सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाचे 3 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन – ‘द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 3:51PM by PIB Mumbai

 

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात पिप्रहवा अवशेष आणि मौल्यवान रत्न-अवशेष यांचे ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे अवशेष अलीकडेच भारतात परत आणण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी 127 वर्षांनंतर भारतात परत आणण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पिप्रहवा येथील रत्न-अवशेषांचे, पिप्रहवा स्थळावरील 1898 तसेच 1971 ते 1975 या कालावधीत झालेल्या उत्खननांत प्राप्त झालेल्या अवशेष, रत्न-अवशेष आणि अवशेष-पेटिकांसोबत पुन्हा एकत्रीकरण होत आहे.

द लाइट अँड द लोटस : रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन' या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, सांकृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील विविध सांस्कृतिक संस्थांकडील संबंधित पुरातन अवशेष व कलाकृती विषयानुरूप पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत. या अवशेषांमध्ये भगवान बुद्धांशी संबंधित आतापर्यंतचे सर्वात व्यापक संकलन असून, ते खोल तत्त्वज्ञानात्मक अर्थ, उत्कृष्ट कारागिरी आणि जागतिक आध्यात्मिक महत्त्वाचे प्रतीक आहेत. या प्रदर्शनात इ.स.पू. 6 व्या शतकापासून आजपर्यंतच्या कालखंडातील शिल्पकला, हस्तलिखित, थांग्का चित्रे तसेच विधीपर वस्तूंसह 80 हून अधिक वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

हा भव्य कार्यक्रम जुलै 2025 मध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालयाने अवशेषांचे यशस्वी पुनर्प्राप्तीकरण केल्याच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे. या प्रयत्नांमुळे हाँगकाँग येथील सोथबीज संस्थेमध्ये प्रस्तावित असलेली लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली. 1898 मधील उत्खननानंतर प्रथमच, या प्रदर्शनात पुढील घटक एकत्रितपणे सादर करण्यात येत आहेत.

• 1898 मध्ये कपिलवस्तू येथे झालेल्या उत्खननातून प्राप्त झालेले अवशेष

• 1972 मध्ये करण्यात आलेल्या उत्खननांमधून मिळालेले मौल्यवान पुरातन अवशेष

• भारतीय संग्रहालय, कोलकाता येथील अवशेष-पेटिका आणि रत्नजडित मौल्यवान वस्तू

• अलीकडेच पेप्पे कुटुंबाच्या संग्रहातून भारतात परत आणलेले अवशेष

• ज्यामध्ये मूळतः रत्न-अवशेष व अवशेष-पेटिका सापडल्या होत्या ती अखंड दगडी संदूक

1898 मध्ये विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी कपिलवस्तू येथील प्राचीन स्तूपात भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष शोधून काढले. या शोधानंतर या अवशेषांचे काही भाग जगभर वितरित करण्यात आले; त्यापैकी एक भाग सायामच्या (थायलंड) राजाला अर्पण करण्यात आला, दुसरा भाग इंग्लंडला नेण्यात आला, तर तिसरा भाग कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात जतन करण्यात आला. 2025 मध्ये पेप्पे कुटुंबाकडे असलेला अवशेषांचा भाग संस्कृती मंत्रालयाच्या निर्णायक हस्तक्षेपामुळे आणि जगभरातील बौद्ध समुदायांच्या पाठबळाने भारतात परत आणण्यात आला.

हे प्रदर्शन बौद्ध धर्माची जन्मभूमी म्हणून भारताची भूमिका अधोरेखित करते तसेच जागतिक आध्यात्मिक व सांस्कृतिक नेतृत्व करण्याऱ्या भारताचे स्थान अधिक बळकट करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक पातळीवरील सहभाग नीती अधिकाधिक आपल्या सभ्यतेच्या व आध्यात्मिक वारशावर आधारित होत आहे. या कालावधीत 642 पुरातन अवशेष भारतात परत आणण्यात आले असून, त्यामध्ये पिप्रहवा अवशेषांचे पुनर्प्राप्तीकरण ही एक ऐतिहासिक आणि मैलाचा दगड ठरणारी उपलब्धी आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, विविध देशांचे राजदूत व राजनैतिक प्रतिनिधी, बौद्ध भिक्षू, वरिष्ठ शासकीय अधिकारी, अभ्यासक, वारसा तज्ज्ञ, कला क्षेत्रातील मान्यवर, कला रसिक, बौद्ध धर्माचे अनुयायी आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

हे प्रदर्शन वारसा-संरक्षण आणि सांस्कृतिक नेतृत्वाबाबत सांस्कृतिक मंत्रालयाची कटिबद्धता अधोरेखित करते. तसेच, भगवान बुद्ध धम्माची जन्मभूमी म्हणून भारताचे महत्त्व आणि देशाचा आध्यात्मिक वारसा यांचा गौरव करत, भारताच्या सभ्यतागत वारशाचे जतन व जागतिक पातळीवर प्रसार करण्याबाबतची दीर्घकालीन बांधिलकी प्रतिबिंबित करते.

***

नितीन फुल्लुके/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2210954) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Kannada