रेल्वे मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर वंदे भारत स्लीपर रेल्वेची पाहणी
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 8:02PM by PIB Mumbai
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देऊन भारताच्या पहिल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेची पाहणी केली.

पाहणीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी या रेल्वेच्या डब्यांची सखोल तपासणी केली. यामध्ये आसन व शयन व्यवस्था, आधुनिक अंतर्गत रचना, सुरक्षितता वैशिष्ट्ये तसेच प्रवासी सुविधा प्रणाली यांचा समावेश होता. प्रवासी सुरक्षितता आणि रेल्वेतील सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

यामध्ये स्वयंचलित दरवाजे, कवच सुरक्षा प्रणाली, सुधारित अग्निसुरक्षा यंत्रणा, निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान तसेच सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही देखरेख अशा सुविधा उपलब्ध आहेत. प्रवासी आराम आणि स्वच्छतेवर भारतीय रेल्वेचा असलेला भर अधोरेखित करत, विशेषतः स्वच्छतागृहांमध्ये नाविन्यपूर्ण रचना करण्यात आली असून स्वच्छता सुधारण्यासाठी आणि पाण्याचे शिंतोडे टाळण्यावर भर देण्यात आला आहे.
पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे आसाममधील गुवाहाटी आणि पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान धावणार असून, देशातील दीर्घ अंतराच्या रात्रकालीन रेल्वे प्रवासात हा एक परिवर्तनकारी टप्पा ठरणार आहे. या रेल्वेच्या चाचण्या, परीक्षणे आणि प्रमाणनाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या मार्गावर पहिल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधून रेल्वेच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि वंदे भारत स्लीपर रेल्वे पूर्णपणे तयार असल्याचे नमूद केले. 16 डब्यांच्या या रचनेत 11 एसी तीन-स्तरीय डबे, 4 वातानुकुलित दोन-स्तरीय डबे आणि 1 वातानुकुलित प्रथम श्रेणी डबा असून, सुमारे 823 प्रवाशांची आसन क्षमता आहे. प्रगत धक्काशोषक प्रणाली, आरामदायी अंतर्गत रचना आणि उच्च स्वच्छता मानकांमुळे ही रेल्वे उत्कृष्ट प्रवास अनुभव देण्यासाठी अभियांत्रिकी पद्धतीने विकसित करण्यात आली आहे.


या वंदे भारत रेल्वेमधील प्रवाशांना प्रवासादरम्यान प्रादेशिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. गुवाहाटीहून निघणाऱ्या रेल्वेमध्ये अस्सल आसामी खाद्यपदार्थ असतील, तर कोलकाताहून सुरू होणाऱ्या ट्रेनमध्ये पारंपरिक बंगाली पदार्थ दिले जातील, ज्यामुळे प्रवाशांना सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि आनंददायी भोजनाचा अनुभव मिळेल.
प्रती तास 180 किमी पर्यंत वेग असलेली ही अर्ध-उच्चगती रेल्वे आधुनिक सुविधा आणि जलद प्रवास वेळ यांचे संयोजन सादर करते. यामधून प्रवासी-केंद्रित सेवा आणि तांत्रिक नवकल्पनांवर भारतीय रेल्वेचा असलेला भर प्रतिबिंबित होतो.
***
नितीन फुल्लुके/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211214)
आगंतुक पटल : 27