‘'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड', म्हणजेच ‘भारतात निर्मिती, जगासाठी निर्मिती’, या उपक्रमांतर्गत भारताला कंटेंट, अर्थात आशय निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरून, वेव्हज (WAVES) चे आयोजन करण्यात आले. या परिषदेने भारतीय निर्माते, उत्पादक आणि स्टार्टअप्सना जागतिक खरेदीदार, गुंतवणूकदार, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि 100 हून अधिक देशांमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधण्यासाठी एकात्मिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
अॅनिमेशन, गेमिंग, एआर/व्हीआर आणि संगीत यासारख्या श्रेणींमधील 33 सर्जनशील आव्हानांद्वारे देशव्यापी सर्जनशील प्रतिभेची ओळख आणि संगोपन उपक्रम असलेल्या ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस (सीआयसी)’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातील एक लाखाहून अधिक निर्मात्यांनी नोंदणी केली. स्पर्धेतील विजेत्यांना मेलबर्न, ओसाका, टोरंटो, टोकियो, माद्रिद, बुसान आणि कान, यासारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहभाग, प्रदर्शन आणि बी२बी (B2B) बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी सहाय्य केले जात आहे. इंडियाजॉय, आयजीडीसी आणि इफ्फी गोवा, यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये देखील ही संधी प्रदान करण्यात आली, ज्यामुळे सीआयसीला निर्मात्यांचा शोध आणि बौद्धिक संपदा निर्मितीचे एक प्रमुख इंजिन म्हणून स्थान मिळाले.
मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रासाठी स्टार्टअप प्रणित नवोन्मेष आणि इनक्युबेशन प्लॅटफॉर्म असलेले वेव्हएक्स, हे रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेला समर्थन देते. सध्या, वेव्हएक्स भौतिक आणि हायब्रीड मॉडेल अंतर्गत 34 स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत असून, यासाठी 100 हून अधिक अर्ज प्रतीक्षेत आहेत. कलासेतू आणि भाषासेतू आव्हानांअंतर्गत निवड झालेले 10 स्टार्टअप्स यापूर्वीच सरकारी संस्थांबरोबर प्रायोगिक तत्वावर काम करत आहेत. टी-हब, हैदराबाद आणि एफआयटीटी, आयआयटी दिल्ली यांच्याबरोबर संस्थात्मक भागीदारीद्वारे वेव्हएक्सची मोठ्या प्रमाणात व्याप्ती अपेक्षित आहे. आयआयसीटी, एफटीआयआय, आयआयएमसी आणि इतर संस्थांमधील भागीदार इनक्यूबेटर्सबरोबर संपूर्ण देशभरात प्रोत्साहन, आणि संशोधन आणि विकास, हे याचे उद्दिष्ट आहे.
वेव्हज बझार वर्षभर चालणारे डिजिटल मार्केटप्लेस म्हणून कार्यरत असून, ते भारतीय दृकश्राव्य सामग्रीसाठी बी2बी बैठका, परवाना, सह-निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश प्रदान करते. सध्या, वेव्हज बझार मध्ये 6,000 हून अधिक विक्रेते आणि 4,000 हून अधिक नोंदणीकृत खरेदीदार आणि कंपन्या आहेत, यामुळे 8,000 हून अधिक बी2बी बैठका झाल्या आहेत. बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यावसायिक सहभागासाठी एक शाश्वत व्यासपीठ म्हणून ते सुरू ठेवले जात आहे. वेव्हज व्यतिरिक्त, चार खंडांमधील दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून, वेव्हज बझार ने बी2बी बैठका आणि अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याची सुविधा दिली, यामुळे सह-उत्पादन, परवाना, गुंतवणूक भागीदारी आणि जागतिक बाजारपेठेतील प्रवेशाला समर्थन मिळाले.
कौशल्य विकास, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला अधिक बळकटी देण्यासाठी वेव्हएक्स इनक्युबेशन सेंटर्सचा विस्तार आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसची निरंतर अंमलबजावणी केली जात आहे. जागतिक तज्ञांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा आणि ज्ञानसत्रे सर्जनशील मनुष्यबळाच्या कौशल्यात वाढ करण्यामध्ये महत्वाचे योगदान देत आहेत. सर्जनशील प्रतिभेचे शाश्वत उपजीविकेत रूपांतर करणे आणि भारतीय दृकश्राव्य सामग्रीच्या निर्यातीत वाढ करणे, हे वेव्हज बझारच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सातत्याने पोहोच वाढवण्यामागचे उद्दिष्ट, आहे.
माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी राज्यसभेत दीपक प्रकाश, उज्ज्वल देवराव निकम आणि केसरीदेवसिंह झाला यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
***
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2227871)