पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला.


सुधारित रेल्वे संपर्कव्यवस्था आणि तिरुवनंतपुरमला एका प्रमुख स्टार्टअप केंद्रामध्ये रूपांतरित करण्याच्या उपक्रमांमुळे केरळच्या विकासासाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना आज नवीन गती मिळाली आहे: पंतप्रधान

आज केरळमधून  गरिबांच्या कल्याणासाठी एक मोठी राष्ट्रव्यापी योजना सुरु करण्यात आली. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आले आहे, यामुळे देशभरातील रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले आणि पदपथांवर काम करणाऱ्यांना लाभ होईल: पंतप्रधान.

विकसित भारत घडवण्यात आपली शहरे मोठी भूमिका पार पाडतात, गेल्या अकरा वर्षांमध्ये शहरी पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारने लक्षणीय गुंतवणूक केली आहे: पंतप्रधान.

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 12:12PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली, उद्घाटन केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केरळच्या विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना आज नवीन गती मिळाली आहे. केरळमधील रेल्वे संपर्कव्यवस्था आता अधिक मजबूत झाली असून तिरुवनंतपुरम शहराला एका प्रमुख स्टार्टअप केंद्रामध्ये रूपांतरित करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आज केरळमधून  गरिबांच्या कल्याणासाठी एक मोठी राष्ट्रव्यापी योजना सुरु करण्यात आली. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण करण्यात आले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याचा फायदा देशभरातील पथविक्रेते, फेरीवाले आणि पदपथांवर काम करणाऱ्यांना होईल. या विकासकामांसाठी आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांसाठी त्यांनी केरळ मधील लोकांचे आणि देशभरातील नागरिकांचे अभिनंदन केले.

विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांत आज संपूर्ण राष्ट्र गढून गेले असून या मोहिमेत शहरे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत देश एकत्रितपणे प्रयत्नशील आहे आणि या मोहिमेमध्ये शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. असे सांगून पंतप्रधान म्हणाले की केंद्र सरकारने गेल्या अकरा वर्षांमध्ये शहरी पायाभूत सुविधांमध्ये  लक्षणीय गुंतवणूक केली आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी देखील सरकारने व्यापक कार्य केले आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशभरातील गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक घरे बांधून देण्यात आली आहेत, ज्यात शहरी गरिबांसाठी 1 कोटींहून अधिक पक्क्या घरांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. एकट्या केरळ मध्येच सुमारे 1.25 शहरी गरिबांना पक्की घरे मिळाली आहेत, असे ते म्हणाले.

गरीब कुटुंबांचा विजेचा खर्च कमी करण्यासाठी पीएम सूर्यघर योजना सुरु करण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आयुषमान भारत योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळत आहेत तर महिलांच्या आरोग्यसुरक्षेसाठी मातृ वंदना सारख्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारने 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने केरळमधील मध्यमवर्गीय आणि पगारदार लोकांना देखील त्याचा लाभ झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या 11 वर्षांमध्ये कोट्यवधी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी व्यापक प्रयत्न केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता गरीब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय समाज, महिला आणि मच्छीमार बांधवाना सहजरित्या बँकेचे कर्ज मिळू शकते, तारण उपलब्ध नसल्यास केंद्र सरकार स्वतः त्यांच्या कर्जासाठी हमीदार म्हणून उभे राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ज्या पथविक्रेत्यांना केवळ काही शे रुपयांचे कर्ज उच्च व्याजदराने मिळवण्यासाठी देखील झगडावे लागत होते, त्या परिस्थितीत आता पीएम स्वनिधी योजनेमुळे मोठा बदल घडून आला आहे. पहिल्यांदाच देशभरातील लाखो पथविक्रेत्यांना बँकेकडून कर्ज मिळाले आहे, त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून आपल्या उपजिविकेत सुधारणा करण्याची संधी मिळत आहे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारने पथविक्रेत्यांना क्रेडिट कार्ड प्रदान करुन आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड्सचे नुकतेच येथे वितरण करण्यात आले आहे, ज्यात केरळमधील 10,000 लाभार्थी आणि तिरुवनंतपुरममधील 600 हून अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी केवळ धनवान लोकांनाच क्रेडिट कार्ड मिळत असत मात्र आता पथविक्रेते सुद्धा स्वनिधी क्रेडिट कार्ड वापरत आहेत, असे त्यांनी सांगितले.

दळणवळण , विज्ञान व नवोन्मेष आणि आरोग्यसेवांच्या क्षेत्रात केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. केरळ मध्ये उदघाटन झालेला सीएसआयआर नवोन्मेष हब व एका वैद्यकीय महाविद्यालयात सुरु झालेले रेडिओ शस्त्रक्रिया केंद्र यामुळे विज्ञान , नवोन्मेष व आरोग्यसेवेचे केंद्रस्थान म्हणून केरळ चा उदय होत असल्याचे मोदी यांनी नमूद केले. 

अमृत भारत रेल्वेगाड्या सुरु झाल्यामुळे केरळच्या रेल्वे वाहतुकीत मोठी सुधारणा झाल्याचे व प्रवास सुलभ झाल्यामुळे पर्यटनक्षेत्राचा फायदा होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गुरुवयूर व त्रिशूर दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या सुरु झाल्यामुळे यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुखद होणार आहे असे ते म्हणाले. या सर्व प्रकल्पांमुळे केरळचा विकास अधिक जलद होईल व विकसित भारताचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी केरळचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकार केरळच्या पाठीशी ठाम पणे  उभे आहे, असे म्हणून त्यांनी आपले भाषण संपवले . शेवटी त्यांनी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. 

यावेळी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर , केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय मंत्री व्ही सोमण्णा , जॉर्ज कुरियन , तिरुवनंतपूरमचे महापौर व्ही व्ही राजेश तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

पार्श्वभूमी 

या प्रकल्पांमध्ये रेल्वे सेवा, शहरी उपजीविका साधने , विज्ञान व नवोन्मेष, नागरिककेंद्री सेवा व अद्ययावत आरोग्यसेवा यांचा समावेश असून पंतप्रधानांचा सर्वसमावेशक प्रगती तंत्रज्ञानविषयक विकास व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर असलेला भर अधोरेखित होतो आहे.  

रेल्वे संपर्काला मोठी चालना देत, पंतप्रधानांनी चार नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवला. यात तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या आणि एका पॅसेंजर रेल्वेचा समावेश आहे. यामध्ये नागरकोइल-मंगळूर अमृत भारत एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम-तांबरम अमृत भारत एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम-चर्लापल्ली अमृत भारत एक्सप्रेस आणि त्रिशूर व गुरुवायूर दरम्यानच्या नवीन पॅसेंजर गाडीचा समावेश आहे. या सेवांच्या आरंभामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश दरम्यानची लांब पल्ल्याची आणि प्रादेशिक वाहतूक लक्षणीयरीत्या सुधारेल. तसेच प्रवाशांसाठी प्रवास अधिक किफायतशीर, सुरक्षित आणि वक्तशीर होईल. या सुधारित दळणवळणामुळे संपूर्ण प्रदेशात पर्यटन, व्यापार, शिक्षण, रोजगार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला जोरदार चालना मिळेल.

शहरी उपजीविका बळकट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, पंतप्रधानांनी पीएम स्वनिधी क्रेडिट कार्डचे अनावरण केले. यामुळे फेरीवाल्यांसाठी आर्थिक समावेशनाच्या पुढील टप्प्याची सुरुवात होत आहे. यामुळे त्यांना यूपीआय-संलग्न, व्याजमुक्त व फिरती पत सुविधा मिळेल. या कार्डांमुळे फेरीवाल्यांना त्वरित रोकड सुलभता मिळेल , डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन आणि लाभार्थ्यांना औपचारिक पत पार्श्वभूमी तयार करण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांनी केरळमधील फेरीवाल्यांसह एक लाख लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्जाचे वितरणही केले.  पीएम स्वनिधी योजना 2020 साली सुरू झाली होती. या योजनेतून बहुसंख्य लाभार्थ्यांना औपचारिक कर्जाची पहिली संधी उपलब्ध झाली आहे. शिवाय शहरी असंघटित कामगारांचे  गरिबी निर्मूलन  व उपजीविका सुरक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात, पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम येथे सीएसआयआर- एनआयआयएसटी नवोपक्रम, तंत्रज्ञान व उद्योजकता केंद्राचे भूमिपूजन केले. जैव विज्ञान आणि जैव-अर्थव्यवस्थेवर संशोधन, आयुर्वेदसारख्या पारंपरिक ज्ञान प्रणालींचे आधुनिक जैवतंत्रज्ञानाशी एकत्रीकरण, शाश्वत पॅकेजिंग आणि हरित हायड्रोजनला प्रोत्साहन, तसेच स्टार्टअप निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण व जागतिक सहकार्याला या केंद्रात चालना मिळेल. वापरासाठी तयार उत्पादने बाजारात आणण्यासाठी  आणि नवीन उद्योगांसाठी अशा रीतीने एक व्यासपीठ तयार होऊ शकेल .

आरोग्यसेवांसाठीच्या पायाभूत सुविधांना बळ देणे हा देखील या भेटीचा एक प्रमुख केंद्रबिंदू असेल. पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी येथे अत्याधुनिक रेडिओसर्जरी केंद्राची पायाभरणी केली. मेंदूच्या गुंतागुंतीच्या विकारांवर अत्यंत अचूक आणि कमीत कमी शस्त्रक्रियेद्वारे या केंद्रात उपचार उपलब्ध होतील. यामुळे तृतीय स्तरावरील  प्रादेशिक आरोग्यसेवा क्षमतांमध्ये वाढ होईल.

पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम येथील नवीन पूजप्पुरा मुख्य टपाल कार्यालयाचे उद्घाटनही केले. हे टपाल कार्यालय  आधुनिक व  तंत्रज्ञान-सुसज्ज असून त्यात ग्राहकांना टपाल, बँकिंग, विमा आणि डिजिटल सेवांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असेल.  यामुळे  नागरिक-केंद्रित सेवा वितरण आणखी मजबूत होईल.

***

नेहा कुलकर्णी / भक्ती सोनटक्के / उमा रायकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217723) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam