सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाचा वंदे मातरम्‌ची 150 वर्षे या संकल्पनेवरील चित्ररथ

प्रविष्टि तिथि: 21 JAN 2026 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

 

सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 2026 च्या प्रजासत्ताक दिन संचलनात 'वंदे मातरम्‌ची 150 वर्षे' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. भारताची नागरी स्मृती, सामूहिक जाणीव आणि सांस्कृतिक सातत्य याचे जिवंत रूप असलेले हे राष्ट्रगीत हा या चित्ररथाच्या मध्यवर्ती घटक असणार आहे.

सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी या संकल्पनेबद्दल माहिती दिली. भारताचे प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ हे केवळ औपचारिक प्रदर्शनापुरते मर्यादित नसून, ते राष्ट्राच्या नागरी स्मृतीचे चालते फिरते दस्तऐवज असतात असे त्यांनी सांगितले. दरवर्षी या चित्ररथांच्या माध्यमातून विचार, मूल्ये आणि ऐतिहासिक अनुभव एका परस्पर सामायिक दृश्यमय भाषेतून उमटलेले दिसतात.  संस्कृती हे भारताच्या प्रजासत्ताकाचा गौरवच नाही तर त्याचा जिवंत आत्मा आहे याची प्रचिती त्यातून येथे. या प्रवाहामध्ये वंदे मातरम् चे स्थान अद्वितीय आणि चिरंतन आहे असे ते म्हणाले.

कधीकाळी क्रांतिकारकांच्या मुखी असलेले आणि तुरुंग, सभा तसेच मिरवणुकांमध्ये गायले जाणारे वंदे मातरम् हे निव्वळ एका गीतापेक्षाही मोठे असल्याचे त्यांनी नमूद केले. नाही. अरविंद घोष यांना या गीतात सामूहिक जाणीवा जागृत करण्याची एक आध्यात्मिक शक्ती जाणवली होती आणि इतिहासानेही हा दृष्टीकोन सार्थ ठरवला असे ते म्हणाले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये रचलेल्या या गीताने निसर्ग, पोषण आणि आंतरिक शक्तीने समृद्ध सुजलाम्, सुफलाम् असलेली माता अशी राष्ट्राची कल्पना केली होती असे त्यांनी सांगितले. वसाहतवादी काळात या गीताने भारतीयांमधला स्वाभिमान आणि आत्मविश्वास पुन्हा जागवला. भक्तीचे रूपांतर धैर्यात आणि काव्याचे रूपांतर निर्धारात करून या गीताने विविध प्रदेश, भाषा आणि धर्माच्या भारतीयांना स्वातंत्र्याच्या एका सामायिक ध्येयासाठी एकत्र आणले असे ते म्हणाले.

सांस्कृतिक मंत्रालयाचा 2026 चा प्रजासत्ताक दिन चित्ररथातून या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक वाटचालीला एक शक्तिशाली दृश्य रूप दिले जाणार आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात वंदे मातरम् चे मूळ हस्तलिखित मांडलेले असेल, त्याच्या मागे भारताच्या चहू बाजुंनी आलेले लोककलाकार देशाच्या सांस्कृतिक बहुविधतेचे दर्शन घडवतील. या चित्ररथाच्या मध्यवर्ती भागात आजच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी Gen-G असेल, ते विष्णुपंत पागनीस यांच्या ऐतिहासिक सादरीकरणानपासून प्रेरित असलेले वंदे मातरम् सादर करतील. वसाहतवादी सेन्सॉरशिप टाळण्यासाठी कडव्यांचा क्रम बदलून विष्णुपंत पागनीस यांनी राग सारंगमध्ये या गीताचे ध्वनीमुद्रण  केले होते, त्यामुळेच ते स्वातंत्र्य चळवळीतील कलात्मक प्रतिकाराचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरले होते अशी माहिती त्यांनी दिली.

संस्कृती मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी 2021 पासून, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) कडे सोपवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून, आयजीएनसीए  सातत्याने भारताच्या तात्विक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पायावर आधारित संकल्पनांची आखणी करत असून प्रत्येक पिढ्यांच्या मनात प्रतिध्वनीत होत आलेल्या उक्ती त्याद्वारे दृश्य स्वरुपात सादर करत आहे. 2026 च्या चित्ररथाची संकल्पनाही या दृष्टिकोनानुसारच असून, वंदे मातरमला केवळ ऐतिहासिक रचना म्हणून नव्हे तर नैतिक, सांस्कृतिक आणि भावनिक अनुनादांचा अव्याहत स्रोत म्हणून असलेले स्थान अशी त्याची मांडणी केली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे (आयजीएनसीए) चे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी संस्कृती मंत्रालयाचा चित्ररथ केवळ मंत्रालयाचे किंवा विभागाचे प्रतिनिधित्व करण्यापलीकडचा असतो तसेच त्यातून देशाच्या सामूहिक भावना, इतिहास आणि राष्ट्रीय जाणीव प्रतिबिंबित होते, असे निरीक्षण नोंदवले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होत असलेल्या संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना 'वंदे मातरमची 150 वर्षे' अशी ठरविण्यात आली असून  कलात्मक अभिव्यक्तीद्वारे या राष्ट्रीय गीताचा प्रेरणादायी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास सादर या संकल्पनेतून सादर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले .

डॉ. जोशी यांनी पुढे नमूद केले की, गेल्या सहा वर्षांपासून संस्कृती मंत्रालयाच्या प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथाची संकल्पना आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयजीएनसीएकडे आहे. बहुतांश मंत्रालये आणि राज्ये चित्ररथांमधून विशिष्ट कामगिरी किंवा कार्यक्रमांवर प्रकाश टाकतात, परंतु संस्कृती मंत्रालय अनेक सांस्कृतिक आयाम एकत्रित करून एक विशिष्ट दृष्टिकोन ठरवते - हा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत त्याच्या संकल्पनांमधून दिसून आला असून त्याचा परिपाक म्हणजे 2026 साठी 'वंदे मातरमची 150 वर्षे' अशी संकल्पना ठरविण्यात आली आहे.

भारत प्रजासत्ताक दिन 2026 साजरा करत असताना, वंदे मातरम देशाला केवळ स्वातंत्र्याचे स्मरण करण्याचेच नाही तर त्याला पात्र राहण्याचे आवाहन करते. या सादरीकरणाद्वारे, स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतीला वर्तमानातील जबाबदाऱ्या आणि भविष्यातील आकांक्षांशी जोडून- हे राष्ट्रीय गीत भारताची एकता, सांस्कृतिक खोली आणि चिरंतन आत्म्याचे प्रतीक असल्याचे पुनश्च ठसविण्याचा सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे .

सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रजासत्ताक दिन कॅटलॉग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217234) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Kannada