पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप इंडियाच्या दशकपूर्ती कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण

प्रविष्टि तिथि: 16 JAN 2026 4:11PM by PIB Mumbai

 

 
माझे मंत्रिमंडळातील सहकारी  पीयूष गोयल जी, देशभरातून आलेल्या स्टार्टअप परिसंस्थेतील मित्रांनो, आणि उपस्थित मान्यवरांनो,
आज आपण सर्वजण येथे एका अतिशय विशेष प्रसंगानिमित्त एकत्र जमलो आहोत. राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या या प्रसंगी, स्टार्टअप क्षेत्रातील संस्थापक आणि नवोन्मेषकांच्या या उपस्थितीत, मला माझ्यासमोर नव्या भारताचे, सतत विकसित होत असलेले भविष्य दिसत आहे.
आताच मला स्टार्टअप क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी संवाद साधण्याची, त्यांच्या यशकथा आणि प्रयोग जवळून पाहण्याची, तसेच त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली. कृषी, फिनटेक, गतिशीलता, आरोग्य आणि शाश्वतता या क्षेत्रांत कार्यरत स्टार्टअप्सच्या कल्पना केवळ मला नव्हे, तर सर्वांनाच प्रभावित करणाऱ्या आहेत. तरीही, तुमच्यातील आत्मविश्वास आणि तुमच्या उंचावलेल्या महत्त्वाकांक्षा यांनी मी भारावलो आहे.
10 वर्षांपूर्वी विज्ञान भवन येथे 500–700 तरुणांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. आज येथे उपस्थित असलेले रितेश यांची उद्योजकीय वाटचाल त्या काळातच सुरू झाली. त्या वेळी स्टार्टअप क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांचे अनुभव मी ऐकत होतो. त्यापैकी एका तरुणीने, कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टार्टअपकडे वळण्याचा निर्णय घेतल्याची आठवण आजही मनात आहे. कोलकात्याला आईला भेटून तिने सांगितले,  मी नोकरी सोडली आहे. आईने विचारले, का? विज्ञान भवन येथे त्या दिवशी तिने ही घटना सांगितली होती. ती म्हणाली,  मला आता स्टार्टअप करायचे आहे. त्यावर तिच्या आईने प्रतिक्रिया दिली, हे तर उध्वस्त होण्यासारखे आहे, तू अनर्थाच्या  मार्गावर का जात आहेस? त्या काळी आपल्या देशात स्टार्टअप्सकडे पाहण्याची मानसिकता अशीच होती. पण आज पाहा, विज्ञान भवनपासून भारत मंडपमपर्यंतचा हा प्रवास, जिथे जागाही अपुरी पडत आहे, आपल्या प्रगतीचे प्रतीक आहे. अवघ्या एका आठवड्यात देशातील युवकांशी दोनदा भेटण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. 12 जानेवारी, राष्ट्रीय युवक दिनी, देशभरातून आलेल्या सुमारे 3 हजार युवकांसोबत मी सुमारे अडीच तास संवाद साधला. आणि आज, आपणा सर्वांचे विचार ऐकण्याची आणि देशातील युवकांच्या सामर्थ्याचे साक्षीदार होण्याची संधी मला मिळत आहे.
मित्रांनो,
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या युवकांचा दृष्टिकोन खऱ्या, प्रत्यक्ष समस्यांचे समाधान शोधण्याकडे वळलेला आहे. नवी स्वप्ने पाहण्याचे धाडस करणाऱ्या आपल्या तरुण नवोन्मेषकांपैकी प्रत्येकाचे मी मनापासून कौतुक करतो.
मित्रांनो,
आज आपण स्टार्टअप इंडियाच्या 10 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आनंद  साजरा करीत आहोत. हा 10 वर्षांचा प्रवास केवळ एका सरकारी योजनेचे यश नाही, तर तुमच्यासारख्या हजारो-लाखो स्वप्नांच्या पूर्णत्वाची कहाणी आहे. असंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरल्याची ही गाथा आहे. 10 वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवून पाहा, तेव्हा वैयक्तिक प्रयत्नांना आणि नवकल्पनांना मर्यादित संधी होत्या. त्या अडथळ्यांना आव्हान देत आम्ही स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात केली. आम्ही आपल्या युवकांना स्वप्ने पाहण्यासाठी मोकळे आकाश दिले, आणि आज त्याचे ठोस परिणाम आपल्या डोळ्यांसमोर आहेत. अवघ्या 10 वर्षात स्टार्टअप इंडिया मिशन एका व्यापक आंदोलनात रूपांतरित झाले आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था आहे. 10 वर्षांपूर्वी देशात 500 पेक्षा कमी स्टार्टअप्स होते; आज ही संख्या 2 लाखांहून अधिक आहे. 2014 मध्ये केवळ 4 युनिकॉर्न्स असलेला भारत, आज सुमारे 125 सक्रिय युनिकॉर्न्स असलेला देश झाला आहे. ही यशकथा संपूर्ण जग आश्चर्याने पाहत आहे. भविष्यात भारताच्या स्टार्टअप प्रवासाचा आढावा घेतला जाईल, तेव्हा या सभागृहातील अनेक तरुण स्वतःच उज्ज्वल उदाहरणे ठरतील.
मित्रांनो,
स्टार्टअप इंडियाची गती सातत्याने वाढताना पाहून मला अत्यंत समाधान वाटते. आजचे स्टार्टअप्स युनिकॉर्न्समध्ये रूपांतरित होत आहेत, युनिकॉर्न्स IPOद्वारे बाजारात येत आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्माण होत आहेत. केवळ 2025 या वर्षातच सुमारे 44,000 नव्या स्टार्टअप्सची नोंदणी झाली. स्टार्टअप इंडियाच्या सुरुवातीपासून एका वर्षात झालेली ही सर्वाधिक भर आहे. हे आकडे स्पष्टपणे दर्शवितात की आपली स्टार्टअप परिसंस्था नवोन्मेष आणि विकासाला चालना देत आहे.
मित्रांनो,
स्टार्टअप इंडियामुळे देशात एक नवा विचारप्रवाह आणि संस्कृती निर्माण झाली आहे, याचा मला विशेष आनंद आहे. याआधी नव्या उद्योगांची सुरुवात प्रामुख्याने मोठ्या उद्योगपतींच्या कुटुंबांतील मुलांकडूनच होत असे, कारण त्यांच्याकडे भांडवल आणि आवश्यक पाठबळ सहज उपलब्ध होते. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील मुलांना बहुतांशी नोकरीचे स्वप्नच पाहावे लागे. मात्र स्टार्टअप इंडिया उपक्रमाने ही दृष्टीकोनच बदलून टाकली आहे. आज टियर-2 आणि टियर-3 शहरांतील, तसेच ग्रामीण भागातील युवक ही स्वतःचे स्टार्टअप्स उभारत आहेत. हे तरुण देशातील मूलभूत आणि तातडीच्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी झटत आहेत. समाज आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची ही भावना मला अत्यंत प्रेरणादायी वाटते.
मित्रांनो,
स्टार्टअप परिसंस्थेतील परिवर्तनात देशातील महिलांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. सध्या 45 टक्क्यांपेक्षा अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार कार्यरत आहे. महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना मिळणाऱ्या निधी च्या दृष्टीने भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. स्टार्टअप्समधील हा समावेशक वेग देशाच्या नवोन्मेष क्षमतेला अधिक बळकटी देत आहे.
मित्रांनो,
आज देश स्टार्टअप क्रांतीत आपले उद्याचे भविष्य पाहत आहे. स्टार्टअप्स इतके महत्त्वाचे का आहेत, असे विचारले तर प्रत्येकाकडे वेगवेगळी उत्तरे असतील. काही म्हणतील की, भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे आणि म्हणूनच स्टार्टअप्ससाठी अफाट संधी आहेत. काही म्हणतील की, भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे स्टार्टअप्ससाठी नवे दरवाजे उघडले आहेत. काहीजण म्हणतील की, देशात जागतिक दर्जाची पायाभूत रचना उभी राहत आहे, नवी क्षेत्रे आकार घेत आहेत आणि त्यामुळे स्टार्टअप व्यवस्था बळकट होत आहे. ही सर्व मते योग्यच आहेत. पण मला सर्वाधिक भावते ते म्हणजे स्टार्टअपची भावना. आजचे युवक सुरक्षित आणि आरामदायी चौकटीत अडकून राहायला तयार नाहीत. जुन्या, चोखाळलेल्या वाटेवर चालणे त्यांना मान्य नाही. त्यांना स्वतःचे नवे रस्ते घडवायचे आहेत, कारण त्यांना नवी उद्दिष्टे आणि नवे टप्पे गाठायचे आहेत.

आणि मित्रांनो,

यशाचे शिखर कसे गाठता येते? त्यासाठी आपल्याला परिश्रम करावे लागतात. आणि म्हणूनच आपल्याकडे असे म्हणतात की, ‘‘ उद्यमेन हि सिद्ध्यन्ति, कार्याणि न मनोरथैः । याचा अर्थ असा आहे की, कोणतेही कार्य निरंतर काहातरी उद्योग करीत राहिले तरच ते सिद्ध होते. केवळ मनोराज्य रचून कोणतेही काम होत नाही. आणि उद्योग करण्याची पहिली अट असते - साहस! तुम्ही सर्वांनी इथंपर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी साहस, धाडस दाखवले असेल. कितीतरी गोष्‍टी  पणाला लावल्या असतील. आधी देशामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नव्हते, उलट काही करू इच्छिणा-या व्यक्तीचा उत्साह कसा कमी होईल, हे पाहिले जात होते. परंतु आज जोखीम पत्करणे ही गोष्‍ट मुख्य प्रवाहातील बनली आहे. दरमहा मिळणा-या निश्चित वेतनाच्या पलिकडे विचार करणा-या मंडळींना आता केवळ स्वीकारलेच जाते असे नाही, तर त्यांना आदरही दिला जात आहे. ज्यांनी जोखीम पत्करून काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या असतील त्यांना थोडे ‘वेगळे ‘  मानले जात होते, आता ही फॅशन रूळली आहे.

मित्रांनो,

मी नेहमीच जोखीम पत्करण्यावर विशेष भर दिला आहे, कारण ही माझी खूप जुनी सवय आहे. जी कामे करायला कोणीही तयार नसत ती मी करतो. अनेक दशकांमध्ये पूर्वीच्या सरकारांनी ज्या कामाची पूर्तता केली नाही, अशी कामे मी करायला पुढे सरसावलो. कारण आधीच्या सरकारांना आपली खुर्ची, सत्ता जाईल, निवडणुकीत पराभव पत्कारावा लागेल, अशी भीती होती. ज्या कामाविषयी, अनेक लोक पुढे येवून सांगतात की, हे काम करणे राजकीयदृष्‍टीने  धोका पत्करण्यासारखे आहे. अशीच कामे करणे, मी आपली जबाबदारी मानतो आणि आघाडी सांभाळून ती कामे करतो. आपल्या सर्वांप्रमाणे माझेही असे म्हणणे आहे की, जे काम देशासाठी करणे अत्यावश्यक आहे, ते कुणाला ना कुणाला तरी करावे तर लागणार आहे. त्यामुळे कुणाला तरी जोखीम पत्करावी लागणारच आहे.  नुकसान झाले तर माझे होईल परंतु फायदा झाला तर माझ्या देशातील कोट्यवधी कुटुंबांना लाभ होईल. 

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांमध्ये देशामध्ये एक अशी परिसंस्था तयार झाली आहे की, त्यामुळे नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळत आहे. आम्ही शाळांमध्ये अटल टिंकरिंग प्रयोगशाळा तयार केल्या. त्यामुळे मुलांमध्ये नवसंशोधनांची प्रवृत्ती निर्माण व्हावी, हा त्यामागे विचार आहे. आम्ही हॅकेथॉन्स सुरू केले, त्यामागे असा विचार आहे की, आपल्या देशातील युवावर्गाला देशापुढील समस्यांवर तोडगे शोधता यावेत. आम्ही इन्क्यूबेशन केंद्रे सुरू केली, स्त्रोतांच्या अभावी युवकांकडे असलेल्या कल्पना मृतप्राय होवू नयेत, असा विचार त्यामागे आहे. 

मित्रांनो,

एकेकाळी अत्यंत जटिल अनुपालनाचा प्रश्न, प्रदीर्घ काळ रेंगाळणारे परवानग्या आणि मान्यतेचे चक्र आणि इन्स्पेक्टर राज यांची भीती होती. या सर्व गोष्‍टी  नवोन्मेषी  संकल्पना प्रत्यक्षात आणण्यातील मोठे अडथळे होते. म्हणूनच आम्ही विश्वास आणि पारदर्शकतेचे वातावरण बनवले. लोकांच्या विश्वासवर ठेवून  कायद्यातील 180 पेक्षा जास्त तरतुदी गुन्हेगारीच्या नियमातून काढून टाकण्यात आल्या. आम्ही तुम्हा मंडळींच्या वेळेची बचत केली. त्यामुळे तुम्हाला नवसंशोधनावर लक्ष केंद्रीत करता यावे, हा त्यामागे उद्देश आहे. तुमचा वेळ कायद्याच्या कचाट्यात अडकून वाया जावू नये, विशेषतः स्टार्टअपच्या बाबतीत कायद्यामध्ये स्वप्रमाणनाची सुविधा देण्यात आली आहे. तसेच विलिनीकरण आणि बाहेर पडणे अधिक सोपे बनवले आहे.

मित्रांनो,

स्टार्टअप इंडिया ही केवळ एक योजना नाही, तर एक ‘इंद्रधनुष्‍यी  दृष्‍टीकोन‘ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण करून, त्यांना जोडण्याचे माध्यम आहे. आता तुम्ही संरक्षण उत्पादन क्षेत्र पहा. यापूर्वी, आधीच्या काळामध्ये स्टार्टअप्समधील निर्मात्यांबरोबर स्पर्धा करण्याची कल्पना तरी केली जावू शकते का? ‘आयडेक्स‘ (आयडेईएक्स) च्या माध्यमातून आम्ही रणनीती क्षेत्रामध्ये स्टार्टअप्ससाठी खरेदीचे नवीन मार्ग मुक्त केले. अंतराळ क्षेत्रामध्ये प्रारंभी खाजगी क्षेत्राला पूर्णपणे बंदी होती. हे क्षेत्रही आता मुक्त केले आहे. आज जवळपास 200 स्टार्टअप्स अंतराळ क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांना वैश्विक मान्यताही मिळत आहे. याचप्रमाणे ड्र्रोन क्षेत्र तुम्ही पहा, अनेक वर्षांपर्यंत विशिष्‍ट  आराखडा, चौकट तयार करण्याअभावी भारत खूप मागे राहिला. आम्ही कालबाह्य नियम काढून टाकले, नवीन संशोधनावर विश्वास दाखवला. 

मित्रांनो,

सार्वजनिक खरेदी व्यवस्थेमध्ये आम्ही जेईएम  म्हणजेच जेम शासकीय ई-बाजारपेठेच्या माध्यमातून प्रवेशाला प्रोत्साहन दिले. आज जवळपास 35 हजार स्टार्टअप्स आणि लघुउद्योग जेमच्या पोर्टलवर आहेत. त्यांना जवळपास 50 हजार कोटी रूपयांच्या अंदाजे 5 लाख ऑर्डर्स मिळत आहेत. एक पद्धतीने स्टार्टअप्स आपल्या क्षेत्रात यश मिळत आहे आणि प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्स नवनवीन संधी शोधून वृद्धिंगत होत आहेत.

मित्रांनो,

आपण सर्वजण जाणतो की, तुमच्याजवळ खूप उत्तम कल्पना असली तरी ती भांडवलाशिवाय बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच आम्ही नवोन्मेषी  कल्पनांसाठी वित्तीय पुरवठा सुनिश्चित केला आहे आणि त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘फंड ऑफ फंडस फॉर स्टार्टअप्स‘ च्या माध्यमातून 25 हजार केटी रूपयांपेक्षा अधिक निधी गुंतवण्यात आला आहे. स्टार्टअप इंडिया सीड फंड , इन -स्पेस सीड फंड, निधी सीड सपोर्ट प्रोग्रॅम, यासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून स्टार्टअप्ससाठी बीज भांडवल पुरवले जात आहे. पतपुरवठा सुलभतेने करण्यासाठी आम्ही पत हमी योजनाही सुरू केली आहे. यामुळे तारणाची कमतरता निर्मितीच्या मार्गामध्ये अडथळा बनणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

मित्रांनो,

आजचे संशोधन ही उद्याची बौद्धिक संपदा बनते. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक लाख कोटी रूपयांचा निधी तयार करून संशोधन, विकास आणि नवोन्मेशी कल्पना योजना सुरू केली आहे. जी उदयोन्मुख क्षेत्रे आहेत, त्यांच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी  या निधीची मदत होईल. त्यासाठीच ‘डीप टेक फंड ऑफ फंडस‘ ही बनविण्यात आला आहे.

मित्रांनो,

आता  आपल्याला भविष्‍यासाठी तयार व्हावे लागेल. आपल्याला  नवनवीन कल्पनांवर काम करण्याची आवश्यकता आहे. आज अनेक असे डोमेन्स उदयित होत आहेत. तेच उद्या देशामध्ये आर्थिक सुरक्षा आणि रणनीतीक स्वायत्तता यामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील. आता एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा क्षेत्राचेच उदाहरण आपल्या समोर आहे. जे राष्‍ट्र  कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रातील वैश्विक क्रांतीमध्ये जितक्या लवकर आघाडी घेईल तसेच  पुढे जाईल, त्याला तितक्या जास्त प्रमाणात फायदा होईल. भारतासाठी हे काम आपल्या स्टार्टअप्सना करायचे आहे. आणि तुम्हा सर्वांना माहिती असेल, फेब्रुवारीमध्ये कृत्रिम प्रज्ञा या विषयावर वैश्विक परिषद आपल्या इथे होत आहे. कृत्रिम प्रज्ञेचा प्रभाव यावर ही जागतिक शिखर परिषद असणार आहे. ही एक खूप मोठी संधी, तुम्हां सर्वांसाठी असणार आहे. आणि मला माहिती आहे की, या कामामध्ये उच्च स्पर्धात्मक मूल्य यासारखी कितीतरी आव्हाने असणार आहेत. ‘इंडिया एआय मिशन‘ च्या माध्यमातून आम्ही यावर तोडगे देत आहोत. आम्ही 38,000 पेक्षा अधिक ‘जीपीयू ऑन-बोर्ड‘ केले आहेत. आमचे प्रयत्न असतील की, मोठे तंत्रज्ञान हे लहान स्टार्टअप्ससाठीही सुलभतेने उपलब्ध व्हावे. यामध्ये आम्ही आणखी काही गोष्‍टी  सुनिश्चित करीत आहोत. यामध्ये स्वदेशी कृत्रिम प्रज्ञा, भारतीय प्रतिभावंतांव्दारे, भारतीय सर्व्हर वापरला जावा, असे वाटते. अशाच प्रकारचा प्रयत्न सेमीकंडक्टर्स, डेटा सेंटर्स, हरित हायड्रोजन आणि इतर क्षेत्रामध्येही केले जात आहेत.

मित्रांनो,

जसे-जसे आपण पुढे जात आहोत, आपल्या महत्वाकांक्षा फक्त भागीदारीपर्यंत मर्यादित राहून चालणार नाही. आपल्याला  वैश्विक नेतृत्व करण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. तुम्ही नवनवीन कल्पनांवर काम करावे, समस्यांवर तोडगे शोधावेत. गेल्या दशकामध्ये आपण डिजिटल स्टार्टअप्समध्ये, सेवा क्षेत्रामध्ये खूप उत्तम कामगिरी केली आहे. आता वेळ आली आहे की, आपल्या स्टार्टअप्स उत्पादनावर जास्त लक्ष केंद्रीत करण्याची! आपण नवीन उत्पादने बनवली पाहिजेत. आपण जगासाठी सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन दिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरामध्येही अतिशय अव्दितीय कल्पना वापरून काम करण्यासाठी आघाडीवर राहिले पाहिजे. हेच भविष्‍य  आहे. आपल्या सर्वांना मी विश्वास देवू इच्छितो की, तुमच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये सरकार तुमच्या बरोबरीने ठाम उभे आहे. तुम्हा सर्वांकडे असलेल्या अमर्याद क्षमतेवर माझा अगदी पक्का विश्वास आहे. तुमच्याकडे असलेले धाडस, विश्वास आणि नवोन्मेषी  कल्पना यामुळे भारताच्या भविष्‍याला चांगला आकार मिळत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशाची क्षमता सिद्ध झाल्या आहेत. आमचे लक्ष्य आता असे असले पाहिजे की, आगामी दहा वर्षांमध्ये भारत  स्टार्टअप्सचे नवीन कल कसे तयार करेल आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अवघ्या दुनियेचे नेतृत्व कसे करेल, हे पाहिले पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप धन्यवाद!!

***
अंबादास यादव / राज दळेकर/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2215573) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu