पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन


कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी इतिहासातील एका परिवर्तनीय घडामोडींचा अध्याय : पंतप्रधान

कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण करणे ही आपली गरज आहे, हे तंत्रज्ञान विशेषतः ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांसाठी समावेशकता आणि सक्षमीकरणाचे साधन बनले पाहिजे : पंतप्रधान

आपल्या संबोधनातून पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धिमत्ते विषयी मांडला मानव हा (एम.ए.एन.ए.व्ही.) दृष्टिकोन - नीती आणि मूल्याधारित व्यवस्था, उत्तरदायी प्रशासन, राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुलभ उपलब्धता आणि समावेशक, वैध आणि कायदेशीर

मानव आणि बुद्धिमत्ता विषयक व्यवस्था एकत्रितपणे निर्मिती करत असलेल्या, एकत्रितपणे काम करत असलेल्या आणि एकत्रितपणे विकसित होत असलेल्या युगात आपण प्रवेश करत आहोत, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे आपल्या कामांना अधिक विद्वत्तापूर्ण, अधिक कार्यक्षम आणि अधिक परिणामकारक स्वरुप प्राप्त होईल : पंतप्रधान

आपण सगळ्यांना जागतिक जनहितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हा सामूहिक संकल्प विकसित करायला हवा : पंतप्रधान

एआयमध्ये भारताला संधी आणि उद्याचा आराखडा दिसतो: पंतप्रधान

Posted On: 19 FEB 2026 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. जगभरातील एक षष्ठांश मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असलेल्या भारातात, जगातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक एआय इम्पॅक्ट समिट परिषद होत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे, तंत्रज्ञान विषयक कौशल्यांच्या बाबतीत सर्वात मोठे मनुष्यबळ भारतात आहे, यासोबतच भरभराटीला आलेली  तंत्रज्ञानाधारीत परिसंस्थाही भारतात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत केवळ नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करत नाही, तर अभूतपूर्व वेगाने तंत्रज्ञानाचा अवलंबही करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 140 कोटी भारतीय नव्या तंत्रज्ञानांचा अंगिकार करण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्यांच्या वतीने त्यांनी, या परिषदेसाठी आलेल्या विविध देशांचे प्रमुख, जागतिक एआय विषयक परिसंस्थेतील आघाडीची व्यक्तिमत्वे आणि या परिषदेत सहभागी झालेल्या संशोधकांचे स्वागतही केले. या सगळ्यांनी नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. या परिषदेचे यजमानपद भूषवणे ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या प्रत्येक देशासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या परिषदेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील जगातील सर्व दिग्गज एका ठिकाणी आले आहेत, या परिषदेतील 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी आणि जगभरातील प्रतिष्ठित सहभागींच्या सहभागामुळे या परिषदेच्या यशाने नवी उंची गाठली आहे असे त्यांनी सांगितले. या परिषदेत युवा पिढीतील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत,  यामुळे एक नवा आत्मविश्वास निर्माण होऊ लागला असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सहसा नवीन तंत्रज्ञानाकडे सुरुवातीच्या काळात संशयाने पाहिले जाते, मात्र जगभरातील युवा वर्गाने ज्या वेगाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, या तंत्रज्ञानावर स्वतःची छाप सोडत ज्या पद्धतीने त्याचा वापर करण्याची वृ्त्ती दाखवली आहे ती अभूतपूर्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या शिखर परिषदेतील प्रदर्शन हे युवा प्रतिभेच्या उत्साहाने भारलेले असल्याचे त्यांनी सांगितले.  कृषी, संरक्षण, दिव्यांगांसाठीची सहाय्यक साधने आणि बहुभाषिक लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासंबंधित विविध क्षेत्रांअंतर्गत मांडलेल्या उपाययोजनांमधून मेड इन इंडियाची ताकद दिसून येते, त्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताच्या नवोन्मेषाचेही दर्शन होते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

मानवी इतिहासामध्ये दर काही शतकांनी मानवी संस्कृतीची दिशाच पूर्णपणे बदलून टाकणारे वळण येत असते असे ते म्हणाले. अशाच महत्त्वाच्या असलेल्या क्षणांमुळे विकासाचा वेग बदलतो, त्यासोबतच आपल्या विचार करण्याची, समजून घेण्याची तसेच काम करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलून जात असते असे त्यांनी सांगितले. अशाप्रकारच्या परिवर्तनाच्या मोठ्या काळात, याचा प्रभाव नेमका किती आहे, हे अनेकदा त्यावेळी लक्षात येत नाही असे ते म्हणाले. जेव्हा दगडांच्या घर्षणातून पहिल्यांदा ठिणग्या निर्माण झाल्या होत्या, तेव्हा तीच ठिणगी पुढे मानवी संस्कृतीचा आधारभूत पाया बनणार असल्याची कल्पना त्यावेळी कोणीही केली नव्हती असेही त्यांनी सांगितले. केवळ मुखाने बोलल्या जाणाऱ्या भाषेचे ज्यावेळी पहिल्यांदा लिप्यांमध्ये रूपांतर झाले, तेव्हा हे लिखित ज्ञानच भविष्यातील सर्व व्यवस्थांचा कणा ठरणार असल्याची जाणीवही त्याकाळी कोणाला झाली नव्हती ही बाबही त्यांनी नमूद केली. इतकेच नाही तर जेव्हा पहिल्यांदा बिनतारी पद्धतीने संकेतांच्या स्वरुपात संदेश पाठवले गेले होते, तेव्हा एक दिवस संपूर्ण जग वास्तव काळात परस्परांच्या संपर्कात येईल अशी कल्पनाही त्यावेळी कोणी करू शकले नसेल असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवी संस्कृतीला असेच एक नवे ऐतिहासिक वळण देणाऱ्या परिवर्तनीय घडामोडींप्रमाणेच मोठी बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज आपल्याला जे काही दिसते आहे किंवा जे काही भाकीत वर्तवले जात आहे, ती केवळ या तंत्रज्ञानामुळे पडलेल्या प्रभावाची सुरुवातीची चिन्हे आहेत असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तमुळे केवळ यंत्रेच बुद्धिमान होत नाहीत तर या तंत्रज्ञानामुळे मानवी क्षमतांमध्येही अनेक पटींनी वाढ होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. मात्र, या बदलांचा अभूतपूर्व वेग आणि त्यांची अनपेक्षित व्याप्ती हाच यावेळचा मुख्य फरक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यापूर्वी एखाद्या तंत्रज्ञानाचा समाजावरचा प्रभाव दिसून येण्यासाठी दशके लागायची, मात्र आता यंत्र शिक्षणापासून (मशीन लर्निंग) ते शिकणाऱ्या यंत्रांच्या (लर्निंग मशीन्स) दिशेने प्रवास होत असून, ही वाटचाल अत्यंत वेगवान, अधिक गहिरी आणि व्यापक आहे असल्याची बाब त्यांनी नमूद केली. या सर्व प्रक्रियांसाठी व्यापक स्वरुपाच्या दृष्टीकोनाची आणि तितक्याच व्यापक उत्तरदायित्वाची गरज असल्याचे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. विद्यमान पिढीसोबतच, भविष्यातील पिढ्यांच्या हाती आपण नेमक्या कोणत्या स्वरूपातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सोपवणार आहोत, याचा विचार आजच्याच पिढीला करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे भविष्यात काय घडू शकते हा खरा प्रश्न नाही, तर त्याही पलिकडे या तंत्रज्ञानासोबत आणि त्याच्या आधारे काय केले पाहिजे याबद्दल आजच्या वर्तमानकाळातील पिढी काय निर्णय घेते हा खरा प्रश्न आहे, असे त्यांनी नमूद केले. याबद्दल सांगताना त्यांनी अणुऊर्जेचा दाखला दिला. मानवी संस्कृतीने अणुऊर्जेची विध्वंसक ताकद आणि सकारात्मक योगदान अशा दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतला आहे असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान देखील अशाच प्रकारची एक परिवर्तकारी शक्ती असून, आणि जर ती दिशाहीन झाली तर त्यामुळे अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण होईल, मात्र त्याला योग्य दिशा मिळाली तर हेच तंत्रज्ञान एक प्रभावशाली उपाययोजना ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेला यंत्र केंद्रीत न ठेवता ते मानव केंद्रीत कसे बनवता येईल, तसेच या तंत्रज्ञानाला अधिक संवेदनशीलतेचे आणि जबाबदारीचे स्वरुप कसे देता येईल यावर सखोल विचारमंथन करणे हाच या जागतिक एआय इम्पॅक्ट समिट चा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अर्थात सर्वांचे कल्याण आणि सर्वांचे सुख ही या परिषदेची संकल्पना असून, त्यातून भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलचा दृष्टिकोन ठळकपणे व्यक्त होतो, आणि हाच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दलचा भारताचा मुख्य निकष असल्याचे त्यांनी सांगितले. मानवाचे रूपांतर केवळ डेटा पॉईंट्स अर्थात निव्वळ माहितीसाठी किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये होऊ नये, याबद्दल आपण सावध राहायला हवे असे त्यांनी आपल्या संबोधनातून सूचवले. म्हणूनच या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे आवश्यक असल्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान हे विशेषतः ग्लोबल साऊथ अंतर्गत असलेल्या देशांसाठी समावेशकता आणि सक्षमीकरणाचे एक प्रभावी माध्यम बनले पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी आपला परिघ खुला केला पाहिजे मात्र त्याचवेळी या तंत्रज्ञानाचे नियंत्रण कायम मानवाच्या हाती राहील याची सुनिश्चिती आपण केली पाहिजे असे त्यांनी सूचवले. यासाठी त्यांनी जीपीएस यंत्रणेची उदाहरण मांडले. जीपीएस तंत्रज्ञानामुळे आपल्याला प्रवासाचा मार्ग सुचवला जातो पण अंतिम निर्णय मात्र वापरकर्त्यावरच असतो ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आजची मानवी संस्कृती कृत्रिम बुद्धिमत्तेला जी दिशा देणार आहे, त्यावरूनच उद्याच्या जगाच्या भविष्याची दिशाही ठरणार आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

नवी दिल्ली येथील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, पंतप्रधानांनी एआयसाठी भारताचे ‘मानव’ (एम.ए.एन.ए.व्ही.) व्हिजन सादर केले. त्यांनी स्पष्ट केले की एम.ए.एन.ए.व्ही. म्हणजे: 

• M –बोध‌ आणि नैतिक प्रणाली: एआय नैतिक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असले पाहिजे.

• A –  जबाबदार प्रशासन: पारदर्शक नियम आणि प्रभावी देखरेख.

• N – राष्ट्रीय सार्वभौमत्व: डेटावर त्याच्याच यथोचित मालकाचा हक्क असायला हवा .

• A – सुलभ आणि सर्वसमावेशक: एआय ही मक्तेदारी नसून गुणक असावी

• V –वैध आणि कायदेशीर: एआय वैध आणि पडताळणीयोग्य असणे आवश्यक आहे.

21व्या शतकातील एआय-चालित जगात भारताचे ‘मानव’ (एम.ए.एन.ए.व्ही.) व्हिजन मानवतेच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचा दुवा बनेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दशकांपूर्वी जेव्हा इंटरनेट सुरू झाले तेव्हा कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते, की त्यामुळे किती नोकऱ्या निर्माण होतील, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.आज एआयसाठीही हेच सत्य लागू आहे, कारण भविष्यात कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतील हे आत्ताच सांगणे कठीण आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. एआयमधील कामाचे भविष्य पूर्व-परिभाषित नाही, तर ते सामूहिक निर्णय आणि कृतींवर अवलंबून असेल यावर भर दिला. या  कामाचे भविष्य म्हणजे अशी एक नवीन संधी आहे, जी अशा नव्या युगाची सुरुवात करेल जिथे मानव आणि बुद्धिमान प्रणाली सह-निर्मिती, सह-कार्य आणि सह-विकास करतील, असे मोदी पुढे म्हणाले. एआय कामे अधिक हुशारीने, अधिक कार्यक्षमतेने आणि अधिक प्रभावीपणे करेल, ज्यामुळे चांगले डिझाइन, जलद बांधकाम आणि सुधारित निर्णयक्षमता सक्षम होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

एआय अधिकाधिक लोकांसाठी उच्च-मूल्याच्या, सर्जनशील आणि अर्थपूर्ण संधी उपलब्ध करेल, ज्यामुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होतील. कौशल्य विकास, कौशल्य पुनर्विकास आणि आजीवन शिक्षण ही एक जनचळवळ बनवण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

कामाचे भविष्य सर्वसमावेशक, विश्वासार्ह आणि मानवकेंद्रीत सेल असे प्रतिपादन करून पंतप्रधानांनी सांगितले, की जर मानवतेतील एकवाक्यता पुढे गेली तर कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी क्षमतांना नवीन उंचीवर नेईल.

पंतप्रधानांनी पारदर्शकता ही सर्वात मोठी सुरक्षा आहे असे सांगून, "सूर्यप्रकाश हे सर्वोत्तम जंतुनाशक आहे" असा उल्लेख केला. काही देश आणि कंपन्या एआयला गुप्तपणे विकसित करण्याची एक धोरणात्मक संपत्ती मानतात, असे निरीक्षण नोंदवत ते पुढे म्हणाले, की परंतु भारताचा असा विश्वास आहे की एआय जेव्हा सामायिक केला जाईल तेव्हा सर्व जगाला त्याचा लाभ होईल. खुल्या कोड आणि सामायिक विकासामुळे लाखो तरुण मनांना एआय चांगले आणि सुरक्षित बनविण्यास मदत होईल यावर त्यांनी भर दिला. त्यांनी एआयला जागतिक मालकीची वस्तू म्हणून विकसित करण्यासाठी सामूहिक संकल्प करण्याचे आवाहन केले.

जागतिक मानकांची तातडीची गरज अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी डीपफेक आणि बनावट सामग्री खुल्या समाजांना अस्थिर करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अन्नावर जशी पोषणविषयक माहिती असते त्याचा दाखला देत ते म्हणाले, की डिजिटल सामग्रीवर देखील प्रामाणिकपणाची लेबले असणे आवश्यक आहे जेणेकरून लोक वास्तविक आणि एआय-व्युत्पन्न सामग्रीमध्ये फरक करू शकतील. वाढत्या प्रमाणात एआय मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करत असल्याने वॉटरमार्किंग आणि क्लिअर सोर्स मानकांची वाढती गरज मोदींनी अधोरेखित करत तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीपासूनच विश्वास निर्माण केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

बाल सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, ज्याप्रमाणे शालेय अभ्यासक्रम तयार केले जातात, त्याचप्रमाणे एआय देखील मुलांसाठी सुरक्षित आणि कुटुंब-निर्देशित असले पाहिजे. आज दोन प्रकारचे लोक आहेत - एक ज्यांना एआयची भीती वाटते आणि दुसरे ज्यांना त्यात सुवर्णसंधी दिसतात, असे त्यांनी नमूद केले. प्रतिभा, ऊर्जा क्षमता आणि धोरणात्मक स्पष्टता यांचा पाठिंबा असलेल्या एआयमध्ये भारत संधी आणि भविष्य पाहतो, असे असे प्रतिपादन त्यांनी केले. या शिखर परिषदेदरम्यान तीन भारतीय कंपन्यांनी त्यांची एआय प्रारुपे आणि ॲप्सचा शुभारंभ केल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, की ही प्रारुपे भारतातील तरुणांच्या प्रतिभेचे  प्रतिबिंब आहेत आणि जागतिक एआयच्या क्षेत्रात भारत देत असलेल्या उपायांची खोली आणि विविधता दर्शवितात.

भारत सेमीकंडक्टर आणि चिप-मेकिंगपासून ते क्वांटम कॉम्प्युटिंगपर्यंत एक लवचिक परिसंस्था तयार करत आहे, असे विधान पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. सुरक्षित डेटा सेंटर, एक मजबूत माहिती तंत्रज्ञान कणा आणि गतिमान स्टार्टअप परिसंस्था भारताला परवडणाऱ्या, स्केलेबल आणि सुरक्षित एआय सोल्यूशन्ससाठी एक नैसर्गिक केंद्र बनवते यावर त्यांनी भर दिला. भारतात विविधता, भौगोलिक वैविध्य आणि लोकशाही आहे, यावर मोदींनी भर दिला‌. भारतात यशस्वी होणारे कोणतेही एआय मॉडेल जागतिक स्तरावर तैनात केले जाऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगाला 'डिझाइन आणि डेव्हलप इन इंडिया;डेव्हलप टू द वर्ल्ड; डेव्हलप टू ह्युमॅनिटी' (भारतात तयार करा, जगाला आणि मानवतेला भेट द्या ) या आवाहनासह निमंत्रण दिले. सर्व सहभागींना शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमात फ्रान्स प्रजासत्ताकाचे अध्यक्ष, महामहिम इमॅन्युएल मॅक्रॉन, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस, राष्ट्रप्रमुख, मंत्री, बहुपक्षीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि तंत्रज्ञान आणि एआय उद्योगातील नेते असे मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय म्हणजेच सर्वांचे कल्याण, सर्वांचे हित अशी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 याची संकल्पना आहे. भारताला एआय क्षेत्रात एक अग्रणी म्हणून स्थान मिळवून देणे आणि अशा भविष्याची कल्पना करणे जिथे एआय मानवतेची प्रगती साधेल, समावेशक विकासाला चालना देईल आणि आपल्या सर्वांच्या पृथ्वीग्रहाचे रक्षण करेल.

जन, पृथ्वी आणि प्रगती,या तीन स्तंभांवर आधारित सात कार्यगट या शिखर परिषदेचे नेतृत्व करत आहेत: विविध क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभाव दर्शवित ठोस परिणाम देण्यावर हे गट काम करतील. आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी एआय; संसाधनांच्या लोकशाहीकरणासाठी एआय; सामाजिक सक्षमीकरणातील  समावेश; सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय; मानवी भांडवल; विज्ञान; लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता,अशा सात संकल्पना याअंतर्गत आहेत:

या शिखर परिषदेत 500 हून अधिक जागतिक एआय धुरीण एकत्र येतील, ज्यात सुमारे 100 प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक (सीईओ/सीएक्सओ),150 शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक आणि 400 सीटीओ, उपाध्यक्ष आणि जनहितैषी व्यक्तींचा समावेश असेल. तसेच यामध्ये 100 हून अधिक सरकारी प्रतिनिधी देखील सहभागी होतील, ज्यात 20 हून अधिक राज्यांचे आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्री यांचा समावेश असेल.

 

नितीन फुल्लुके /तुषार पवार /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2230301) अभ्यागत कक्ष : 20