शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2026 मध्ये पीएम-युवा 3.0 च्या लेखकांशी संवाद साधला
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयात, पीएम-युवा 3.0 (पंतप्रधानांची युवा लेखक मार्गदर्शन योजना) अंतर्गत निवडलेल्या 43 तरुण लेखकांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या एका संवादात्मक सत्रात, निवडक लेखकांनी सहा महिन्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत हस्तलिखिते विकसित करण्याच्या त्यांच्या आगामी उपक्रमाबद्दल संक्षिप्त माहिती दिली.

या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रधान यांनी या कार्यक्रमासाठी निवड झाल्याबद्दल युवा लेखकांचे अभिनंदन केले आणि भारतीय युवकांना वाचन, लेखन आणि सखोल ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा यादृष्टीने आपल्या मार्गदर्शन कालावधीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करुन अर्थपूर्ण पुस्तकांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
संशोधन साहित्य उपलब्ध असण्याचे महत्त्व अधोरेखित करुन त्यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या माध्यमातून डिजिटल आणि प्रत्यक्ष असे दोन्ही प्रकारचे साहित्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. याशिवाय लेखकांना वन नेशन वन सब्सक्रिप्शन उपक्रमाअंतर्गत साहित्य उपलब्ध करुन दिले जावे, असेही त्यांनी सांगितले. या लेखकांना शैक्षणिक आणि संशोधन विषयक पाठिंबा देण्याच्या उद्देशाने निवडक लेखकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये हस्तलिखिते लिहिण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांशी संलग्न केले जावे, अशी सूचना त्यांनी केली.

युवा लेखकांशी संवाद साधताना आपल्याला अतिशय आनंद झाल्याचे सांगून धर्मेंद्र प्रधान म्हणाले की पी एम - युवा 3.0 योजनेअंतर्गत निवड झालेल्या या निवडक उदयोन्मुख लेखकांशी संवाद साधून संतोष वाटला तसेच हा कक्ष भारतातील विविधता प्रतिंबिंबित करत आहे. हे युवा लेखक, परदेशस्थ भारतीय समुदायाचे राष्ट्र उभारणीतील योगदान, भारतीय ज्ञान प्रणाली आणि आधुनिक भारताचे शिल्पकार इत्यादी संकल्पनांवर पुस्तक लिहीत असल्याचे ते म्हणाले.
या संवादात्मक सत्रात संस्कृती, तंत्रज्ञान, ज्ञानाचा ध्यास आणि राष्ट्रीय दृष्टिकोन इत्यादी विषयांवर मुक्त चर्चा झाली तसेच युवा लेखकांची ऊर्जा, आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा यांमुळे विकसित भारताबद्दलचा आपला दृष्टिकोन अधिकच मजबूत झाला, असे प्रधान यांनी सांगितले.
पीएम-युवा 3.0 अंतर्गत निवडलेले 43 लेखक नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्यात (10-18 जानेवारी 2026) आयोजित राष्ट्रीय शिबिरात सहभागी झाले आहेत. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत 'नॅशनल बुक ट्रस्ट' - इंडिया द्वारे राबवल्या जाणाऱ्या या मेळाव्याचे उदघाटन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 10 जानेवारी 2026 रोजी झाले.
पीएम-युवा 3.0 अंतर्गत युवा लेखकांना वाचन, लेखन आणि ज्ञाननिर्मितीची संस्कृती जोपासण्यासाठी प्रोत्साहन देऊन भारताच्या बौद्धिक तसेच सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी, एनबीटी-इंडियाचे संचालक युवराज मलिक, प्रधान मंत्री संग्रहालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रियंका मिश्रा, एनबीटी-इंडियाचे मुख्य संपादक आणि सहसंचालक कुमार विक्रम आणि प्रधानमंत्री संग्रहालय सहसंचालक रवी के. मिश्रा उपस्थित होते.
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214135)
आगंतुक पटल : 13