पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालमधील मालदा येथील विविध रेल्वे प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 3:08PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस जी; केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, शांतनू ठाकूर जी, सुकांत मजुमदार जी; पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी जी; संसदेतील माझे सहकारी शामिक भट्टाचार्य जी, खगेन मुर्मू जी, कार्तिक चंद्र पॉल जी; उपस्थित सर्व मान्यवर, महिला आणि सज्जनहो.
आज मालदा येथून पश्चिम बंगालच्या विकासाला गती देणाऱ्या उपक्रमांना अधिक वेग मिळाला आहे. काही वेळापूर्वी राज्याच्या विकासाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगालला नवीन रेल्वे सेवा समर्पित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवास सुलभ होणार असून व्यापार आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. तसेच, येथे उभारलेल्या रेल्वे देखभाल सुविधांमुळे बंगालमधील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मित्रांनो,
बंगालच्या या पवित्र भूमीतून आज भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आज देशात वंदे भारत शयनयान रेल्वेगाड्यांचा प्रारंभ होत आहे. या गाड्यांमुळे दीर्घ पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी, भव्य आणि संस्मरणीय ठरणार आहे. ‘विकसित भारता’च्या संकल्पनेतील रेल्वेगाड्या कशा असाव्यात, याचे सजीव उदाहरण या वंदे भारत शयनयान गाडीत दिसून येते. काही वेळापूर्वी, मालदा स्थानकावर प्रवाशांशी संवाद साधताना, या गाडीत बसल्यावर विलक्षण आनंदाची अनुभूती मिळते, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. परदेशातील आधुनिक गाड्यांचे फोटो व व्हिडिओ पाहून भारतातही अशाच गाड्या असाव्यात, अशी अपेक्षा आपण बाळगत होतो. आज आपण त्या स्वप्नाचे वास्तवात रूपांतर होताना पाहत आहोत. भारतीय रेल्वेमध्ये घडणाऱ्या परिवर्तनाची माहिती जगाला देण्यासाठी परदेशी नागरिक भारतातील मेट्रो आणि रेल्वेगाड्यांचे व्हिडिओ तयार करत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. ही वंदे भारत रेल्वेगाडी ‘मेड इन इंडिया’ असून तिच्या निर्मितीत भारतीयांच्या परिश्रम सामावलेले आहेत. देशातील ही पहिली वंदे भारत शयनयान रेल्वेगाडी माँ कालीच्या भूमीला माँ कामाख्याच्या भूमीशी जोडते. येत्या काळात ही अत्याधुनिक रेल्वेगाडी देशभर विस्तारली जाणार आहे. या आधुनिक शयनयान रेल्वेगाडीबद्दल मी बंगाल, आसाम आणि संपूर्ण देशाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज भारतीय रेल्वे परिवर्तनाच्या कालखंडातून जात आहे. रेल्वे मार्गांचे व्यापक प्रमाणात विद्युतीकरण केले जात असून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. पश्चिम बंगालसह देशभरात सध्या 150 हून अधिक वंदे भारत रेल्वेगाड्या धावत आहेत. यासोबतच आधुनिक आणि उच्चगती रेल्वेसेवेचे सर्वसमावेशक जाळे उभारले जात असून त्याचा सर्वाधिक लाभ बंगालमधील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळत आहे.
मित्रांनो,
आज चार नवीन आधुनिक अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बंगालला मिळालेल्या आहेत: न्यू जलपाईगुडी–नागरकोइल, न्यू जलपाईगुडी–तिरुचिरापल्ली, अलीपूरद्वार–बंगळुरू आणि अलीपूरद्वार–मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस. यामुळे विशेषतः उत्तर बंगालची दक्षिण आणि पश्चिम भारताशी संपर्कक्षमता अधिक भक्कम होणार आहे. देशाच्या विविध भागांतून बंगाल तसेच पूर्व भारताला भेट देण्यासाठी, विशेषतः गंगासागर, दक्षिणेश्वर आणि कालीघाट येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. तसेच बंगालमधून तामिळनाडू आणि महाराष्ट्राकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही या गाड्या प्रवास सुलभ ठरतील.
मित्रांनो,
आज भारतीय रेल्वे आधुनिक होत असतानाच ती आत्मनिर्भरही होत आहे. भारतातील रेल्वे इंजिने, रेल्वे डबे आणि मेट्रो डबे हे आता भारताच्या तंत्रज्ञानाची ओळख बनत आहेत. आज अमेरिका आणि युरोपपेक्षाही अधिक लोकोमोटिव्ह्जचे उत्पादन भारतात केले जात आहे. जगातील अनेक देशांना आपण प्रवासी रेल्वेगाड्या आणि मेट्रो रेल्वे डब्यांची निर्यात करत आहोत. या सर्व गोष्टींमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होत असून आपल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
मित्रांनो,
भारताला जोडणे हे आमचे प्राधान्य आहे; अंतर कमी करणे हे आमचे ध्येय आहे, आणि आजच्या या कार्यक्रमातूनही ते स्पष्टपणे दिसून येते. या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपले मनःपूर्वक आभार. मला आता येथे जवळच होणाऱ्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे, अनेक लोक माझी प्रतीक्षा करत आहेत. येथे जे काही मुद्दे मी मांडू शकलो नाही, त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण मी त्या कार्यक्रमात देईन, आणि माध्यमांचे लक्षही त्या भाषणाकडे अधिक असेल. आपले मनःपूर्वक आभार.
***
नेहा कुलकर्णी / राज दळेकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215767)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada