वारे उत्तर आणि मध्य भारतातील महत्त्वपूर्ण मार्गिकेवर रेल्वे-वाहतुकीस बळकटी मिळेल.

हा विभाग प्रादेशिक रेल्वे जाळ्याचा अत्यावश्यक घटक असून मोठ्या प्रमाणावरील प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी तो महत्त्वपूर्ण आधार पुरवणारा आहे. 

प्रस्तावित तिसऱ्या मार्गामुळे परिचालन क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, रेल्वेजाळ्याची लवचिकता सुधारेल आणि वाढती वाहतूक मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. विद्यमान रेल्वे पायाभूत सुविधा औद्योगिक केंद्रे, मालवाहतूक केंद्रे आणि प्रमुख पर्यटन स्थळे यासारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना सेवा देत असताना, भविष्यातील वाहतूक अंदाज आणि परिचालन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी क्षमता वाढवणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह रेल्वे परिचालन शक्य होईल, प्रादेशिक आर्थिक वाढीला पाठबळ मिळेल आणि धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मार्गिकांवर एकूण वाहतूक कार्यक्षमता बळकट होईल. 

आसाममधल्या सिल्चर इथल्या डोलू येथे ग्रीनफील्ड विमानतळाचा विकास:

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने आसाममधल्या सिल्चर इथल्या डोलू येथे ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग NH-27 च्या लगत तो असेल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट या प्रदेशातली हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करणे आणि आधुनिक विमान वाहतूक पायाभूत सुविधा प्रदान करणे, अधिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय दळणवळण प्रदान करून विद्यमान नागरी अंतःक्षेत्राच्या क्षमता मर्यादांवर तोडगा पुरवणे, हे आहे. 

कार्यान्वित झाल्यावर हा विमानतळ कछार जिल्हा आणि आसपासच्या भागातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी एक प्रमुख उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. सुधारित हवाई संपर्क व्यापार, पर्यटन आणि व्यवसाय वाढीस पाठबळ देईल, तसेच रस्ते, लॉजिस्टिक्स, आतिथ्य आणि शहरी पायाभूत सुविधा यासारख्या संबंधित क्षेत्रांमध्ये बहुविध परिणाम साधेल आणि शाश्वत प्रादेशिक विकासात योगदान देईल. 

सुरत मेट्रोचा कॉरिडॉर II टप्पा I चा सरोली ते मुंबई-अहमदाबाद उच्च वेगवान रेल्वे कॉरिडॉरपर्यंत विस्तार : गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरत मेट्रो कॉरिडॉर II (टप्पा I) चा गुजरातमधील मुंबई-अहमदाबाद उच्च वेगवान रेल्वे (एचएसआर) कॉरिडॉरपर्यंत विस्तार प्रस्तावित केला आहे. या 4.4 किमी उन्नत विस्तारामध्ये तीन स्थानके समाविष्ट असून यात भविष्यातील दोन स्थानकांसाठी तरतूद आहे. याचा उद्देश शहरी गतिशीलता वाढवणे आणि सुरतचे प्रादेशिक आणि राष्ट्रीय वाहतूक जाळ्याशी जोडणी बळकट करण्याचा आहे.

हा प्रकल्प मुंबई-अहमदबाद एचएसआर कॉरिडॉरला समर्पित पुरकमार्ग म्हणून आखण्यात आला असून तो शेवटच्या मैलापर्यंत अखंड संपर्क पुरवेल. थेट मेट्रो-एचएसआर जोडणी, पूरक बस सुविधा आणि नॉन-मोटराइज्ड वाहतूक पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेले एकात्मिक स्थानक नियोजन प्रवाशांच्या सोयीमध्ये वाढ करेल, विविध वाहतूक साधनांच्या एकत्रीकरणाला चालना देईल आणि एकूण वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता व शाश्वतता वृद्धिंगत करेल.

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232809) अभ्यागत कक्ष : 10