गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या BSL-4 बायो-कंटेनमेंट सुविधेची पायाभरणी
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे देशाच्या सर्वांगीण विकासाचे आधारस्तंभ असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास असून BSL-4 प्रयोगशाळा हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2026 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातची राजधानी गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या BSL-4 बायो-कंटेनमेंट सुविधेची पायाभरणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गुजरातच्या भूमीतून आज आपण भारताच्या आरोग्य सुरक्षा, जैव-सुरक्षा आणि जैव क्षेत्राच्या विकासाच्या एका नवीन युगाची सुरुवात करत आहोत, असे उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले. गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्रात BSL-4 बायो-कंटेनमेंट सुविधेची पायाभरणी झाल्यामुळे, येत्या काळात ही सुविधा संपूर्ण देशाच्या आरोग्य क्षेत्रासाठी एक मजबूत संरक्षक कवच म्हणून उदयास येईल, असे ते म्हणाले. हा उपक्रम पंतप्रधान मोदी यांच्या ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान केवळ संशोधन आणि विकासापुरते मर्यादित न राहता, देशाच्या सर्वांगीण विकासाचा पायाभूत आधारस्तंभ बनले पाहिजे’, या दृष्टिकोनावर आधारित असल्याचे शाह यांनी अधोरेखित केले.
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनंतर, ही भारतातील दुसरी उच्च-स्तरीय प्रयोगशाळा असेल. मात्र, राज्य सरकारद्वारे बांधली जात असलेली ही देशातील पहिलीच प्रयोगशाळा असून याचे श्रेय गुजरातला जाते, असे ते म्हणाले.
जगभरातील BSL प्रयोगशाळांचा अभ्यास करून BSL-4 बायो-कंटेनमेंट सुविधा विकसित केली जात आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले. येथे प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या रोगांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधाही असतील, असेही त्यांनी सांगितले. एका अभ्यासानुसार, 60 ते 70 टक्के रोग प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतात आणि म्हणूनच भारताने मानव आणि प्राणी दोघांच्याही सुरक्षेची खात्री करण्यासाठी 'वन हेल्थ मिशन' सुरू केले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. आता आपल्या शास्त्रज्ञांना धोकादायक विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी परदेशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. परदेशी देशांवरील हे अवलंबित्व संपल्यामुळे चाचणीला गती मिळेल आणि आपण आत्मनिर्भर होऊ, असे त्यांनी नमूद केले. BSL-4 सुविधा सर्व गरजा पूर्ण करेल. आपल्याला संशोधन-आधारित कायमस्वरूपी सुरक्षा हवी आहे आणि ही प्रयोगशाळा आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित शाह म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत जैवतंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व विकास झाला आहे. आपण जैव क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे आणि या क्षेत्राची प्रचंड क्षमता आहे. ते म्हणाले की 2014 मध्ये भारताची जैव-अर्थव्यवस्था 10 अब्ज डॉलर्सची होती आणि 2024 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती वाढून 166 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यांनी पुढे सांगितले की केवळ 10 वर्षांत 17 पट झालेली ही वाढ असे दर्शवते की, जर सरकारकडून पाठिंबा आणि आवश्यक पायाभूत सुविधा मिळाल्या तर भारतातील तरुण आणि उद्योजक जैव-अर्थव्यवस्था क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी सांगितले की 2014 मध्ये जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्टअप्सची संख्या 500 हून कमी होती तर आता 2025 पर्यंत ती 10,000 पेक्षा जास्त झाली आहे.
ते म्हणाले की भारत सरकारने बायो ई-3 (अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगार) धोरण लागू करून जैवतंत्रज्ञानाला चालना देण्याचा निर्णय घेतला असल्याने आपण खूप पुढे जाऊ शकतो.
अमित शाह यांनी सांगितले की जैवतंत्रज्ञान धोरणांतर्गत 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आणि 1 लाख रोजगारांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मेगा प्रकल्पांसाठी विशेष मदतीची घोषणाही करण्यात आली आहे.
गृहमंत्री म्हणाले की, प्रतिजैविक औषधांप्रती विकसित होत असलेली वाढती प्रतिकारक्षमता हा आपल्या समाजासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी एक अत्यंत गंभीर धोका आहे. ही एक 'मूक आपत्ती' आहे. ते म्हणाले की, प्रतिजैविक प्रतिरोध (एएमआर) हे संपूर्ण समाजासाठी एक मोठे संकट आहे आणि येत्या काळात ते भावी पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या व्यापक संक्रमणाचे कारण बनेल. ते म्हणाले की, एएमआरचा सामना करण्यासाठी एक स्पष्ट आराखडा, वेळेवर उपचार आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत जागरूकता पसरवणे आवश्यक आहे. संसर्ग रोखणे आणि प्रतिजैविके भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे हे आपले ध्येय असले पाहिजे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214265)
आगंतुक पटल : 14