पंतप्रधान कार्यालय
भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 2:59PM by PIB Mumbai
नमो बुद्धाय.
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.
सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, भारताचा वारसा परतला आहे, भारताची ही संपदा परतली आहे. आजपासून भारतीय जनमानस भगवान बुद्धांच्या या पवित्र अवशेषांचे दर्शन घेऊ शकेल, भगवान बुद्धांचे आशीर्वाद घेऊ शकतील. मी या शुभप्रसंगी येथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. या पावन प्रसंगी बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांना वंदन करतो. तुमची उपस्थिती या आयोजनाला एक नवी उंची आणि नवी ऊर्जा देत आहे. 2026 च्या सुरुवातीलाच हा शुभ उत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि माझ्यासाठी हे सौभाग्य आहे की 2026 मधील माझा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम भगवान बुद्धांच्या चरणांपासून सुरू होत आहे. माझी हीच कामना आहे की, भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सद्भावनेचा एक नवीन काळ घेऊन येवो.
मित्रांनो,
ज्या ठिकाणी हे प्रदर्शन भरले आहे, ते स्थान देखील आपोआपच विशेष आहे. किल्ला राय पिथोरा हे स्थान भारताच्या गौरवशाली इतिहासाची 'यशभूमी' आहे. या ऐतिहासिक किल्ल्याच्या सभोवताली, सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, त्या काळातील भूतपूर्व शासकांनी एका भक्कम आणि मजबूत तटबंदीने वेढलेल्या नगराची स्थापना केली होती. आज त्याच ऐतिहासिक नगर परिसरामध्ये, आपण आपल्या इतिहासाची एक आध्यात्मिक आणि पुण्यगाथा जोडत आहोत.
मित्रांनो,
येथे येण्यापूर्वी मी सविस्तरपणे या ऐतिहासिक प्रदर्शनाची पाहणी केली. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष आपल्यामध्ये पाहून आपण सर्वजण धन्य झालो आहोत. हे अवशेष भारताबाहेर जाणे आणि पुन्हा भारतात परतणे, हे दोन्ही टप्पे खरोखरच एक खूप मोठा धडा आहेत. धडा हा आहे की, गुलामगिरी ही केवळ राजकीय आणि आर्थिक नसते, तर गुलामगिरी आपला वारसा देखील उद्ध्वस्त करते. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या बाबतीतही हेच घडले. गुलामगिरीच्या कालखंडात हे अवशेष भारताकडून हिरावून घेतले गेले आणि तेव्हापासून सुमारे सव्वाशे वर्षे ते देशाबाहेरच राहिले. जे लोक हे अवशेष भारतातून घेऊन गेले होते, त्यांच्या वंशजांसाठी या केवळ निर्जीव 'पुरातनवस्तू' होत्या. म्हणूनच त्यांनी या पवित्र अवशेषांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लिलाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतासाठी मात्र, हे पवित्र अवशेष आपल्या आराध्यांचाच एक अंश आहेत, आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच भारताने ठरवले की, आम्ही यांचा सार्वजनिक लिलाव होऊ देणार नाही. आणि आज मी गोदरेज समूहाचेही आभार मानतो, त्यांच्या सहकार्याने भगवान बुद्धांशी संबंधित हे पवित्र अवशेष भगवान बुद्धांची कर्मभूमी, त्यांची चिंतनभूमी, त्यांची महाबोधी भूमी आणि त्यांच्या महापरिनिर्वाण भूमीवर परतले आहेत.
मित्रांनो,
भगवान बुद्धांचे ज्ञान, त्यांनी दाखवलेला मार्ग हा संपूर्ण मानवतेचा आहे आणि तो कालातीत आहे; तो काळाप्रमाणे बदललेला नाही. हा भाव आपण गेल्या काही महिन्यांत वारंवार अनुभवला आहे. गेल्या काही महिन्यांत, भगवान बुद्धांशी संबंधित हे पवित्र अवशेष ज्या ज्या देशात गेले, तिथे आस्था आणि श्रद्धेचा जनसागर उसळला. थायलंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असेच पवित्र अवशेष ठेवण्यात आले होते. एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत, तिथे 40 लाखांहून अधिक भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले. व्हिएतनाममध्ये जनभावना इतकी प्रबळ होती की प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा लागला. तिथल्या नऊ शहरांमध्ये सुमारे पावणे दोन कोटी लोकांनी बुद्ध अवशेषांना नमन केले. मंगोलियातील गंदन मठाच्या बाहेर हजारो लोक तासन् तास प्रतीक्षा करत राहिले. अनेक लोकांना केवळ यासाठी भारतीय प्रतिनिधींना स्पर्श करण्याची इच्छा होती. कारण ते बुद्धांच्या भूमीतून आले होते. रशियाच्या काल्मिकिया प्रदेशात, केवळ एका आठवड्यात दीड लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले. ही संख्या तिथल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येइतकी आहे. विविध देशांमध्ये झालेल्या या आयोजनात, मग ते सामान्य नागरिक असोत किंवा सरकारचे प्रमुख, सर्वजण एकाच श्रद्धेने जोडले गेले. भगवान बुद्ध सर्वांचे आहेत, भगवान बुद्ध सर्वांना जोडतात.
मित्रांनो,
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण भगवान बुद्धांचे माझ्या जीवनात खूप खोलवर स्थान राहिले आहे. माझा जन्म ज्या वडनगरमध्ये झाला, ते बौद्ध शिक्षणाचे एक खूप मोठे केंद्र होते. ज्या भूमीवर भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले, ते सारनाथ आज माझी कर्मभूमी आहे. जेव्हा मी सरकारच्या जबाबदाऱ्यांपासून दूर होतो, तेव्हाही मी एक तीर्थयात्री म्हणून बौद्ध तीर्थस्थळांना भेट देत असे. पंतप्रधान म्हणून तर मला जगभरातील बौद्ध तीर्थस्थळांना भेट देण्याचे भाग्य लाभले आहे. नेपाळमधील लुंबिनी येथे पवित्र मायादेवी मंदिरात नतमस्तक होणे, हा खरोखरच एक अद्भुत अनुभव होता. जपानमधील तो-जी मंदिर आणि किंकाकु-जी मध्ये मला असे जाणवले की, बुद्धांचा संदेश काळाच्या सीमांच्या पलीकडे आहे. मी चीनमधील शीआनच्या 'बिग वाइल्ड गूज पॅगोडा'मध्येही गेलो, जिथून बौद्ध ग्रंथ संपूर्ण आशियात पोहोचले; तिथे भारताची भूमिका आज देखील स्मरणात ठेवली जाते. जेव्हा मी मंगोलियाच्या गंदन मठात गेलो, तेव्हा तिथल्या लोकांच्या डोळ्यांत बुद्धांच्या वारशाबद्दल किती ओढ आहे, हे मी पाहिले. श्रीलंकेच्या अनुराधापुरा येथील जया श्री महाबोधीचे दर्शन घेणे, हे त्या परंपरेशी जोडले जाण्याची भावना होती, ज्याची बीजे सम्राट अशोक, भिक्खू महेंद्र आणि संघमित्रा जी यांनी रोवली होती. थायलंडचे वाट फो आणि सिंगापूरच्या 'बुद्ध टूथ रेलिक' मंदिराच्या भेटीने, भगवान बुद्धांच्या संदेशांच्या प्रभावाविषयी माझे आकलन अधिक सखोल केले.
मित्रांनो,
मी जिथे जिथे गेलो, तिथल्या लोकांशी भगवान बुद्धांच्या वारशाचे एखादे प्रतीक जोडून परतण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. आणि म्हणूनच चीन, जपान, कोरिया, मंगोलिया, मी जिथे कुठे गेलो, तिथे बोधी वृक्षाची रोपे सोबत घेऊन गेलो होतो. आपण कल्पना करू शकता, ज्या हिरोशिमा शहराला अणुबॉम्बने उद्ध्वस्त केले होते, त्या हिरोशिमा शहराच्या 'बोटॅनिकल गार्डन'मध्ये बोधी वृक्ष असणे, मानवतेसाठी किती मोठा संदेश ठरला आहे.
मित्रहो,
भगवान बुद्ध यांचा हा आपला सामायिक वारसा याचाही दाखला आहे की भारत केवळ राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थव्यवस्थेद्वारे जोडलेला नाही, तर आपले नाते अधिक खोलवर रुजलेले आहेत. आपण मन आणि भावनांनी जोडलेले आहोत, आपण श्रद्धा आणि अध्यात्माने देखील जोडलेलो आहोत.
मित्रहो,
भारत केवळ भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचा रक्षकच नाही तर त्यांच्या परंपरेचा जिवंत वाहक देखील आहे. पिप्रहवा, वैशाली, देवनी मोरी आणि नागार्जुनकोंडा इथे सापडलेले भगवान बुद्धांशी संबंधित अवशेष हे बुद्धांच्या संदेशाची जिवंत ओळख आहेत. भारताने या अवशेषांचे विज्ञान आणि अध्यात्म अशा दोन्ही अंगाने, प्रत्येक स्वरूपात जतन आणि संरक्षण केले आहे.
मित्रहो,
जगातील बौद्ध वारशाशी संबंधित जी काही ठिकाणे आहेत, त्यांच्या विकासासाठी आपण शक्य तितके योगदान द्यावे असा भारताचा सतत प्रयत्न राहिला आहे. जेव्हा नेपाळमधील विनाशकारी भूकंपात प्राचीन स्तूपांचे नुकसान झाले, तेव्हा भारताने त्यांच्या पुनर्बांधणीसाठी मदत केली. म्यानमारमधील बागान इथे झालेल्या भूकंपानंतर भारताने 11 हून अधिक पॅगोडांच्या संरक्षणाचे काम हाती घेतले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. भारतातही बौद्ध परंपरेशी संबंधित स्थळे तसेच अवशेषांचा शोध आणि त्यांच्या संवर्धनाचे काम सातत्याने सुरू आहे. जसे मी तुम्हाला याआधी सांगितले, माझे जन्मस्थान, गुजरातचे वडनगर हे बौद्ध परंपरेचे मोठे केंद्र होते. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा तिथे बौद्ध परंपरेशी संबंधित हजारो अवशेष सापडले होते. आज आमचे सरकार या अवशेषांचे संवर्धन करण्यावर देखील भर देत आहे आणि आजच्या पिढीला त्यांच्यासोबत जोडत देखील आहे. तिथे एक भव्य अनुभव देणारे संग्रहालय देखील उभारले असून, या संग्रहालयातील मांडणीतून सुमारे 2500 वर्षांचा इतिहास समजून घेता येतो. अलिकडेच काही महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला इथे बौद्ध काळातील एका मोठ्या बौद्ध स्थळाचा शोध लागला आहे. या स्थळाच्या संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे.
मित्रहो,
गेल्या दहा-अकरा वर्षांमध्ये भारताने बौद्ध स्थळांना आधुनिकतेशी जोडण्याचा देखील प्रयत्न केला आहे. बोधगया येथे कन्व्हेन्शन सेंटर तसेच मेडिटेशन अँड एक्सपिरियन्स सेंटर उभारण्यात आले आहे. सारनाथमधील धमेख स्तूप येथे लाइट अँड साउंड शो तसेच बुद्ध थीम पार्क उभारण्यात आले आहे. श्रावस्ती, कपिलवस्तू आणि कुशीनगरमध्येही आधुनिक सोयीसुविधा विकसित केल्या आहेत. तेलंगणातील नलगोंडा येथे डिजिटल एक्सपिरियन्स सेंटर उभारले आहे. सांची, नागार्जुन सागर आणि अमरावती या ठिकाणीही भाविकांसाठी नवीन सुविधा विकसित केल्या आहेत. आज देशात एक बौद्ध सर्किट तयार केले जात आहे, जेणेकरून भारतातील सर्व बौद्ध तीर्थक्षेत्रांची उत्तम संपर्क जोडणी उपलब्ध होईल आणि जगभरातील भाविक आणि यात्रेकरुंना श्रद्धा आणि अध्यात्माचा एक समृद्ध अनुभव मिळू शकेल.
मित्रहो,
बौद्ध वारसा सहजरीत्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हा भारताचा प्रयत्न आहे. जागतिक बौद्ध शिखर परिषद, वैशाख आणि आषाढ पौर्णिमा यांसारखे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम याच विचारातून प्रेरित आहेत. तुम्हाला माहितच आहे, भगवान बुद्धांचे अभिधम्म, त्यांची वाणी आणि उपदेश मूळतः पाली भाषेत आहेत. पाली भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हणूनच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे धम्म त्याच्या मूळ स्वरूपात समजून घेणे आणि समजावणे अधिक सुलभ होईल. यामुळे बौद्ध परंपरेशी संबंधित संशोधनालाही बळ मिळेल.
मित्रहो,
भगवान बुद्धांच्या जीवन विषयक तत्वज्ञानाने जगाला सीमा आणि भौगोलिक क्षेत्रे ओलांडून एक नवीन मार्ग दाखवला आहे. भवतु सब्ब मंगलम, रक्खन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन"सदा सुत्ति भवन्तु ते। यात संपूर्ण जगाच्या कल्याणाचीच तर कामना आहे. भगवान बुद्धांनी संपूर्ण मानवजातीला अतिरेकीपणापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना आपल्या अनुयायांना सांगितले - "अत्त दीपो भव भिक्खवे! परीक्ष्य भिक्षवो ग्राह्यम्, मद्वचो न तु गौरवात्।" अर्थात भिक्षूंहो, स्वतः आपले दीपक बना. माझ्या शब्दांची देखील परीक्षा घेऊन मगच त्यांचा स्वीकार करा, केवळ माझ्याप्रति आदर म्हणून करू नका.
मित्रहो,
बुद्धांचा हा संदेश प्रत्येक युगासाठी आणि प्रत्येक कालखंडासाठी प्रासंगिक आहे. आपण आपला प्रकाश स्वतः बना. ही भावना स्वाभिमानाचा आधार आहे, ही भावना तर आत्मनिर्भरतेचे मूळ आहे. "अत्त दीपो भव."
मित्रहो,
भगवान बुद्धांनी जगाला संघर्ष आणि प्रभुत्व ऐवजी एकत्र चालण्याचा मार्ग दाखवला. आणि हेच भारताचे मूळ तत्वज्ञान राहिले आहे. आपण आपल्या विचारांच्या बळावर आणि आपल्या भावनांच्या आधारावर, मानवतेच्या हितासाठी विश्वकल्याणाचा मार्ग स्वीकारला आहे. याच विचाराने, भारत 21व्या शतकातील जगात योगदान देत आहे. म्हणूनच, आज जेव्हा आपण म्हणतो की हा युद्धाचा काळ नाही तर बुद्धाचा काळ आहे, तेव्हा भारताची भूमिका अगदी स्पष्ट आहे; जे मानवतेचे शत्रू आहेत, त्यांच्याविरुद्ध शक्ती आवश्यक आहे. मात्र, जिथे केवळ वाद आहे तिथे संवाद आणि शांतीचा मार्ग आवश्यक आहे.
मित्रहो,
भारत सर्वांच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या आनंदासाठी वचनबद्ध आहे. हेच भगवान बुद्धांनी आपल्याला शिकवले आहे. मला आशा आहे की या प्रदर्शनाच्या माध्यमातून येथे भेट देणारा प्रत्येक अभ्यागत याच प्रेरणेने जोडला जाईल.
मित्रहो,
भगवान बुद्धांशी संबंधित हे पवित्र अवशेष भारताचा वारसा आहेत, शतकाच्या प्रतीक्षेनंतर हा वारसा पुन्हा देशात परतला आहे, म्हणूनच मी देशातील नागरिकांना आवाहन करतो की हे पवित्र अवशेष पाहण्यासाठी, भगवान बुद्धांच्या विचारांशी जोडले जाण्यासाठी एकदा या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. आपले जे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, युवा मित्र आहेत, मुले-मुली आहेत, त्यांनी हे प्रदर्शन नक्की पाहावे. भूतकाळातील गौरव आणि भविष्यातील आकांक्षा यांना जोडणारे हे प्रदर्शन एक खूप मोठे माध्यम आहे. मी देशभरातील लोकांना या प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करतो. याच विनंतीसह, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या आयोजनासाठी माझ्याकडून अनेकानेक शुभेच्छा . खूप खूप धन्यवाद!
नमो बुद्धाय!
***
नितीन फुल्लुके / शैलेश पाटील / सुषमा काणे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211216)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam