माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीने डीडी न्यूज वाहिनीवर सुरू केला क्रिएटर्स कॉर्नर कार्यक्रम; देशभरातील डिजिटल निर्मात्यांना व्यापक पाठबळ
2026 हे वर्ष प्रसार भारतीसाठी मोठ्या सुधारणांचे वर्ष ठरणार: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
क्रिएटर्स कॉर्नर कार्यक्रम म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या ‘केशरी अर्थव्यवस्था’च्या दृष्टिकोनाचं प्रतिबिंब: डॉ. एल. मुरुगन
वेव्हज मंचाने दिली निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी; 1 कोटी युवकांना संधी, 5,000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल: अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 7:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
डिजिटल मजकूर निर्मात्यांना ओळख मिळवून देण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, आज प्रसार भारतीने क्रिएटर्स कॉर्नर) हे एक खास व्यासपीठ सुरू केलं. देशभरातील डिजिटल निर्मात्यांनी तयार केलेले कार्यक्रम आता डीडी न्यूज या वाहिनीवर दाखवले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील 11 वर्षांत भारताने प्रत्येक क्षेत्रात सुधारणा पाहिल्या आहेत आणि आता त्या सुधारणा प्रसार भारतीमध्येही दिसत आहेत, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले.2026 हे वर्ष प्रसार भारतीसाठी मोठ्या सुधारणांचे असेल, कारण माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची पूर्णपणे पुनर्रचना होणार आहे. या सुधारणांमुळे दूरदर्शन आणि आकाशवाणी सारख्या संस्थांना उद्योगातील सहभाग, नवीन पिढीतील निर्माते आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रियांकडे वळवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. क्रिएटर्स कॉर्नर उपक्रमाची सुरुवात ही या सुधारणांच्या वाटचालीतील पहिली पायरी आहे. त्यांनी गेल्या वर्षी सुरू झालेल्या वेव्हज या प्रसार भारतीच्या स्वतःच्या ओटीटी (ओव्हर द टॉप) डिजिटल मंचाचा त्यांनी उल्लेख केला. वेव्हजमुळे निर्माते अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला आहे. 1 कोटी युवक जोडले गेले, नवीन रोजगार निर्माण झाले आणि जवळपास Rs. 5,000 कोटी रुपयांचे योगदान दिले गेले, असे त्यांनी सांगितले.

दूरदर्शनचा क्रिएटर्स कॉर्नर हा भारतातील निर्मात्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. ही उपाययोजना पंतप्रधानांच्या केशरी अर्थव्यवस्थेच्या म्हणजे सर्जनशीलता आणि संस्कृतीवर आधारित अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, असे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले. छोटी शहरे आणि प्रदेशांमधील निर्माते स्वतः आशय तयार करत आहेत, संपादन करत आहेत आणि नफा वाटून घेत आहेत. मोठ्या स्टुडिओशिवाय आपले उपजीविकेचे साधन निर्माण करत आहेत. आता दूरदर्शन त्यांना एक मजबूत राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठ देणार आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी दूरदर्शन टीमचे अभिनंदन केले.

सर्व प्रकारचे निर्माते सक्रियपणे, जबाबदारीने आणि समान संधींसह आपले आशय तयार करून देशभरात पोहोचवू शकतील अशी व्यवस्था या उपक्रमामुळे तयार होणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितले. निर्मात्यांना फक्त कलाकार म्हणून नव्हे तर पूर्ण आशय निर्माते म्हणून ओळखले जाईल. हा कार्यक्रम डीडीन्यूज वाहिनीवर सुरू होत आहे आणि हळूहळू त्याची व्याप्ती दूरदर्शनच्या सगळ्या वाहिन्यांपर्यंत वाढवण्यात येईल. विविध भाषा, प्रदेश आणि प्रकारांतील निर्मात्यांना त्यामुळे राष्ट्रीय व्यासपीठ मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असलेला वेळ मिळणार असल्यामुळे निर्मात्यांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल आणि सरकारी प्रसारणातून अनेक प्रकारचे विचार आणि अनुभव दिसतील, त्यामुळे कार्यक्रम अधिक चांगले होतील.
डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने, प्रसार भारती आणि वैयक्तिक डिजिटल आशय निर्माते यांच्यातील भागीदारीतून दर्जेदार आशय निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच त्याचा प्रसार वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. क्रिएटर्स कॉर्नर या उपक्रमांतर्गत बातम्या व चालू घडामोडी, संस्कृती, पर्यटन, खाद्यसंस्कृती, कला व साहित्य, संगीत व नृत्य, आरोग्य, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, प्रेरणादायी कथा, पर्यावरण व शाश्वत विकास तसेच मनोरंजन अशा विविध विषयांवरील आशय सादर करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 7 वाजता दूरदर्शन वृत्तवाहिनी डीडी न्यूजवर प्रसारित करण्यात येईल. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पुनःप्रसारण करण्यात येईल. प्रत्येक भागामध्ये विविध विषयांवरील 4 ते 6 रील्स किंवा चित्रफितींचा समावेश असेल.
हा उपक्रम डिजिटल आशय निर्माते आणि प्रसार भारती यांच्यासाठी परस्पर लाभदायक ठरणार आहे. यामुळे डिजिटल निर्मात्यांना विश्वासार्ह व्यासपीठ तसेच प्रसार भारती, डीडी न्यूजचा व्यापक प्रेक्षकवर्ग उपलब्ध होणार असून, प्रसार भारतीला तरुण प्रेक्षकांशी सुसंगत, नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण आशय सादर करता येणार आहे.
या उपक्रमाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आशय निर्मात्यांनी आपला आशय ddnews.creatorscorner[at]gmail[dot]com या ई-मेल पत्त्यावर पाठवावा किंवा अधिक माहितीसाठी +91-8130555806 या क्रमांकावर संपर्क साधावा.
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213046)
आगंतुक पटल : 24