पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांचा भारत दौरा

Posted On: 19 FEB 2026 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान  18-19 फेब्रुवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.19 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते भारतात आले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या त्यांच्या मागील भेटीनंतर ही त्यांची दुसरी अधिकृत भारत भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान  यांची 19 फेब्रुवारी रोजी एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भारत-संयुक्त अरब अमिरात सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. ही भागीदारी मजबूत राजकीय, सांस्कृतिक, व्यापार, ऊर्जा आणि परस्पर नागरिक संबंधांवर आधारित आहे. दोन्ही नेत्यांनी संयुक्त अरब अमीरतीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान  तसेच अबू धाबी आणि दुबईच्या राजघराण्यातील इतर सदस्यांच्या अलिकडच्या यशस्वी भारत भेटींना  उजाळा दिला.

दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीची दखल घेतली. 18 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वसमावेशक  आर्थिक भागीदारी करारा  (CEPA) वर स्वाक्षरी होऊन चार वर्षे झाली आहेत. दरम्यानच्या काळात द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीत उल्लेखनीय वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाय, दोन्ही नेत्यांनी महत्त्वपूर्ण द्वि-मार्गी गुंतवणूक ओघांचे  कौतुक केले, तसेच, संयुक्त अरब अमिरातीच्या सार्वभौम संपत्ती निधीने भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांनी ल'इमाद या नव्या सार्वभौम निधीच्या माध्यमातून परस्पर फायद्यासाठी ही भागीदारी अधिक बळकट करण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित केले. अवकाश, अणुऊर्जा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासारख्या धोरणात्मक क्षेत्रात भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील सहयोगी संधींवर देखील दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी पुढील उपक्रमांचे स्वागत केले, जे  पारंपारिक तसेच सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत :

आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य आणि प्रतिबंध मंत्रालय यांच्यातील सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देणे: हा सामंजस्य करार व्यावसायिक देवाणघेवाण, संस्थात्मक सहकार्य, संशोधन, डिजिटल आरोग्य, औषधनिर्माण आणि दोन्ही देशांच्या नागरिकांना फायदेशीर असलेल्या आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकासाच्या संयुक्त प्रयत्नांना प्रोत्साहन देईल.

भारतात सुपरकॉम्प्युटर क्लस्टर तैनात करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडॅक), G42 आणि मोहम्मद बिन झायेद युनिव्हर्सिटी ऑफ एआय यांच्यातील प्रावधान पत्राला (टर्म शीटला) अंतिम रूप देणे: 19 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान मोदी आणि संयुक्त अरब अमीरातीचे अध्यक्ष  शेख मोहम्मद बिन झायेद यांनी संयुक्तरित्या जाहीर केलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची ही सुरुवात आहे. हे  सुपरकॉम्प्युटर क्लस्टर एआय इंडिया मिशनचा भाग असेल, ज्यामुळे ते संशोधन, अनुप्रयोग विकास आणि व्यावसायिक वापरासाठी सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्राला उपलब्ध होईल.

गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये अबू धाबी नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय 

शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नहयान  यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. पुढील एआय शिखर परिषदेचे आयोजन स्वित्झर्लंडकडून आणि त्यानंतर संयुक्त अरब अमिराती कडून होणार असल्याच्या उपक्रमाचे पंतप्रधानांनी स्वागत केले.

या भेटीमुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील नियमित उच्च-स्तरीय संवादाची परंपरा अधिक दृढ झाली. तसेच भारत-संयुक्त अरब अमिरात तंत्रज्ञान भागीदारीत ए आय आणि प्रगत तंत्रज्ञानांना द्विपक्षीय संबंधांच्या प्रमुख स्तंभांपैकी एक म्हणून उंचावण्याच्या राजकीय वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी झाली.  


सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(Release ID: 2230525) अभ्यागत कक्ष : 7