पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ मधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्याला केले संबोधित
भारतात आयुर्वेद हे केवळ एका कालखंडापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित नाही तर कित्येक युगांपासून ही प्राचीन वैद्यकीय प्रणाली आपल्याला आयुष्य समजून घेण्याचा, संतुलन साधण्याचा, निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याचा मार्ग दाखवत आहे: पंतप्रधान
आपण सातत्याने प्रतिबंधात्मक आरोग्यावर भर देत आहोत, हेच उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय आयुष मोहीम राबवण्यात आली आहे: पंतप्रधान
आपण बदलत्या काळाशी एकरुप झाले पाहिजे आणि आयुर्वेदात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अवलंब केला पाहिजे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2026 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केरळमधील आर्य वैद्यशाळा धर्मादाय रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित केले. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाला भेटण्याचा योग आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आयुर्वेदाचे जतन, संरक्षण आणि त्याला आधुनिक रुप देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे, आपल्या सव्वाशे वर्षांच्या प्रवासात या संस्थेने आयुर्वेदाला उपचारांची एक प्रभावी पद्धत म्हणून प्रस्थापित केले, असे ते म्हणाले. त्यांनी आर्य वैद्यशाळेचे संस्थापक, वैद्यरत्न पी.एस. वारियर यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि आयुर्वेदाप्रति त्यांचा दृष्टिकोन आणि लोककल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देत आहे, असे सांगितले.
केरळ मधील आर्य वैद्यशाळा हे शतकानुशतके मानवतेची सेवा करणाऱ्या भारतातील उपचार पद्धतींचे जिवंत प्रतीक आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की भारतात आयुर्वेद हे केवळ एका कालखंडापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित नाही तर कित्येक युगांपासून ही प्राचीन वैद्यकीय प्रणाली आपल्याला आयुष्य समजून घेण्याचा, संतुलन साधण्याचा, निसर्गाशी सुसंवाद साधून जगण्याचा मार्ग दाखवत आहे. आज आर्य वैद्यशाळेत 600 पेक्षा अधिक आयुर्वेदिक औषधांची निर्मिती होते तसेच संपूर्ण देशात त्यांची रुग्णालये आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णसेवा करत आहेत यामध्ये जगातील 60 देशांमधील रुग्णांचाही समावेश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आर्य वैद्यशाळेने आपल्या कार्यातून हा विश्वास संपादन केला आहे आणि जेव्हा लोक अडचणीत असतात तेव्हा तेव्हा ही संस्था आशेचा एक मोठा स्रोत म्हणून उभी राहते असे पंतप्रधान म्हणाले.
आर्य वैद्यशाळेची सेवा ही केवळ एक कल्पना नाही तर आपल्या कृतीतून, दृष्टिकोनातून आणि संस्थांच्या माध्यमातून प्रतिबिंबित होणारी एक भावना आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. संस्थेचे धर्मादाय रुग्णालय गेल्या 100 वर्षांपासून लोकांची अविरत सेवा करत आहे असे सांगून पंतप्रधानांनी रुग्णालयाशी संबंधित सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी वैद्य, डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि रुग्णालयाशी संबंधित असलेल्या इतर सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि धर्मादाय रुग्णालयाच्या 100 वर्षांच्या प्रवासाची पूर्तता केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. केरळ मधील लोकांनी आयुर्वेदाची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून जिवंत ठेवली असून ते त्याचे जतन करत आहेत आणि तिचा प्रसार देखील करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
फार मोठ्या काळापर्यंत भारतातील प्राचीन औषध प्रणालीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते मात्र गेल्या 10–11 वर्षांमध्ये, या दृष्टिकोनात मोठे परिवर्तन घडून आले आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्यसेवा सुविधांकडे आता सर्वांगीण दृष्टिकोनातून पहिले जाते, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्ध आणि योगाभ्यास यांना एकाच छताखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याकरता आयुष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकार सातत्याने प्रतिबंधात्मक उपचार प्रणालीवर भर देत असून त्या दृष्टीने राष्ट्रीय आयुष मोहीम सुरु करण्यात आली आहे याशिवाय 12,000 पेक्षा अधिक आयुष निरामयता केंद्रांची स्थापना केली जाणार असून त्यात योग, प्रतिबंधात्मक काळजी आणि सामुदायिक आरोग्य सेवा यांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. देशभरातील इतर रुग्णालयांनाही आयुष सेवांशी जोडण्यात आले आहे आणि आयुष औषधांच्या नियमित पुरवठ्याकडे लक्ष दिले जात आहे. यामागे भारताच्या पारंपरिक औषध विद्येचा लाभ देशभरातील प्रत्येक भागातील लोकांपर्यंत पोहोचावा हा स्पष्ट हेतू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
सरकारी धोरणांचा स्पष्ट परिणाम आयुष क्षेत्रामध्ये दिसत असून, आयुष उत्पादन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे आणि त्याचा विस्तार होत आहे, असे अधोरेखित करून, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय पारंपरिक आरोग्यसेवा जगासमोर आणण्यासाठी, सरकारने आयुष निर्यात प्रोत्साहन परिषद स्थापन केली आहे. जागतिक बाजारपेठेत आयुष उत्पादने आणि सेवांना प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट असून, त्याचे सकारात्मक परिणाम यापूर्वीच दिसत आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले की 2014 मध्ये भारताने सुमारे 3,000 कोटी रुपये किमतीच्या आयुष आणि वनौषधी उत्पादनांची निर्यात केली होती, तर आता ही निर्यात 6,500 कोटी रुपयांपर्यंत वाढली असून, देशातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळाला आहे.
आयुष-आधारित वैद्यकीय मूल्य पर्यटनासाठी भारत एक विश्वासार्ह ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे अधोरेखित करून मोदी म्हणाले की, आयुष व्हिसासारख्या उपक्रमांमुळे परदेशी नागरिकांना आयुर्वेद आणि पारंपरिक औषधांमधील चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होत आहे.
पंतप्रधानांनी यावर भर दिला की आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी, सरकार प्रत्येक प्रमुख जागतिक व्यासपीठावर ते अभिमानाने सादर करते, मग त्या ब्रिक्स शिखर परिषदा असोत की G20 बैठका, या सर्व ठिकाणी त्यांनी आयुर्वेदाला सर्वांगीण आरोग्याचे माध्यम म्हणून प्रदर्शित केले आहे. गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेचे जागतिक पारंपरिक औषध केंद्र स्थापन केले जात आहे, आणि आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन संस्थेने तेथे यापूर्वीच आपले काम सुरू केले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुर्वेदिक औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, गंगा नदीच्या काठावर औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
आणखी एक कामगिरी नमूद करताना, मोदी म्हणाले की अलीकडेच जाहीर झालेल्या युरोपियन संघाबरोबरच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतीय पारंपरिक औषध सेवा आणि व्यावसायिकांना मोठी मागणी मिळेल. त्यांनी स्पष्ट केले की, युरोपियन संघाच्या सदस्य देशांमध्ये, जिथे नियम अस्तित्वात नाहीत, तिथे आयुष चिकित्सक भारतात मिळवलेल्या व्यावसायिक पात्रतेच्या आधारे त्यांच्या सेवा देऊ शकतील, याचा आयुर्वेद आणि योग, याच्याशी संबंधित तरुणांना मोठा लाभ मिळेल. युरोपमध्ये आयुष वेलनेस केंद्रे स्थापन करण्यासाठी देखील या करारामुळे मदत होईल असे त्यांनी नमूद केले आणि आयुर्वेद आणि आयुषशी संबंधित सर्व मान्यवरांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी सांगितले की, आयुर्वेदाच्या माध्यमातून भारत शतकानुशतके लोकांवर उपचार करत आहे, परंतु दुर्दैवाने देशात आणि मोठ्या प्रमाणात परदेशात आयुर्वेदाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पुराव्यावर आधारित संशोधन आणि संशोधन कागदपत्रांचा अभाव हे याचे एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आयुर्वेदिक पद्धतींची विज्ञानाच्या तत्त्वांवर चाचणी केली जाते तेव्हा लोकांचा विश्वास अधिक दृढ होतो, असे त्यांनी नमूद केले. सीएसआयआर आणि आयआयटी सारख्या संस्थांबरोबर सहकार्याने काम करून, आर्य वैद्यशाला यांनी विज्ञान आणि संशोधनाच्या पायावर आयुर्वेदाची सातत्याने चाचणी केली आहे, याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. या संस्थेने औषध संशोधन, क्लिनिकल संशोधन आणि कर्करोगाची काळजी यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि आयुष मंत्रालयाच्या पाठबळाने कर्करोग संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्राची स्थापना करणे, हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
बदलत्या काळानुसार, आयुर्वेदाने आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक अवलंब केला पाहिजे, ज्यामुळे रोगाच्या शक्यतांचा अंदाज वर्तवण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतींद्वारे उपचार करण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन मिळेल, यावर भर देत, परंपरा आणि आधुनिकता एकत्र येऊ शकतात आणि आरोग्यसेवा लोकांच्या जीवनात विश्वासाचा पाया बनू शकते, हे आर्य वैद्यशाळेने दाखवून दिल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मोदी यांनी नमूद केले की संस्थेने आधुनिक गरजा स्वीकारताना, उपचार प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करून, रुग्णांना सेवा पुरवताना आयुर्वेदाची प्राचीन समज जपली आहे. त्यांनी या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आर्य वैद्यशालाचे पुन्हा एकदा अभिनंदन केले आणि येत्या काळातही ही संस्था अशाच समर्पणाने आणि सेवेच्या भावनेने जीवन आरोग्यमय बनवो, अशी इच्छा व्यक्त केली. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219808)
आगंतुक पटल : 3
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam