संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैश्विक अनिश्चिततेच्या काळामध्‍ये  खंबीर आणि सज्ज रहा, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एनसीसी छात्रांकडून प्रेरणा घ्यावी : संरक्षणमंत्र्यांचे युवकांना आवाहन


 राजनाथ सिंह यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठे‍बद्दल   छात्रांना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशस्तीपत्रे प्रदान

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2026 1:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली – दि. 24 जानेवारी, 26

‘’संपूर्ण विश्‍वामध्‍ये सध्‍या  अनिश्चिततेचा  काळ आहे,  अशावेळी  आपल्या तरुणांनी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खंबीर राहिले पाहिजे, तसेच येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे,” असे संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.  ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशभरात ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्‍यात आली. त्यावेळी  जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शूर आणि समर्पित एनसीसी छात्रांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. आज-24  जानेवारी, 26  रोजी दिल्ली छावणी  येथील एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात छात्रांना मार्गदर्शन करताना, त्यांनी एनसीसी छात्र  म्हणजे राष्ट्राची दुसरी संरक्षण फळी असल्याचे सांगितले. या छात्रांनीच  सिंदूर ऑपरेशनदरम्यान  आपल्या सशस्त्र दलांना पाठिंबा दिला,  आपली भूमिका उत्तम रितीने  बजावली. “भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला. हा हल्ला म्हणजे पहलगाममधील दुर्दैवी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर होते. आमच्या सैनिकांनी धैर्य आणि संयमाने काम केले. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी  आपल्या निष्‍पाप नागरिकांना  इजा पोहोचवली, आपल्या सैनिकांनी मात्र  फक्त दहशतवादी तळांना   लक्ष्य केले आणि ते नष्ट केले, इतर कोणालाही इजा पोहोचवली नाही. हे शक्य झाले; याचे कारण म्हणजे,  कारवाईमध्‍ये सहभागी झालेले आपले सैनिक  शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खंबीर आहेत,” असे ते म्हणाले.

 A person standing at a podiumDescription automatically generated

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एनसीसीला तरुणांना सक्षम बनवण्याचे एक उत्कृष्ट माध्यम म्हटले.  हे छात्र  राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देत असल्याचे सांगून ते म्हणाले,  “आज जग चैनीच्या आणि  सुखोपभोगाच्या  वस्तू विकत आहे. व्हिडिओ गेम्स, फूड डिलिव्हरी आणि अशा इतर गोष्टी मानवी जीवनात आराम आणण्यासाठी आहेत. संचलन , कवायती आणि शिबिरांच्या माध्यमातून, एनसीसी तुम्हाला त्या आरामदायी परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करते.   यामुळे छात्र मानसिकदृष्ट्या खंबीर बनतो. याव्यतिरिक्त, मुलांना अनेक जीवन कौशल्ये शिकायला मिळतात,  त्यांचा उपयोग  आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी  त्यांना होतो,” असे ते म्हणाले.

  

संरक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले की, एनसीसी छात्रांमध्ये शिस्त आणि देशभक्तीची भावना रूजवली जाते. त्‍यांना दिलेल्या शिकवणुकीमुळे  'एकाग्रतेच्या अभावा'वर मात करण्यास मदत होते. त्यांनी सांगितले की, आजच्या युगामध्‍ये ज्यावेळी  प्रत्येक गोष्ट त्वरित मिळावी असे  लोकांना वाटत  असते, त्यावेळी एनसीसी संयम, सातत्य आणि एकाग्रता शिकवते.  या सर्व गोष्‍टी  जीवनातील मोठ्या लढाया, राष्ट्राच्या महान जबाबदाऱ्या आणि चारित्र्य निर्मितीसाठी आवश्यक आहेत. ते म्हणाले, त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये एकाग्रता  दिसून येते, मग ते सशस्त्र दलात सामील होवो किंवा डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, प्रशासक, राजकारणी इत्यादी बनोत.

 

राष्ट्रनिर्मितीत एनसीसीची भूमिका अधोरेखित करताना संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, एनसीसी मधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्तींनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन मनोज पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा हे एनसीसीचे छात्र होते, असे त्यांची सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वतःही एनसीसीचे कॅडेट होतो. अनेक जण एनसीसी मधून बाहेर पडून देशातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. 1965 आणि 1971 च्या युद्धकाळात एनसीसी कॅडेट्सना संरक्षणाची दुसरी फळी म्हणून तैनात करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रात एनसीसीने  महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

26 जानेवारी रोजी देश 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार असून, या दिनानिमित्त देशातील लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांबाबतचा आपला संकल्प अधिक बळकट करण्याची आठवण होते, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. संविधान हे केवळ लिखित मजकूर नाही, तर ते आपले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच इतर अधिकार आणि कर्तव्ये बळकट करण्याचे माध्यम आहे, असे ते म्हणाले. आपले संविधान ज्या प्रकारचे नागरिक घडवू इच्छिते, त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. संविधान समजून घेणे आणि त्यातून मिळालेले अधिकार व कर्तव्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. या संपूर्ण अभियानात एनसीसी कॅडेट्स ध्वजवाहकाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  पदक प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एनसीसी कॅडेट्सना ‘रक्षा मंत्री पदक’ आणि प्रशंसा पत्रे प्रदान करण्यात आली. यावर्षी जम्मू-काश्मीर आणि लडाख संचालनालयातील कॅडेट अर्पण दीप कौर आणि पश्चिम बंगाल व सिक्कीम संचालनालयातील कॅडेट पाल्डेन लेप्चा यांना ‘रक्षा मंत्री पदक’ प्रदान करण्यात आले. तसेच कर्नाटक आणि गोवा संचालनालयातील पेटी ऑफिसर लीशा देजप्पा सुवर्णा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयातील ज्युनियर अंडर ऑफिसर पवन भगेल, ईशान्य विभाग संचालनालयातील कॉर्पोरल राधा डोर्जी आणि उत्तराखंड संचालनालयातील कॅडेट प्रिन्स सिंग राणा यांना ‘प्रशंसा पत्रे’ प्रदान करण्यात आली. संरक्षण मंत्र्यानी एनसीसीच्या सर्व तीन विभागांतील कॅडेट्सनी सादर केलेल्या  सलामीची निरीक्षण केले.

 A group of people on a stageDescription automatically generated

या प्रसंगी मध्य प्रदेश व छत्तीसगड संचालनालयातील ग्वाल्हेरमधील सिंदिया शाळेच्या एनसीसी कॅडेट्सचे अद्वितीय बँड सादरीकरण झाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व 17 संचालनालयातील कॅडेट्सनी विविध सामाजिक जनजागृती विषयांवर सजवलेले  ध्वज क्षेत्र पाहिले. तसेच त्यांनी कॅडेट्सद्वारे सादर केलेली सांस्कृतिक कामगिरीही पाहिली.  एनसीसीचे  डीजी लेफ्टिनंट जनरल वीरेन्द्र वत्स आणि एनसीसी व संरक्षण मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

 ***

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2218327) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam