पंतप्रधान कार्यालय
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत नेत्यांच्या पूर्ण सत्रात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
Posted On:
19 FEB 2026 3:57PM by PIB Mumbai
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे भारतात स्वागत करताना मला आनंद होतो आहे. ही शिखर परिषद मानव-केंद्रित, संवेदनशील जागतिक एआय परिसंस्था तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास मला वाटतो.
मित्रहो,
आपण इतिहासाकडे मागे वळून पाहिले तर मानवतेने प्रत्येक व्यत्ययाचे एका नवीन संधीत रूपांतर केले आहे, असे आपल्याला दिसून येईल. आज आपल्याला अशाच प्रकारच्या संधीचा सामना करावा लागत आहे. एकत्रितपणे आपण या व्यत्ययाचे मानवतेसाठीच्या सर्वात मोठ्या संधीत रूपांतर केले पाहिजे.
मित्रहो,
भारत ही बुद्धाची भूमी आहे आणि भगवान बुद्ध म्हणाले होते, "योग्य कृती योग्य समजातून येते." म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा खरा परिणाम दर्शविणारा आराखडा तयार करण्यासाठी आपण एकत्र काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरा परिणाम तेव्हाच येतो जेव्हा आपण योग्य वेळी, योग्य हेतूने योग्य निर्णय घेतो.
मित्रहो,
जेव्हा आपण एकत्र उभे राहतो तेव्हा अशक्य देखील शक्य होते, हे कोविड-19 साथरोगाच्या काळात जगाने पाहिले आहे. लस विकसित करण्यापासून ते पुरवठा साखळीपर्यंत, डेटा शेअरिंगपासून ते जीव वाचवण्यापर्यंत, सहकार्यानेच उपाय प्रदान केले आहेत. भारतातील कोविड काळात तंत्रज्ञान मानवतेची कशी सेवा करू शकते हे आपण पाहिले आहे. आमच्या डिजिटल लसीकरण मंचामुळे लाखो लोकांचे वेळेवर लसीकरण होण्यास मोठी मदत झाली. लोक त्या कठीण परिस्थितीतही सहजपणे ऑनलाइन व्यवहार करू शकतील, याची खातरजमा आमच्या UPI ने केली. भारतातील डिजिटल दरी कमी करण्यात देखील UPI ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने एक प्रभावी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण केली आहे आणि आम्ही ती जगासोबत सामाईक करत आहोत. कारण आमच्यासाठी तंत्रज्ञान हे सत्तेचे साधन नाही, तर सेवेचे साधन आहे; शक्ती प्राप्त करणे नाही, तर सक्षमीकरण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची दिशा देखील अशी असावी, जी अवघ्या मानवतेसाठी लाभदायक ठरावी.
मित्रहो,
भूतकाळात तंत्रज्ञानाने विभाजने निर्माण केली होती, परंतु आज, कृत्रिम बुद्धिमत्ता-तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध करून देणे, हे आपले ध्येय असले पाहिजे. म्हणूनच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याबद्दल चर्चा करताना, आपण ग्लोबल साऊथच्या आकांक्षा आणि प्राधान्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.
आदरणीय मान्यवरहो,
युग कोणतेही असो, नीतिमत्ता नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. फरक एवढाच आहे की भूतकाळात, अनैतिक वर्तनाची व्याप्ती मर्यादित होती, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मात्र त्याची व्याप्ती अमर्यादित आहे. म्हणून, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी नैतिक वर्तन आणि मानदंडांची व्याप्ती वाढवली पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांवर मोठी जबाबदारी आहे; नफ्याबरोबरच उद्देशावर लक्ष केंद्रित करणारी नैतिक वचनबद्धता असणे खूप आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर, कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या शिक्षणावर, बुद्धिमत्तेवर आणि भावनांवर परिणाम करत आहे.
आदरणीय मान्यवरहो,
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नैतिक वापरासाठी माझ्याकडे तीन सूचना आहेत. पहिली म्हणजे डेटा सार्वभौमत्वाचा आदर करताना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी डेटा फ्रेमवर्क विकसित करा. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये म्हटल्याप्रमाणे, कचरा आत टाका, कचरा बाहेर टाका. डेटा सुरक्षित, संतुलित आणि विश्वासार्ह नसेल, तर आउटपुट देखील विश्वासार्ह राहणार नाही. त्यामुळे जागतिक स्तरावर विश्वासार्ह डेटा फ्रेमवर्क आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित प्लॅटफॉर्मने त्यांचे सुरक्षा नियम स्पष्ट आणि पारदर्शक ठेवले पाहिजेत. आपल्याला ब्लॅक बॉक्स दृष्टिकोनाऐवजी ग्लास बॉक्स अर्थात पारदर्शक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे, जिथे सुरक्षा नियम पाहिले आणि पडताळले जाऊ शकतात. यामुळे स्पष्ट जबाबदारी सुनिश्चित होईल आणि नैतिक व्यावसायिक वर्तनाला प्रोत्साहन मिळेल. तिसरे म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात पेपर क्लिप समस्येचा उल्लेख अनेकदा केला जातो. एखाद्या मशीनला पेपर क्लिप बनवण्याचे ध्येय दिले गेले, तर ते जगातील सर्व स्रोत त्या एकाच कार्यासाठी समर्पित करून तेच काम करत राहील. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला स्पष्ट मानवी मूल्ये आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. तंत्रज्ञान शक्तिशाली आहे, परंतु मानव नेहमीच दिशा निश्चित करेल.
मित्रहो,
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वव्यापी प्रवासात आकांक्षित भारतीय कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका महत्त्वाची आहे, आणि आपली ही जबाबदारी ओळखून भारत आज मोठी पावले उचलत आहे. आमच्या कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थात एआय मिशनच्या माध्यमातून सध्या भारतात सध्या 38,000 जीपीयू आहेत आणि आम्ही पुढील सहा महिन्यांत 24,000 अधिक जीपीयू तैनात करत आहोत. आम्ही आमच्या स्टार्टअप्सना अतिशय परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाची संगणकीय क्षमता प्रदान करत आहोत. आम्ही एआय कोस्ट देखील स्थापित केला आहे, ज्याद्वारे 7500 पेक्षा जास्त डेटा सेट आणि 270 एआय मॉडेल्स राष्ट्रीय स्रोत म्हणून सामायिक करण्यात आले आहेत.
मित्रहो,
कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल भारताची दिशा स्पष्ट आहे, भारताचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा समस्त मानवजातीच्या फायद्यासाठीचा एक सामायिक स्रोत आहे. एकत्रितपणे आपण असे एआय भविष्य निर्माण केले पाहिजे, जे नवोन्मेषाला चालना देईल, समावेशनाला बळ देईल आणि मानवी मूल्यांना मूर्त रूप देईल. तंत्रज्ञान आणि मानवी विश्वास एकत्रितपणे काम करतील, तेव्हा जगावर एआयचा योग्य परिणाम दिसून येईल.
***
नेहा कुलकर्णी / माधुरी पांगे/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230623)
अभ्यागत कक्ष : 8