पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे  केले उद्घाटन


भारताची विकासाची गाथा आणि व्हॉलीबॉलचा खेळ यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत; व्हॉलीबॉल आपल्याला शिकवतो की कोणताही विजय एकट्याच्या जोरावर  मिळत नाही आणि आपले यश आपल्या समन्वयावर, आपल्या विश्वासावर आणि आपल्या संघाच्या सज्जतेवर अवलंबून असते: पंतप्रधान

प्रत्येकाची स्वतःची विशिष्ट भूमिका, स्वतःची विशिष्ट जबाबदारी असते आणि जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडते तेव्हाच आपल्याला यश मिळते; आपला देशही याच प्रकारे प्रगती करत आहे: पंतप्रधान

2014 पासून विविध खेळांमध्ये भारताची कामगिरी सातत्याने सुधारली आहे आणि जेव्हा आपण Gen-Z पिढीला खेळाच्या मैदानावर तिरंगा फडकवताना पाहतो, तेव्हा आपल्याला खूप अभिमान वाटतो: पंतप्रधान

2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार आहेत आणि 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी देश जोरदार प्रयत्न करत आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 04 JAN 2026 1:12PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदी यांनी वाराणसीचे खासदार म्हणून सर्व खेळाडूंचे स्वागत करताना आणि त्यांचे अभिनंदन करताना होणारा विशेष आनंद व्यक्त केला. राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा आजपासून वाराणसीमध्ये सुरू होत असल्याचे त्यांनी घोषित केले. सर्व खेळाडू प्रचंड मेहनतीनंतर या राष्ट्रीय स्पर्धेत पोहोचले आहेत आणि येत्या काही दिवसांत वाराणसीच्या मैदानावर त्यांच्या प्रयत्नांची कसोटी लागणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले . देशातील 28 राज्यांचे संघ येथे एकत्र आले असून यामधून 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सुंदर चित्र सादर होत आहे, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी स्पर्धेमधील सर्व सहभागींचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
बनारसी भाषेतील एका स्थानिक म्हणीचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, खेळाडू आता वाराणसीमध्ये आले आहेत आणि ते या शहरालाही जाणून घेतील. वाराणसी हे क्रीडाप्रेमींचे शहर असून तिथे कुस्ती, आखाडे, मुष्टियुद्ध , नौका शर्यती आणि कबड्डी हे खूप लोकप्रिय आहेत असे त्यांनी सांगितले. वाराणसीने अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवले आहेत आणि बनारस हिंदू विद्यापीठ, यूपी कॉलेज आणि काशी विद्यापीठासारख्या संस्थांमधील खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे त्यांनी नमूद केले.  हजारो वर्षांपासून वाराणसीने ज्ञान आणि कलेच्या शोधात येथे येणाऱ्या सर्वांचे स्वागत केले आहे, हे मोदी यांनी अधोरेखित केले.  राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये वाराणसीचा उत्साह कायम राहील, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील आणि वाराणसीच्या आदरातिथ्याच्या समृद्ध परंपरेचा अनुभवही त्यांना येईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी अधोरेखित केले की व्हॉलीबॉल हा काही सर्वसामान्य खेळ नाही, कारण तो संतुलन आणि सहकार्याचा खेळ आहे.  या खेळात  चेंडू नेहमी वर उचलून ठेवण्याच्या प्रयत्न केला जातो. त्यातून खेळाडूंचा दृढनिश्चय देखील दिसून येतो. व्हॉलीबॉल या खेळात खेळाडू संघभावनेने एकत्र येतात , इथे प्रत्येक खेळाडू 'संघ प्रथम' या मंत्राने प्रेरित असतो, असे त्यांनी सांगितले. जरी प्रत्येक खेळाडूकडे वेगवेगळी कौशल्ये असली तरी, सर्वजण एकत्रितपणे आपल्या संघाच्या विजयासाठी खेळतात, हे त्यांनी अधोरेखित केले.

मोदी यांनी भारताच्या विकास गाथेतील आणि व्हॉलीबॉलमधील साम्य अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की, व्हॉलीबॉल हा खेळ शिकवतो की कोणतेही यश एकट्याने मिळत नाही, तर ते समन्वय, परस्पर विश्वास आणि संघाच्या सज्जतेवर अवलंबून असते. प्रत्येकाची स्वतःची भूमिका आणि जबाबदारी असते, आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य गांभीर्याने पार पाडले तरच यश मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रही याच पद्धतीने प्रगती करत आहे. स्वच्छतेपासून डिजिटल देयकांपर्यंत, ‘एक पेड मां के नाम’ पासून विकसित भारताच्या अभियानापर्यंत, यात प्रत्येक नागरिक, प्रत्येक घटक आणि प्रत्येक राज्य सामूहिक जाणीव आणि ‘भारत प्रथम’ या भावनेने कार्यरत आहे.
आज जग भारताच्या वाढीची आणि अर्थव्यवस्थेची प्रशंसा करत असल्याचे नमूद करताना, मोदी म्हणाले की, ही प्रगती केवळ आर्थिक आघाडीपुरती मर्यादित नाही, तर ती क्रीडाक्षेत्रात दिसणाऱ्या आत्मविश्वासातूनही प्रतिबिंबित होते. 2014 पासून विविध खेळांमध्ये भारताची कामगिरी सातत्याने सुधारत गेली आहे, असे त्यांनी सांगितले आणि मैदानावर तिरंगा उंचावणाऱ्या `जेन-झी` खेळाडूंना पाहून अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, एक काळ असा होता जेव्हा सरकार आणि समाज दोघेही खेळांबाबत उदासीन होते, ज्यामुळे खेळाडूंमध्ये त्यांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती आणि फारच कमी तरुणांनी खेळांना कारकिर्द  म्हणून स्वीकारले होते. मात्र, गेल्या दशकात सरकार आणि समाजाच्या खेळांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सरकारने क्रीडा क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये लक्षणीय वाढ केली असून, आज भारताची क्रीडा रचना ‘खेळाडूकेंद्रित’ झाली आहे. प्रतिभेची ओळख, वैज्ञानिक प्रशिक्षण, पोषण आणि पारदर्शक निवड प्रक्रिया यांवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक पातळीवर खेळाडूंचे हित सुनिश्चित केले जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.
“आज राष्ट्र सुधारणेच्याा गतीवर स्वार आहे आणि प्रत्येक क्षेत्र तसेच प्रत्येक विकास क्षेत्र  त्याच्याशी जोडलेले आहे; क्रीडाक्षेत्रही त्यापैकीच एक आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा आणि `खेलो भारत` धोरण 2025 यांसह क्रीडा क्षेत्रात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांचा उल्लेख केला. या सुधारणांमुळे योग्य प्रतिभेला संधी मिळेल आणि क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शकता वाढेल, असे त्यांनी सांगितले. या तरतुदींमुळे तरुणांना एकाच वेळी क्रीडा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत प्रगती करता येईल, यावरही त्यांनी भर दिला.
टीओपीएससारख्या उपक्रमांमुळे भारतातील क्रीडा परिसंस्थेत परिवर्तन घडत असल्याचे नमूद करताना, मोदी म्हणाले की, मजबूत पायाभूत सुविधा उभारणे, निधी व्यवस्था बळकट करणे आणि तरुण खेळाडूंना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. गेल्या दशकात भारताने फिफा अंडर-17 विश्व करंडक, हॉकी विश्व करंडक आणि प्रमुख बुद्धिबळ स्पर्धांसह अनेक शहरांमध्ये 20 पेक्षा अधिक मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. “2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार आहेत आणि 2036 ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी देश जोरदार प्रयत्न करत आहे. याचा उद्देश अधिकाधिक खेळाडूंना स्पर्धा करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.

शालेय स्तरावरही तरुण धावपटूंना ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची ओळख करून देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे सांगून, मोदी म्हणाले की, खेलो इंडिया मोहिमेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपुर्वी, सांसद खेल महोत्सवाची सांगता झाली. त्यामध्ये एक कोटी तरुणांनी त्यांचे कौशल्य सादर केले.वाराणसीचा खासदार म्हणून त्यांनी अभिमानाने नमूद केले की  सांसद खेल  महोत्सवादरम्यान, वारासणीच्या सुमारे तीन  लाख तरुणांनी त्यांचे कौशल्य व क्षमता सादर केल्याचे सांगितले.
क्रीडा विषयक पायाभूत सुविधांमधील बदलांचाही वाराणसीला फायदा होत असल्याचे अधोरेखित करून मोदी म्हणाले की, आधुनिक क्रीडा सुविधा विकसित केल्या जात आहेत आणि विविध खेळांसाठी क्रीडा संकुले उभारली जात आहेत. नवीन क्रीडा संकुलांमुळे जवळच्या जिल्ह्यातील खेळाडूंना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा कार्यक्रम संपन्न होत असलेले  सिग्रा क्रीडा संकुलही अनेकविध आधुनिक सुविधांनी सुसज्ज असल्याचे त्यांनी  नमूद केले.
पंतप्रधानांनी वाराणसी शहर मोठ्या कार्यक्रमांसाठी स्वतःला सज्ज करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून वाराणसीने देशाच्या क्रीडा नकाशावर स्थान मिळवणे ही शहरासाठी महत्त्वाची गोष्ट आहे यावर भर दिला. या अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी, वाराणसीत विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामुळे स्थानिक लोकांना संधी मिळाल्या आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली. यामध्ये जी -20 देशांच्या बैठका, काशी तामिळ संगम आणि काशी तेलगु संगमम् यांसारखे सांस्कृतिक महोत्सव असो, प्रवासी भारतीय संमेलन असो आणि वाराणसीला शांघाय सहकार्य संघटनेची सांस्कृतिक राजधानी म्हणून मिळालेला दर्जा यांचा समावेश आहे. ही स्पर्धा या यशप्राप्तीतील एक मौल्यवान रत्न म्हणून सामील झाली आहे आणि अशा कार्यक्रमांच्या आयोजनामुळे वाराणसी मोठ्या व्यासपीठांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
या काळात वाराणसीमध्ये आल्हाददायक थंड वातावरण अनुभवता येते त्याला चविष्ट हंगामी पदार्थांची जोड असते असे नमूद करून त्यांनी मलाईयोची  चव घेण्याचेही सुचवले.  त्यांनी सहभागींना बाबा विश्वनाथाचे दर्शन घेणे, गंगेत नौकाविहार करणे आणि शहराचा समृद्ध वारसा जाणून घेत या आठवणीही आपल्या सोबत घेऊन जाण्याचा आग्रह केला. आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी खेळाडूंना स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले आणि वाराणसीच्या भूमीतील प्रत्येक स्पाईक , ब्लॉक आणि पॉईंट  देशाच्या क्रीडा आकांक्षा उंचावेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
4 ते 11 जानेवारी दरम्यान आयोजित 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत संपूर्ण देशातून खेळाडू सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये विविध राज्ये आणि संस्थाचे प्रतिनिधित्व करणारे 1000 हून अधिक खेळाडू 58 संघ म्हणून स्पर्धेत खेळतील. ही स्पर्धा भारतीय व्हॉलीबॉलमधील उच्च दर्जाची स्पर्धा, खिलाडूवृत्ती आणि प्रतिभा  प्रदर्शित कले. वाराणसीच्या 72 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन, वाराणसी शहरातल्या क्रीडा पायाभूत सुविधा बळकट कऱणे आणि धावपटूंच्या विकासाला चालना देणे यावर असलेला वाढता भर अधोरेखित करते. महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांच्या आयोजनातील शहराच्या विस्तारित  भूमिकेशी सुसंगत अशी प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रमांचे केंद्र म्हणून असलेली शहराची ओळख वृद्धिंगत करते.

***

सुषमा काणे/उमा रायकर/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2211268) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam