संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलातर्फे लक्षद्वीप बेटांवर आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 2:45PM by PIB Mumbai
भारतीय नौदलातर्फे 12 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात संयुक्त सेवा बहु-विशेषता वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन आरोग्य सेवा विस्तार, सामुदायिक कल्याण आणि निरंतर नागरी-लष्करी सहकार्याप्रती नौदलाची वचनबद्धता अधोरेखित करते. या पाच दिवसीय आरोग्य शिबिराचे औपचारिक उद्घाटन नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या हस्ते केले जाईल. लक्षद्वीपच्या रहिवाशांना विशेषज्ञांचा सल्ला, उपचार सेवा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियासंबंधी सर्वसमावेशक सेवा प्रदान करणे हा या शिबिराचा उद्देश आहे.
या शिबिरात अगात्ती, कवरत्ती, अँड्रोथ, अमिनी आणि मिनिकॉय बेटांचा समावेश असेल. हे शिबिर भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलातील अनुभवी वैद्यकीय अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असलेल्या संयुक्त सेवा वैद्यकीय पथकाद्वारे आयोजित केले जाईल. तिन्ही सेवांमधील व्यावसायिकांच्या सहभागामुळे वैद्यकीय कौशल्याची विस्तृत श्रेणी सुनिश्चित होईल, ज्यामुळे शिबिराच्या कालावधीत सर्वसमावेशक आणि एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणे शक्य होईल.
दंत शस्त्रक्रियेसह अनेक मूलभूत विशेष शाखांमध्ये आणि कार्डिओलॉजी, एंडोक्राइनोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यांसारख्या काही सुपर-स्पेशालिटी शाखांमध्ये वैद्यकीय सल्ला देण्याची सेवा पुरवली जाईल.
बाह्यरुग्ण तपासणीव्यतिरिक्त, या शिबिरादरम्यान शस्त्रक्रिया पथकांद्वारे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि निवडक सामान्य शस्त्रक्रिया केल्या जातील. या प्रक्रिया स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पार पाडल्या जातील. शिबिरातील शस्त्रक्रिया या घटकामुळे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांच्या जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारेल अशी अपेक्षा आहे. बेटांवर वैद्यकीय तज्ञांकडून तपासणी आधीच सुरू झाली आहे.
शिबिराच्या कालावधीनंतरही उपचारांमध्ये सातत्य राखले जावे यासाठी वैद्यकीय पथके पुढील काळजीबाबत मार्गदर्शनही करतील. उपचारात्मक आणि शस्त्रक्रिया सेवांसोबतच, या शिबिरात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्य जागृतीवर विशेष भर दिला जाईल. वैद्यकीय अधिकारी जीवनशैली-संबंधित आजार, माता आणि बाल आरोग्य समस्या, पोषण आणि सामान्य आरोग्याच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी समुदाय सदस्यांशी संवाद साधतील.
या उद्घाटन समारंभाला भारतीय नौदलाचे वरिष्ठ नेतृत्व उपस्थित राहणार आहे, ज्यात दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल समीर सक्सेना; सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या महासंचालक सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सरीन; आणि वैद्यकीय सेवा (नौदल) च्या महासंचालक सर्जन व्हाईस ॲडमिरल कविता सहाय यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या प्रशासकांचे सल्लागार आणि लक्षद्वीप प्रशासन व सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामुळे मोठ्या संख्येने रहिवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि भारतीय नौदल व लक्षद्वीपच्या लोकांमधील विश्वास आणखी दृढ होऊ शकेल.
AG5E.jpg)
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213252)
आगंतुक पटल : 27