युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघांना 'क्रीडाक्षेत्रात मेक इन इंडिया' आणि 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयांवर समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2026 12:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा संघटनांना त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये 'क्रीडाक्षेत्रात मेक इन इंडिया' आणि 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयांवर समर्पित समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रात भारताचा सहभाग अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संबंध विषयक समिती सर्व संबंधित आंतरराष्ट्रीय महासंघांमधील आणि वैधानिक मंडळांमधील घडामोडींवर देखरेख ठेवेल, ज्यामध्ये नियम आणि रचनात्मक बदल, प्रशासकीय आराखडा, निवडणुका आणि खेळाडूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांचा समावेश असेल.
याशिवाय ही समिती एका मध्यम अवधीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य धोरणाची आखणी करेल ज्यामध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सामंजस्य करार, संयुक्त प्रशिक्षण सराव, देवाणघेवाण उपक्रम, ज्ञान-वाटपाचे उपक्रम आणि भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या संधी यांचा समावेश असेल.
यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय करार हे भारत सरकारच्या धोरणांशी, ऑलिम्पिक सनदेशी आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या नियमांशी सुसंगत असतील, तसेच सुशासन, उत्तेजक-विरोधी नियमांचे पालन आणि खेळाडूंच्या संरक्षणाच्या तत्त्वांचे पालन होत आहे की नाही हे सुनिश्चित करता येईल.
याशिवाय भारतीय खेळाडूंना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि क्रीडा विज्ञानाचे सहाय्य मिळावे यासाठी ही समिती इतर राष्ट्रांच्या राष्ट्रीय महासंघांबरोबर आणि आघाडीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संशोधन आणि शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य वृद्धिंगत करेल
याशिवाय बोली प्रक्रियेत वेळेवर सहभाग घेता यावा यासाठी ही समिती सर्व आंतरराष्ट्रीय महासंघांबरोबर समन्वय साधेल तसेच भारतात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठीचे सर्व प्रस्ताव माहितीसाठी आणि आवश्यकतेनुसार, प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्व सल्लामसलत किंवा मंजुरीसाठी मंत्रालयासोबत आगाऊ सामायिक केले जातील.
मेक इन इंडिया क्रीडा समिती संबंधित क्रीडाप्रकारातील उत्पादनाचा विकास, चाचणी आणि प्रमाणपत्र इत्यादी सुविधा बहाल करण्यासाठी सर्व भारतीय उत्पादक, स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि परीक्षण आणि प्रमाणीकरण संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी घेतील, ज्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत देशांतर्गत क्रीडा उत्पादन परिसंस्थेला चालना मिळेल.
'मेक इन इंडिया इन स्पोर्ट्स' समिती संबंधित क्रीडा प्रकारातील उत्पादन विकास, चाचण्या आणि प्रमाणपत्रांची सोय करण्यासाठी भारतीय उत्पादक, स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि चाचणी आणि मानकीकरण संस्थांशी संवाद साधण्याची जबाबदारी घेईल, ज्यामुळे 'मेक इन इंडिया' अंतर्गत अपेक्षित देशांतर्गत क्रीडा उत्पादन परिसंस्थेला चालना मिळेल.
याशिवाय ही समिती स्थानिक उपायांच्या वापरासंदर्भात नियतकालिक अहवाल देखील तयार करेल. यामध्ये मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत यांना दिलेले योगदान केंद्रस्थानी ठेवून केलेली प्रगती, आलेली आव्हाने, राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या अंतर्गत विचारात घेण्यासारख्या सूचना यांचा समावेश असेल
आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी:
या समितीमध्ये महासंघातील वरिष्ठ सदस्य, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि जागतिक क्रीडा प्रशासन आणि धोरणात्मक पातळीवरील अनुभवसिद्ध तज्ञ व्यक्तींचा समावेश असेल. समितीची रचना आणि कार्यकक्षा यासह तिचा संपूर्ण तपशील, या सल्ल्याच्या निर्देशानंतर 30 दिवसांच्या आत मंत्रालयाला कळवण्यात यावा.
मेक इन इंडिया इन स्पोर्ट्ससाठी:
या समितीमध्ये महासंघातील वरिष्ठ सदस्य, तांत्रिकदृष्ट्या तज्ञ व्यक्ती, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि क्रीडा उपकरणे उत्पादन, तंत्रज्ञान किंवा मानके या क्षेत्रात अनुभव असलेला किमान एक सदस्य असेल. समितीची रचना आणि कार्यकक्षा यासह तिचा संपूर्ण तपशील, या सल्ल्याच्या निर्देशानंतर 60 दिवसांच्या आत मंत्रालयाला कळवण्यात यावा.
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214066)
आगंतुक पटल : 15