अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्थैर्याकडून नवीन आयामांच्या दिशेने, भारताची सेवा निर्यातीतील वाढ महामारीपूर्व कालावधीच्या (आर्थिक वर्ष 16-आर्थिक वर्ष 20) 7.6% वरून दुपटीने वाढून आर्थिक वर्ष 23-आर्थिक वर्ष 25 दरम्यान 14% झाली


आर्थिक वर्ष 26 मध्ये सेवा क्षेत्रात व्यापक विस्तार दिसून आला. सेवा क्षेत्रातील 9.1 ची सशक्त वाढ जीव्हीएसाठी प्रमुख चालक ठरली

माध्यम, मनोरंजन आणि अंतराळ तंत्रज्ञान सेवा क्षेत्राचे नवे विकास आयाम म्हणून उदयास आले आहेत

Posted On: 29 JAN 2026 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2026

 

भारत हा जगातील सातवा सर्वात मोठा सेवा निर्यातदार देश आहे, जागतिक सेवा व्यापारात त्याचा वाटा 2005 मधील  2% वरून दुपटीहून अधिक वाढून 2024 मध्ये  4.3% झाला आहे. “कृषी आणि उद्योगात दिसून येणाऱ्या तीव्र  चक्रीय चढ-उतारांच्या अगदी उलट सेवा क्षेत्र आहे , जे उच्च-वृद्धी आणि  कमी-अस्थिरतेचा स्तंभ  म्हणून काम करत आहे आणि  दरवर्षी 7-8 टक्के  वाढ नोंदवत आहे,” असे केंद्रीय अर्थ आणि कंपनी  व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवाल  2025-26  मध्ये नमूद केले आहे.

आर्थिक वर्ष 26 मध्ये सेवा क्षेत्रात व्यापक विस्तार दिसून आला. आर्थिक वर्ष 26  च्या पहिल्या अग्रिम  अंदाजात  सेवा क्षेत्रातील 9.1% ची सशक्त  वाढ ही जीव्हीए  वाढीसाठी प्रमुख चालक ठरली असून सर्व प्रमुख उप-विभागांमध्ये सुमारे 8% ते  9.9% वाढ नोंदली गेली  आहे.

जागतिक कल  आणि भारताचा अनुभव:

वर्ष 2024, मध्ये, जीडीपीमधील सेवा व्यापाराचा वाटा महामारीपूर्व पातळीच्या तुलनेत वाढला, जो सेवांप्रति जागतिक व्यापाराचे असमान मात्र स्थिर पुनर्संतुलन दर्शवितो. जागतिक व्यापारात सेवांची ही वाढती भूमिका भांडवल वाटपात झालेल्या परिवर्तनातून प्रतिबिंबित होते.

भारताचा अनुभव जागतिक कल  व्यापकपणे प्रतिबिंबित करतो. आर्थिक वर्ष 23 ते वित्त वर्ष 25 दरम्यान सेवा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या 80.2 होती, जी महामारीपूर्व काळात (आर्थिक वर्ष 16-20) 77.7% होती. ही गुंतवणूक माहिती आणि संप्रेषण सेवा (25.8%) आणि व्यावसायिक सेवा (23.8%) मध्ये झाली. सेवा निर्यातीतील सरासरी वाढ महामारीपूर्व काळातील  (आर्थिक वर्ष 2016- 2020) 7.6% वरून दुपटीने वाढून आर्थिक वर्ष 23-25 मध्ये 14% झाली, जी भारतीय सेवांसाठी मजबूत आणि व्यापक-आधार असलेली  जागतिक मागणी दर्शवते.

एकूण सेवा निर्यातीपैकी 40%  पेक्षा जास्त वाटा असलेल्या सॉफ्टवेअर सेवा या  वाढीच्या प्रमुख चालक आहेत. 

राज्यस्तरीय आणि क्षेत्रस्तरीय गतिमानतेवरील नीती आयोगाच्या निष्कर्षांनुसार कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा सारखी राज्ये आयटी, वित्त आणि व्यावसायिक सेवांसारख्या आधुनिक, उच्च-उत्पादकता सेवांद्वारे एकत्रितपणे सेवा उत्पादनात जवळपास 40% योगदान देतात, परिणामी अधिक  शहरीकरण झालेल्या राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिण भारतात उत्पादनाचे केंद्रीकरण होते.

सेवा: रोजगाराचा प्रमुख चालक

आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे की आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या दोन तिमाहीतील पीएलएफएस डेटानुसार, शहरी रोजगारात सेवांचा वाटा 61.9 % पर्यंत वाढला, जो आर्थिक वर्ष 21- 22 च्या सरासरी  61.7% पेक्षा किंचित जास्त आहे. महामारीच्या काळात सेवा-क्षेत्रात   तुलनेने अधिक भर्ती झाली होती.

उप-क्षेत्राची  कामगिरी आणि उत्प्रेरक:

आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की आर्थिक वर्ष 24  मध्ये, प्रवास आणि पर्यटनाने जीडीपीमध्ये 5.22% योगदान दिले, जे महामारीपूर्व पातळीच्या जवळपास होते, ज्यामुळे अंदाजे 8.46 कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार (एकूण रोजगाराच्या सुमारे 13.3) निर्माण झाले. या वाढीला अनुरूप, पर्यटनातून परकीय चलनाची कमाई 2024 मध्ये 35 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी  2023 च्या तुलनेत 8.8% अधिक  आहे. देशांतर्गत पर्यटन या क्षेत्राचा कणा राहिला.
परदेशी पर्यटक आगमन (FTA) आणि अनिवासी भारतीयांचे (NRI) आगमन यासह आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमन (ITA) 20.57 दशलक्ष झाले, जे 2023 च्या तुलनेत 8.9% ने  वाढले आहे.

भारतातील तंत्रज्ञान स्टार्ट-अप परिसंस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परिसंस्था असून यामध्ये आता सुमारे 32,000-35,000 स्टार्ट-अप्स आहेत, ज्यामध्ये कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये 2,000 हून अधिक स्टार्ट-अप्सची भर पडली आहे, ज्यामध्ये 2025 मध्ये 900 हून अधिक वित्त-पोषित  स्टार्ट-अप्सचा समावेश आहे.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र हे भारताच्या सेवा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक बनले आहे, ज्यामध्ये दृक-श्राव्य निर्मिती, प्रसारण, डिजिटल सामग्री, अॅनिमेशन आणि गेमिंग, जाहिरात आणि लाईव्ह  मनोरंजन यांचा समावेश आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2220114) अभ्यागत कक्ष : 83