पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2026 12:36PM by PIB Mumbai
सर्व युवा मित्रांनो,
आपण सर्वांना माझा नमस्कार!
सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
युवकांना कौशल्याशी जोडणे तसेच त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे याला आमच्या सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सरकारी भरती प्रक्रियाही मिशन मोडमध्ये कशी राबवता येईल, यासाठी रोजगार मेळ्याची सुरुवात करण्यात आली. रोजगार मेळा गेल्या काही वर्षांत एक सशक्त संस्था बनला आहे. रोजगार मेळ्याच्या माध्यमातून लाखो युवकांना सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याच अभियानाचा विस्तार करत आज देशातील 40 पेक्षा अधिक ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांचे मी विशेष अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. भारताच्या युवा शक्तीसाठी देशात आणि जगभरात नवनव्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आज भारत सरकार अनेक देशांशी व्यापार आणि स्थलांतर (मोबिलिटी) करार करत आहे. या करारांमुळे भारतीय युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर नवीन संधी निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत भारताने आधुनिक पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व गुंतवणूक केली आहे. यामुळे बांधकामाशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले आहेत. भारताची स्टार्ट-अप परिसंस्था देखील वेगाने विस्तारत आहे. आज देशात सुमारे 2 लाख नोंदणीकृत स्टार्ट-अप्स आहेत, ज्यामध्ये 21 लाखांहून अधिक युवक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, डिजिटल इंडियामुळे एक नवी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. अॅनिमेशन, डिजिटल मीडिया यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. भारताची क्रिएटर अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, यातूनही युवकांसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
माझ्या युवा मित्रांनो,
आज भारतावर जगाचा विश्वास ज्या प्रकारे वाढत आहे, त्यामुळे युवकांसाठी नवनव्या शक्यता निर्माण होत आहेत. भारत ही जगातील एकमेव मोठी अर्थव्यवस्था आहे, जिने एका दशकात आपला स्थूल राष्ट्रीय उत्पादन दुप्पट केले आहे. आज जगातील 100 पेक्षा अधिक देश भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक करत आहेत. 2014 पूर्वीच्या दहा वर्षांच्या तुलनेत भारतात अडीच पट जास्त थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. वाढीव परकीय गुंतवणूक म्हणजेच भारतीय युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी.
मित्रांनो,
आज भारत एक मोठी उत्पादनक्षम शक्ती बनत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि लसी, संरक्षण, वाहन उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताच्या उत्पादनात आणि निर्यातीमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे. 2014 नंतर भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सहापट वाढ झाली आहे. आज हा उद्योग 11 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचा झाला आहे.
आपली इलेक्ट्रॉनिक्स निर्यातही 4 लाख कोटी रुपयांची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. भारतातील वाहन उद्योग देखील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनला आहे. 2025 या वर्षात,दुचाकी वाहनांची विक्री 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली
आहे. हे देशातील नागरिकांच्या वाढत्या क्रयशक्तीचे प्रतिबिंब दर्शविते, आयकर आणि वस्तू आणि सेवा कर कमी झाल्याने असंख्य फायदे झाले आहेत. देशात रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण झाल्याचे दाखवणारी अशी अनेक उदाहरणे आहेत.
मित्रांनो,
आजच्या कार्यक्रमात 8 हजारहून अधिक मुलींना नियुक्ती पत्रे मिळाली आहेत. गेल्या 11 वर्षांत, देशातील कार्यबलात महिलांचा सहभाग जवळजवळ दुप्पट झाला आहे. मुद्रा आणि स्टार्ट-अप इंडिया सारख्या सरकारी उपक्रमांचा आपल्या मुलींना खूपच लाभ झाला आहे. महिला स्वयंरोजगाराचा दर अंदाजे 15% ने वाढला आहे. केवळ स्टार्ट-अप आणि एमएसएमई बद्दल जर मी बोललो तर, आज महिला व्यवस्थापक आणि संस्थापकांची संख्या लक्षणीय आहे. आपल्या सहकारी क्षेत्रात आणि गावांमध्ये जे बचत गट कार्यरत आहेत त्यात मोठ्या संख्येने महिला नेतृत्व करत आहेत.
मित्रांनो,
आज, देशात सुधारणा (रिफॉर्म) एक्सप्रेस सुरू झालेली आहे. देशातील जीवनव्यवहार आणि व्यवसाय दोन्ही सुलभपणे करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. जीएसटी मधील नव्या सुधारणांचा सर्वांनाच लाभ झाला आहे. आमचे तरुण उद्योजक आणि आमचे एमएसएमई याचा फायदा घेत आहेत. अलिकडेच, देशाने ऐतिहासिक कामगार सुधारणा लागू केल्या आहेत. याचा लाभ कामगार, कर्मचारी आणि व्यवसायांना मिळेल. नवीन कामगार संहितांमुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेची व्याप्ती आणखी मजबूत झाली आहे.
मित्रांनो,
आता "रिफॉर्म एक्सप्रेस" ची सर्वत्र चर्चा होत आहे, म्हणून मी तुमच्यावर याच विषयावरील एक काम सोपवू इच्छितो. आठवा बरे, गेल्या पाच ते सात वर्षांत, तुमचा सरकारशी कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संपर्क आला आहे का ? तुम्ही शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेला आहात का, तुम्ही दुसऱ्या एखाद्या माध्यमातून संवाद साधला आहे का आणि तुम्हाला अडचणी आल्या आहेत का, काहीतरी कमी पडल्यासारखे वाटले आहे का किंवा काही प्रकारची समस्या आली आहे का? फक्त या गोष्टी आठवून पहा . आता तुम्ही ठरवले पाहिजे की ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास झाला आहे, तुमच्या पालकांना त्रास झाला आहे, तुमच्या मित्रांना त्रास झाला आहे आणि ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे, तुम्हाला वाईट वाटले आहे आणि तुम्हाला राग आला आहे - त्या अडचणी तुम्ही तुमच्या कार्यकाळात इतर नागरिकांवर कदापि येऊ देणार नाही. सरकारचा भाग म्हणून, तुम्ही देखील शासनाचा भाग म्हणून तुमच्या पातळीवर लहान सुधारणा राबवल्या पाहिजेत. तुम्ही या दृष्टिकोनातून पुढे गेले पाहिजे, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ मिळेल.राहणीमान सुलभ करणे, व्यवसाय सुलभ करणे, ते मजबूत करण्याचे काम धोरणे आखण्यापेक्षा स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले जाते. तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या युगात, देशाच्या गरजा आणि प्राधान्यक्रम देखील वेगाने बदलत आहेत. या गतिमान बदलांसोबत, तुम्हाला स्वतःला देखील अद्ययावत ठेलावे लागेल. तुम्ही iGOT कर्मयोगी सारख्या प्लॅटफॉर्मचा नक्कीच चांगला वापर केला पाहिजे. मला आनंद आहे की इतक्या कमी वेळात, सुमारे दीड कोटी सरकारी कर्मचारी iGOT च्या या प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत आणि स्वतःला नवीन प्रशिक्षण देत आहेत आणि स्वतःला सक्षम करत आहेत.
मित्रांनो,
आता रिफॉर्म एक्सप्रेसची सर्वत्र चर्चा होत आहे, म्हणून मी तुमच्यावर याच विषयावरील एक काम सोपवू इच्छितो. आठवा बरे, गेल्या पाच ते सात वर्षांत, तुमचा सरकारशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संपर्क आला आहे का? तुम्ही सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेला आहात का, दुसऱ्या एखाद्या माध्यमातून संवाद साधला आहे का आणि तुम्हाला त्यावेळी तुम्हाला एखादी अडचण आली आहे, काहीतरी कमी पडल्यासारखे वाटले आहे किंवा काही प्रकारची समस्या आली आहे का? फक्त या गोष्टी लक्षात ठेवा. आता, तुम्हाला ठरवायचे आहे की ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या, ज्या कधी तुमच्या पालकांना त्रास देत होत्या, कधी तुमच्या मित्रांना त्रास देत होत्या आणि ज्या तुम्हाला त्रास देत होत्या, त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत होते आणि तुम्हाला राग येत होता, त्या गोष्टी तुम्ही तुमच्या कार्यकाळात इतर नागरिकांना त्या अडचणींना तोंड देऊ देणार नाही.
मित्रांनो,
पंतप्रधान असो किंवा शासनाचा छोटासा सेवक, आपण सर्व शेवटी सेवक आहोत आणि आपल्या सर्वांचा एक समान मंत्र आहे: आपल्यातील कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही डावे किंवा उजवे नाही. आणि आपल्या सर्वांसाठी, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी,एकच मंत्र आहे: "नागरिक देवो भव." आपल्याला "नागरिक देवो भव" या मंत्राला अनुसरुन काम करायचे आहे. तुम्ही ही असेच करत राहिले पाहिजे. तुमच्या जीवनात हा पुनश्च एकदा जो नवा वसंत आला आहे; जीवनाचे हे नवे पर्व सुरू होत आहे आणि तुमच्या माध्यमातूनच 2047 मध्ये विकसित भारताची निर्मिती होईल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
***
अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218420)
आगंतुक पटल : 4