पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान


आज भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्रांपैकी एक आहे. भारतातील तरुणांसाठी देशांतर्गत तसेच जागतिक स्तरावर नव्या संधी निर्माण करण्यासाठी आमचे सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे: पंतप्रधान

आज भारत सरकार अनेक देशांशी व्यापार व स्थलांतर करार करत असून, त्यामुळे भारतातील तरुणांसाठी असंख्य नव्या संधी खुल्या होतील: पंतप्रधान

आज देशाने ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर प्रवास सुरू केला असून, जीवन सुलभ करणे आणि व्यवसाय करणे अधिक सोपे करणे हा त्यामागचा उद्देश आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2026 12:12PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरात पराक्रम दिवस साजरा करण्यात आला आणि उद्या, 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाईल, त्यानंतर प्रजासत्ताक दिन येईल. आजचा दिवसही विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले, कारण याच दिवशी संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.
या महत्त्वाच्या दिवशी 61 हजारांहून अधिक तरुण शासकीय सेवांसाठी नियुक्तीपत्रे स्वीकारून आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्मितीसाठीचे आमंत्रण असून, विकसित भारत घडवण्याच्या संकल्पासाठीची ही बांधिलकी आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
अनेक तरुण राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करतील, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेला सक्षम करतील, वित्तीय सेवा व ऊर्जा सुरक्षेला मजबुती देतील आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे त्यांनी नमूद केले. सर्व तरुणांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.
तरुणांना कौशल्यांशी जोडणे आणि त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, शासकीय भरती प्रक्रियेला मिशन मोडमध्ये आणण्यासाठी रोजगार मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. कालांतराने हा उपक्रम एक संस्था बनला असून, यामधून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत.
ही मोहीम पुढे नेत आज देशभरात चाळीसहून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या गुंतवणुकीमुळे बांधकामाशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत. भारतातील स्टार्टअप परिसंस्था वेगाने विस्तारत असून, सुमारे दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअप्समध्ये एकवीस लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळत असल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले. डिजिटल इंडिया उपक्रमामुळे एक नवी अर्थव्यवस्था उदयास आली असून, अॅनिमेशन, डिजिटल मीडिया तसेच इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक केंद्र म्हणून पुढे येत आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारताची ‘क्रिएटर इकॉनॉमी’ झपाट्याने वाढत असून, त्यामुळे तरुणांसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जागतिक स्तरावर भारतावर वाढत असलेला विश्वास तरुणांसाठी नव्या शक्यता निर्माण करत असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधानांनी सांगितले की, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही एकमेव अशी अर्थव्यवस्था आहे जिने एका दशकात आपला सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुप्पट केला आहे. आज शंभरहून अधिक देश थेट परकीय गुंतवणुकीच्या (एफडीआय) माध्यमातून भारतात गुंतवणूक करत आहेत. 2014 पूर्वीच्या दशकाच्या तुलनेत भारताला आता अडीच पटांहून अधिक एफडीआय प्राप्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिक परकीय गुंतवणूक म्हणजे भारतातील तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की भारत आज एक प्रमुख उत्पादनक्षम शक्ती म्हणून उदयास येत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्मिती व लसी, संरक्षण आणि वाहन उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्पादन व निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. 2014 पासून भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन सहापटीने वाढून आता 11 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, असे त्यांनी सांगितले. वाहन उद्योग हा वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरला असून, 2025 मध्ये दुचाकी वाहनांची विक्री दोन कोटी युनिट्सच्या पुढे गेली आहे. उत्पन्नकर व वस्तू व सेवा करातील सवलतींमुळे नागरिकांची खरेदी क्षमता वाढल्याचे यावरून स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले. ही सर्व उदाहरणे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असल्याचे दर्शवितात, असे पंतप्रधानांनी सांगितले. याच कार्यक्रमात आठ हजारांहून अधिक मुलींना नियुक्ती पत्रे देण्यात आली असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की गेल्या 11 वर्षांत महिलांचा रोजगारातील सहभाग जवळपास दुप्पट झाला आहे. मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांचा महिलांना मोठा लाभ झाला असून, महिलांच्या स्वयंरोजगारात सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज अनेक महिला स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये संचालक आणि संस्थापक म्हणून कार्यरत आहेत, तर अनेक महिला गावपातळीवर सहकारी संस्था आणि बचत गटांचे नेतृत्व करत आहेत, असेही त्यांनी निरीक्षण नोंदवले.
“आज देश ‘रिफॉर्म एक्सप्रेस’वर आरूढ झाला असून, जीवन आणि व्यवसाय अधिक सुलभ करण्याच्या दिशेने तो वाटचाल करत आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. जीएसटीमधील नव्याने केलेल्या सुधारणा तरुण उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी लाभदायक ठरल्या आहेत, तर ऐतिहासिक कामगार सुधारणांमुळे कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेला बळ मिळाले आहे. नव्या कामगार संहितांमुळे सामाजिक सुरक्षेचा कक्ष विस्तारला असून तो अधिक सक्षम झाला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. नवीन नियुक्त तरुणांना उद्देशून पंतप्रधानांनी आवाहन केले की त्यांनी पूर्वी सरकारी कार्यालयांमध्ये नागरिक म्हणून आलेल्या अनुभवांची आठवण ठेवावी आणि आपल्या सेवाकाळात नागरिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्न करावेत. सरकारचा भाग म्हणून प्रत्येकाने आपल्या पातळीवर छोटे सुधारणा करून जनतेच्या कल्याणासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले. धोरणात्मक सुधारणा यांसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा ‘सुलभ जीवन’ आणि ‘सुलभ व्यवसाय’ यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात देशाच्या गरजा आणि प्राधान्येही झपाट्याने बदलत असल्याने सतत स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आय गॉट कर्मयोगी या व्यासपीठाचा पुरेपूर उपयोग करण्याचे त्यांनी आवाहन केले, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे दीड कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यात आले आहे. शेवटी “नागरिक देवो भव” या भावनेने काम करण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी तरुणांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेनुसार, ‘रोजगार मेळा’ हा या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आजवर देशभर आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळ्यांमधून 11 लाखांहून अधिक नियुक्ती पत्रे वितरित करण्यात आली आहेत.
18 वा रोजगार मेळा देशभरातील 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला. नव्याने निवडलेले उमेदवार भारत सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांमध्ये रुजू होणार असून, त्यामध्ये गृह मंत्रालय, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग यांचा समावेश आहे.


***

अंबादास यादव/डॉ गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218116) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , Telugu , Malayalam , Malayalam , Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Gujarati , Kannada