अर्थ मंत्रालय
जागतिक धक्क्यांना तोंड देण्याइतकी लवचिकता दर्शवणारी भारताची बाह्य कामगिरी : आर्थिक सर्वे्हक्षण 2025-26
जागतिक वस्तू निर्यातीमध्ये वर्ष 2005 ते 2024 दरम्यान भारताचा वाटा जवळपास दुप्पट होवून 1% वरून 1.8% पर्यंत झाला
‘यूएनसीटीएडी’ ने भारताला व्यापार भागीदार विविधीकरणामध्ये अग्रगण्य अर्थव्यवस्थेचे दिले स्थान; विकसनशील ‘ग्लोबल साउथ’ मध्ये मिळाले तिसरे स्थान
जागतिक अनिश्चितता असूनही, आर्थिक वर्ष 26 मध्ये निर्यातीची गती कायम; पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात नोंदवली
सेवा क्षेत्रात निर्यातीने आर्थिक वर्ष 25 मध्ये 13.6 % वाढीसह 387.6 अब्ज डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला
आर्थिक वर्ष 25 मध्ये दूरसंचार उपकरणांच्या निर्यातीत 51.2 टक्के (वार्षिक) लक्षणीय वाढ
Posted On:
29 JAN 2026 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक सर्वे्हक्षण 2025-26 सादर केले. या आर्थिक सर्वे्हक्षणानुसार, भारताची बाह्य कामगिरी जागतिक धक्क्यांना तोंड देण्याची लवचिकता दर्शवते आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी संबंधित संरचनात्मक वैशिष्ट्ये अधोरेखित करते. अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेशी अधिक सखोलतेने जोडली जात आहे.
भारताच्या व्यापार कामगिरीतील कल
आर्थिक सर्वेक्षणानुसार, जागतिक वस्तू निर्यात आणि व्यावसायिक सेवा निर्यात या दोन्हीमधील वाढत्या हिस्सा लक्षात घेतला तर त्यावरून जागतिक व्यापारामध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून देशाची सातत्यपूर्ण प्रगती दिसून येते. ‘डब्ल्यटीओ’ च्या जागतिक व्यापार आकडेवारीनुसार, 2005 ते 2024 दरम्यान, जागतिक वस्तू निर्यातीमध्ये भारताचा वाटा 1 टक्क्यांवरून 1.8 टक्क्यांपर्यंत वाढून जवळपास दुप्पट झाला आहे. त्याचप्रमाणे, जागतिक व्यावसायिक सेवा निर्यातीमधील देशाचा हिस्सा 2 टक्क्यांवरून 4.3 टक्क्यांपर्यंत वाढला, म्हणजेच दुप्पटपेक्षा जास्त झाला आहे.
भारताने जागतिक व्यापारातील आपला हिस्सा वाढवला तर आहेच; त्याचबरोबर आपल्या भागीदारीत आणि व्यापार केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या श्रेणीतही विविधता आणली आहे. यूएनसीटीएडी- ‘अंकटाड’च्या व्यापार आणि विकास अहवाल-2025 नुसार, व्यापार भागीदारांच्या विविधीकरणात भारताची गणना आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये केली आहे. विकसनशील ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ‘ग्लोबल नॉर्थ’ अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त व्यापार विविधता असलेला देश म्हणून भारताची नोंद झाली आहे. वस्तूंच्या व्यापार विविधता निर्देशकांच्या बाबतीत, भारत ‘ग्लोबल साउथ’मधून थायलंड, चीन आणि तुर्कीनंतर चौथ्या क्रमांकावर असून तो निर्देशांक 0.88 आहे.

आर्थिक वर्ष 25 मध्ये भारताची एकूण निर्यात 825.3 अब्ज डॉलर्स इतकी झाली असून ती विक्रमी आहे. या निर्यातीमध्ये वार्षिक 6.1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ प्रामुख्याने सेवा निर्यातीतील जोरदार वाढीमुळे झाली. यामध्ये 13.6 टक्के (वार्षिक) वाढ झाली. जागतिक अनिश्चितता असूनही, देशाच्या निर्यातीची गती आर्थिक वर्ष 26 मध्येही कायम राहिली. यामध्ये पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात नोंदवली गेली.
वस्तूंचा व्यापार
आर्थिक वर्ष 25 मध्ये, भारताने केलेली वस्तूंची एकूण निर्यात 437.7 अब्ज डॉलर्स होती. त्यामध्ये पेट्रोलियम-व्यतिरिक्त वस्तूंची निर्यात 374.3 अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली. इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि ऑटोमोबाईल्स हे निर्यातीतील वाढीचे प्रमुख चालक म्हणून उदयास आले. त्यांच्या उच्च-मूल्याच्या उत्पादन क्षेत्रांमध्ये वाढती स्पर्धात्मकता दर्शवते.
आर्थिक सर्वे्हक्षणानुसार, आर्थिक वर्ष 25 मध्ये दूरसंचार उपकरणांच्या निर्यातीत 51.2 टक्के (वार्षिक) लक्षणीय वाढ झाली, तर औषध निर्मिती आणि जैविक उत्पादनांच्या निर्यातीत 11.2 टक्के (वार्षिक) वाढ झाली. हे कल देशाची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील वाढती ताकद दर्शवतात आणि जागतिक फार्मास्युटिकल केंद्र म्हणून भारताचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित करतात.
कृषी निर्यात आर्थिक वर्ष 20 मध्ये 34.5 अब्ज डॉलर्स होती. ती आर्थिक वर्ष 25 मध्ये 51.1 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. यामध्ये 8.2 टक्के सीएजीआर नोंदवला गेला. पुढील चार वर्षांत कृषी, सागरी उत्पादने आणि अन्न आणि पेये यांची एकत्रित निर्याती 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचविण्याची क्षमता देशात आहे.
सर्वे्हक्षणानुसार, पीएलआय म्हणजे उत्पादनाशी संलग्न सवलत योजनेमुळे मोबाईल उत्पादन, विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटक, सक्रिय फार्मास्युटिकल घटक, वैद्यकीय उपकरणे यांसारख्या क्षेत्रांच्या व्यापार कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत, या क्षेत्रातील निर्यातीचा सरासरी वार्षिक वाढीचा दर 10.6 टक्के राहिला आहे, तर आयातीमध्ये 12.6 टक्के सरासरी वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.
आर्थिक वर्ष 2001 ते आर्थिक वर्ष 2025 दरम्यान, औषधनिर्मिती क्षेत्रातील निर्यात 1.9अब्ज डॉलर्स होती, ती आर्थिक वर्ष 2025 मध्ये 30.5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. यामध्ये बाजारपेठेतील विविधीकरण, नियामक सुसंवाद आणि क्षमता वाढीमुळे झालेली जवळपास 16 पटींची वाढ दर्शवते.
आयातीच्या बाबतीत, आर्थिक वर्ष 2025 मध्ये वस्तूंच्या आयातीत 6.3 टक्के (वार्षिक) वाढ झाली आणि ती 721.2अब्ज डॉलर्सवर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने पेट्रोलियम-व्यतिरिक्त, रत्ने आणि दागिने-व्यतिरिक्त आयातीमध्ये झालेल्या वाढीमुळे झाली. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 421 अब्ज डॉलर्स होती. ती आता 446.5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. हा कल महत्त्वाच्या मध्यवर्ती वस्तू आणि भांडवली वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे दिसून येतो. यावरून देशांतर्गत मागणीची लवचिकता दिसून येते.

अलीकडेच झालेल्या भारत-यूके सीईटीए आणि भारत-ओमान सीईपीए सह मुक्त व्यापार करारांचे विस्तारणारे जाळे, आणि अमेरिका, चिली, पेरू यांच्यासोबत सुरू असलेले संवाद, भारताच्या विविधीकृत व्यापार धोरणाला बळकटी देतात आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये सखोल एकात्मतेला पाठिंबा देतात. न्यूझीलंड आणि युरोपियन युनियनसोबतच्या मुक्त व्यापार करारांसाठीच्या वाटाघाटी अनुक्रमे डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 मध्ये पूर्ण झाल्या.
सेवा व्यापार
सेवा निर्यात आर्थिक वर्ष 2025 मध्ये 387.6 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. यामध्ये 13.6 टक्के वाढ झाली. त्यामुळे तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सेवांसाठी जागतिक केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत झाले. ही वाढ म्हणजे ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ साठी जागतिक केंद्र म्हणून देशाच्या यशाचेही परिणाम आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2025 दरम्यान 7 टक्के सीएजीआरने वाढ नोंदवली आहे.
त्याचबरोबर, सेवा आयातीत 11.4 टक्के (वार्षिक) वाढ नोंदवली गेली आणि ती 198.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. आयातीमधील वाढ ही व्यावसायिक आणि वित्तीय सेवांसाठी वाढत्या आंतरराष्ट्रीय मागणीचे सूचक आहे. परिणामी, आर्थिक वर्ष 2025 मध्ये, सेवा व्यापारातील अधिशेष वाढून 188.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2220770)
अभ्यागत कक्ष : 24