रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मालवाहतुकीमध्ये रेल्वेने रचला नवा विक्रम


एकाच दिवसात विक्रमी 892 गाड्यांची अदलाबदल करून डीएफसीने परिचालन कार्यक्षमतेचा एक नवीन मापदंड केला प्रस्थापित

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

भारतीय रेल्वे  देशातील मालवाहतुकीची पुनर्व्याख्या करत आहे. रेल्वेने सर्व टोकापर्यंत वेगवान, विश्वासार्ह आणि किफायतशीर  मालवाहतूक उपलब्ध करून देऊन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रगत पायाभूत सुविधा, उच्च-क्षमतेचे कॉरिडॉर आणि आधुनिक परिचालन प्रणाली यांचा मेळ घालून, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डीएफसी) जाळे निर्माण करून विविध प्रदेशांमध्ये मालाची कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित केली आहे, ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होत आहे.

अखंड उच्च-घनतेच्या मालवाहतूक परिचालनाची आपली परंपरा कायम ठेवत, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआय एल) ने डीएफसी नेटवर्कवर आतापर्यंतच्या सर्वाधिक रेल्वेगाड्यांच्या अदलाबदलीसह परिचालन कार्यक्षमतेचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. रविवार, 5 जानेवारी 2026 रोजी डीएफसी जाळे आणि भारतीय रेल्वेच्या पाच विभागांमध्ये एकाच दिवसात एकूण 892 'इंटरचेंज' गाड्या हाताळण्यात आल्या, जो कॉरिडॉर सुरू झाल्यापासून गाठलेले सर्वाधिक इंटरचेंज आहे. यापूर्वीचा विक्रम 4 जानेवारी 2026 रोजी 865 गाड्यांचा होता.

विक्रमी मालवाहतूक अदलाबदलीने प्राप्त झालेल्या या वाढीव कार्यक्षमतेमुळे पारंपरिक रेल्वे मार्गांवरील गर्दी कमी होत आहे, ज्यामुळे प्रवासी रेल्वेसेवा अधिक वेळेवर आणि आरामदायी होत आहेत तसेच दैनंदिन प्रवासातील विलंब कमी होत आहे. यामुळे उद्योगांच्या आर्थिक वाढीलाही चालना मिळत असून अत्यावश्यक वस्तूंचे जलद वितरण आणि कमी वाहतूक खर्चामुळे अखेरीस सामान्य माणसाला फायदा होत आहे.

हा टप्पा डीएफसीसीआयएलच्या वाढत्या परिचालन क्षमतेचे, अधिक मजबूत नियोजन आराखड्याचे आणि सक्षम वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचे प्रतिबिंब आहे.

हा विक्रम भारताच्या लॉजिस्टिक्स परिसंस्थेतील एक सकारात्मक बदल अधोरेखित करतो, ज्यामुळे कोळसा, सिमेंट, कंटेनर आणि कृषी उत्पादनांची वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि संभाव्य वेळेत होण्यास मदत होते, तसेच पारंपरिक रेल्वे जाळ्यावरील गर्दी कमी होते.

भारतीय रेल्वे लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी कार्यक्षमतेने पोहोचवत असतानाच, मालवाहतुकीची उच्च-घनतेची कामे सुरक्षितता, वेग आणि विश्वासार्हतेने हाताळण्यासाठीही ती तितकीच सुसज्ज आहे. आधुनिक इंजिने, डिजिटल देखरेख आणि सुव्यवस्थित यार्ड  आणि  फीडर व्यवस्थापनाद्वारे डीएफसी जाळ्याने कोळसा, सिमेंट, कंटेनर आणि कृषी उत्पादनांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची जलद वाहतूक सक्षम केली आहे. यामुळे एक मजबूत पुरवठा साखळी सुनिश्चित होत आहे, लॉजिस्टिक्स खर्च कमी होत आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण वाढीस हातभार लागत आहे.


सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

 


(रिलीज़ आईडी: 2214750) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Odia , Kannada