पंतप्रधान कार्यालय
श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पुस्तक प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार
महाराजांच्या रचना मानवतेसमोरील आव्हानांवर आध्यात्मिक उपाय सुचवतात - पंतप्रधान
युवा शक्ती सांस्कृतिक मुळे बळकट करत विकसित भारताला गती देत आहे - पंतप्रधान
पंतप्रधानांनी समाज आणि राष्ट्रासाठी नऊ संकल्पांचा केला पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2026 1:44PM by PIB Mumbai
श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पु्स्तक प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपले विचार मांडले. उपस्थितांना संबोधित करताना, मोदी म्हणाले की, या पवित्र प्रसंगी ते सर्वप्रथम पूज्य भुवनभानूसुरीश्वरजी महाराज यांच्या चरणी नमन करत आहेत आणि प्रशांतमूर्ती सुविशाल गच्छाधिपती पूज्य श्रीमद् विजय राजेंद्रसूरीश्वरजी महाराज, पूज्य गच्छाधिपती श्री कल्पतरुसूरीश्वरजी महाराज, सरस्वती कृपापात्र परम पूज्य आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्नसुंदरसूरीश्वरजी महाराज आणि समारंभात उपस्थित असलेल्या सर्व संत आणि साध्वींना आदरपूर्वक वंदन करत आहेत. त्यांनी ऊर्जा महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
ज्यांनी आपले ज्ञान केवळ धर्मग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात अनुकरण केले आहे अशा, श्रीमद् विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांच्या 500 व्या पु्स्तक प्रकाशनाचे आज आपण साक्षीदार होत आहोत, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. महाराजांचे व्यक्तिमत्व संयम, साधेपणा आणि स्पष्टता यांचा विलक्षण संगम असल्याचे सांगून ते जेव्हा लिहितात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये अनुभवाची खोली असते, ते बोलतात तेव्हा त्यांच्या आवाजात करुणेची ताकद असते आणि त्यांच्या मौनातूनही मार्गदर्शन मिळते यावर पंतप्रधानांनी भर दिला. महाराजांच्या 500 व्या पुस्तकाचा विषय, 'प्रेमनु विश्व, विश्वनो प्रेम' असल्याचे त्यांनी नमूद केले, हा विषय खूप काही सांगतो आणि या पुस्तकामुळे समाजाला, तरुणांना आणि मानवतेला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा विशेष प्रसंग आणि ऊर्जा महोत्सवामुळे लोकांमध्ये नव्या विचारांची ऊर्जा निर्माण होईल असे नमूद करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी, महाराजांच्या 500 पुस्तकांची मालिका म्हणजे विचारांच्या अगणित रत्नांनी भरलेला महासागर असून मानवी समस्यांवर सुलभ आणि आध्यात्मिक उपाय सुचवतात, असे नमूद केले. काळ आणि परिस्थितीनुसार हे विविध ग्रंथ मार्गदर्शक प्रकाश ठरतील यावरही त्यांनी भर दिला. अहिंसा अपरिग्रह आणि अनेकांत यांची तीर्थंकर आणि पूर्वाीच्या आचार्यांनी दिलेली शिकवण तसेच प्रेम, सहिष्णुता आणि एकोपा यांसारखी मूल्ये या लेखनामध्ये आधुनिक आणि समकालीन स्वरूपात पहायला मिळतात.
विशेष करून आज जेव्हा जग विभाजन आणि संघर्षाशी झुंज देत आहे, तेव्हा 'प्रेमनु विश्व, विश्वनो प्रेम' याची पूर्वीपेक्षा अधिक गरज आहे, यावर त्यांनी भर दिला. हे केवळ एक पुस्तक नाही, तर एक मंत्र आहे, जो प्रेमाच्या शक्तीची ओळख करून देतो तसेच जगाला अपेक्षित असलेल्या शांती आणि सौहार्दाचा मार्ग दाखवतो, असेही त्यांनी सांगितले.
जैन तत्त्वाचा मार्गदर्शक सिद्धांत 'परस्परोपग्रहो जीवनाम' आहे, ज्याचा अर्थ प्रत्येक जीवन दुसऱ्याशी जोडलेले आहे, हे त्यांनी नमूद केले. जेव्हा हे तत्त्व समजून घेतले जाते, तेव्हाच आपला दृष्टीकोन व्यक्तीकडून समाजाकडे वळतो आणि आपण वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे जाऊन समाज, राष्ट्र आणि मानवतेच्या ध्येयांचा विचार करू लागतो, हे त्यांनी स्पष्ट केले. याच भावनेने आपण नवकार मंत्र दिनात सामील झालो होतो , जिथे जैन धर्मातील चारही पंथ एकत्र आले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी नऊ आवाहने , नऊ संकल्प मांडले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आज त्यांनी ते संकल्प पुन्हा अधोरेखित केले: पहिला संकल्प पाणी वाचवण्याचा, दुसरा 'एक पेड मॉं के नाम ', तिसरा स्वच्छतेचे अभियान पुढे नेण्याचा, चौथा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा, पाचवा भारत दर्शन करण्याचा, सहावा नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा, सातवा निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा, आठवा जीवनात योग आणि खेळांना स्थान देण्याचा आणि नववा गरिबांना मदत करण्याप्रति वचनबद्धता बाळगण्याचा.
"आज भारत जगातील सर्वात तरुण राष्ट्रांपैकी एक आहे, येथील तरुण विकसित भारताची उभारणी करत आहेत आणि त्याचबरोबर सांस्कृतिक मुळेही मजबूत करत आहेत," असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या परिवर्तनात महाराज साहेबांसारख्या संतांचे मार्गदर्शन, त्यांचे साहित्य आणि त्यांचे शब्द महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून समारोप केला आणि महाराज साहेबांच्या 500 व्या पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच महाराजांचे विचार भारताच्या बौद्धिक, नैतिक आणि मानवी प्रवासाला सतत प्रकाशित करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2213419)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam