रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 172 स्थानकांचे काम पूर्ण: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव


भारतीय रेल्वे वर्षातून दोनदा सर्व पुलांची तपासणी करते; तर काही पुलांची त्यांच्या स्थितीनुसार वारंवार तपासणी केली जाते

रेल्वे स्थानकांवर 11650 स्टॉल्स /युनिट्स; अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती समुदायांसह पात्र अर्जदारांना वाटप

Posted On: 05 FEB 2026 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

स्थानकांचा पुनर्विकास

दीर्घकालीन दृष्टिकोनासह स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजना सुरू केली आहे. या योजनेत स्थानके सुधारण्यासाठी बृहत आराखडा तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. बृहत आराखडामध्ये  समाविष्ट बाबी पुढीलप्रमाणे :

• स्थानक  आणि त्याच्या परिचालन क्षेत्रातील प्रवेश सुलभ बनवणे

•  स्थानकाला शहराच्या दोन्ही बाजूंनी जोडणे

• स्थानक  इमारतीत सुधारणा

• प्रतीक्षालय, शौचालये, बसण्याची व्यवस्था, पेयजल व्यवस्था  सुधारणे

• दिव्यांगजनांसाठी सुविधा

• उत्तम प्रवासी सूचना प्रणाली

• प्रत्येक स्थानकावर आवश्यकतेनुसार  एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय संबंधित बैठकांसाठी निर्धारित  जागा, लँडस्केपिंग इत्यादींची तरतूद

 या योजनेअंतर्गत आतापर्यंत  1337 स्थानके विकासासाठी निवडण्यात आली  आहेत. तर 172  स्थानकांची कामे आतापर्यंत  पूर्ण झाली आहेत.

पुलांची सुरक्षा

  • सर्व पुलांची वर्षातून दोनदा नियुक्त अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते, एकदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि एकदा पावसाळ्यानंतर सखोल  तपासणी केली जाते  . याव्यतिरिक्त, मुख्य पूल अभियंता यांनी ठरवल्यानुसार काही पुलांची त्यांच्या स्थितीनुसार वरचेवर तपासणी केली जाते. महत्त्वाच्या आणि प्रमुख पुलांची व्यापक तांत्रिक तपासणी अशा प्रकारे केली जाते ज्यात अशा पुलांपैकी 20% पुलांची वार्षिक तपासणी केली जाते.
  • पुलांची दुरुस्ती/मजबुतीकरण/पुनर्वसन/पुनर्बांधणी ही एक निरंतर  आणि चालू राहणारी  प्रक्रिया आहे आणि ती पुलांच्या तपासणीच्या आधारे केली जाते. वर्ष 2022-2025 दरम्यान (डिसेंबर 2025 पर्यंत), भारतीय रेल्वेमध्ये 8,626 रेल्वे पुलांची दुरुस्ती/पुनर्वसन/मजबुतीकरण/पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

रेल्वेच्या डब्यांची (कोच)  निर्मिती

सध्या, रेल्वे मंत्रालयाअंतर्गत देशात रेल्वेगाडीचे डबे तयार करणारे तीन कारखाने कार्यरत आहेत.  या कारखान्यांच्या विकासाचा खर्च, स्थान, डब्यांचा प्रकार , नियोजित उत्पादन क्षमता आणि स्थापित करावयाची यंत्रसामग्री आणि संयंत्र  यासारख्या घटकांवर अवलंबून असतो.

शिवाय, इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, रेल कोच फॅक्टरी कपूरथला आणि मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेली या तीन कार्यरत कारखान्यांच्या अपग्रेडेशन/विस्ताराशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी 2443 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स

प्रवास करत असलेल्या प्रवाशांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, रेल्वे स्थानकांवरील दुकानांचे (स्टॉल्स) वितरण, प्रचलित धोरणानुसार ई-लिलाव किंवा ई-निविदा प्रक्रियेद्वारे केले जाते.

सध्या रेल्वे स्थानकांवर 11650 दुकाने/युनिट्स कार्यरत आहेत. त्यांचे वाटप अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायातील अर्जदारांसह सर्व पात्र अर्जदारांना करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवर विनामूल्य दुकाने वाटप करण्याची कोणतीही तरतूद सध्याच्या धोरणात उपलब्ध नाही.

स्वच्छता

स्वच्छता ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून भारतीय रेल्वेच्या वतीने रेल्वेगाड्यांच्या डब्यांची योग्य देखभाल आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छतागृहांसह रेल्वे डब्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भात देखरेखीसाठी रेल्वेने  विविध उपाययोजना केल्या आहेत:

डब्यांचे अंतर्गत भाग, बाह्य भाग आणि स्वच्छतागृहांच्या उत्तम स्वच्छतेसाठी प्राथमिक देखभालीदरम्यान डब्यांच्या स्वच्छतेसाठीची यांत्रिकीकृत प्रक्रिया राबवली जाईल याची सुनिश्चिती केली गेली आहे.

रेल्वे प्रवासात असताना स्वच्छता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्यक्ष त्या गाडीतच स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून दिली जाते.

ठराविक रेल्वे गाड्यांच्या प्रवासादरम्यान, त्यांच्या नियोजित थांब्यांवर स्वच्छतागृहांसह डब्यांची यांत्रिकीकृत स्वच्छता करण्याच्या उद्देशाने, स्वच्छता रेल्वे स्थानक सेवा सुरू करण्यात आली आहे. या स्थानकांवर, उच्च दाबाच्या जेट मशिन आणि स्वच्छता उपकरणांनी सज्ज असलेले कर्मचाऱ्यांचे समर्पित पथक, डब्यातील स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि त्यानंतर ती कोरडी करण्याचे काम करते.

सर्व प्रवासी डब्यांमध्ये जैव शौचालयं बसवण्यात आली आहेत, यामुळे डब्यातून मानवी विष्ठा रेल्वे रुळांवर पडणार नाही याची सुनिश्चिती झाली आहे, तसेच स्वच्छतेचा दर्जा सुधारला आहे.

जैव शौचालयासाठीच्या सविस्तर तरतुदी खाली दिल्या आहेत : 

अन्न आणि खाद्य पुरवठा

प्रवाशांचा अभिप्राय घेण्यासाठी, गेल्या काही वर्षांत रेलमदद पोर्टल सुरू केले असून, त्या माध्यमातून भारतीय रेल्वेची तक्रार व्यवस्थापन प्रणाली अधिक बळकट, सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे. रेलमदद पोर्टलच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवाशांना तक्रारी आणि सूचना नोंदवण्यासाठी एकल खिडकी व्यवस्थेची सोय उपलब्ध करून दिली आहे.

रेल्वेमधील खाद्य पुरवठा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) आणि रेल्वेचे अधिकारी नियमित तसेच अचानकही तपासणी करत असतात.

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


सोनाली काकडे/सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2224104) अभ्यागत कक्ष : 13