जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते पेयजल सेवांचे मूल्यांकन करण्यासाठी 'जल सेवा आकलन' उपक्रमाचा प्रारंभ
Posted On:
30 DEC 2025 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
जल जीवन मिशन अंतर्गत सेवा वितरण आणि सामुदायिक मालकी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने आज जल जीवन मिशन (जेजेएम) पोर्टलवर ग्रामपंचायत-नेतृत्वातील 'जल सेवा आकलन' या डिजिटल पेयजल सेवा कार्यक्षमता मूल्यांकन साधनाचा ई-प्रारंभ केला.

मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींनी 'हर घर जल' दर्जा प्राप्त केल्यामुळे, जल जीवन मिशन एका नवीन टप्प्यात पोहोचले आहे. या टप्प्यात नळ जोडण्यांचे रूपांतर दररोज विश्वसनीय आणि सुरक्षित पेयजल सेवांमध्ये होईल याची खात्री करण्यावर भर दिला जात आहे. 'जल सेवा आकलन' हे समुदाय-मालकीचे स्व-मूल्यांकन या संकल्पनेवर आधारित आहे. यामुळे गावांना खर्चिक आणि क्वचित होणाऱ्या तृतीय-पक्ष सर्वेक्षणांवर अवलंबून न राहता, स्वतःच्या पाणी सेवा वितरण प्रणालीचे सामूहिकपणे मुल्यांकन करता येणार आहे.
या साधनाचा औपचारिक ई-प्रारंभ केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

जल जीवन मिशन केवळ मालमत्ता निर्माण करण्यापुरते मर्यादित नाही, तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय पेयजल सेवा प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, यावर उपस्थितांना संबोधित करताना मंत्र्यांनी जोर दिला. त्यांनी मिशनच्या चार मुख्य स्तंभांची रूपरेषा मांडली — राजकीय इच्छाशक्ती, लोकांचा सहभाग, भागधारकांचे सहकार्य आणि संसाधनांचा योग्य वापर. 'जन भागीदारी' हा 'हर घर जल' च्या यशाची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे यावर त्यांनी जोर दिला.
ग्रामीण पेयजल प्रणालीच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी सामुदायिक सहभाग आणि पारदर्शकता आवश्यक आहे आणि हे नवीन साधन सेवा वितरणातील त्रुटी लवकर ओळखण्यास तसेच वेळेत दुरुस्तीसाठी कारवाई करण्यास मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले. 'हर घर जल' च्या यशाची शाश्वतता टिकवून ठेवण्यात आणि गावांच्या परिवर्तनाला चालना देण्यात 'जन भागीदारी'च्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

ग्रामपंचायतींशी संवाद
या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सी. आर. पाटील यांनी घोनशी ग्रामपंचायत (कराड तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र), गोगथला ग्रामपंचायत (राजस्थान) आणि बिलहापूर ग्रामपंचायत (उत्तर प्रदेश) येथील ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्यातील संवाद. या ग्राम प्रतिनिधींनी ग्रामीण पाणीपुरवठा प्रणालीचे व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याची नियमितता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे, नियमित चाचणी, वापरकर्ता शुल्काची वसुली आणि 'हर घर जल' योजनेचे यश कायम राखणे याबद्दलचे आपले अनुभव सांगितले.

जल सेवा मूल्यांकन महत्त्वाचे का आहे
बहुसंख्य ग्रामपंचायतींनी 'हर घर जल' दर्जा प्राप्त केल्यामुळे, आता नियमित, पुरेसा, सुरक्षित आणि शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जल सेवा मूल्यांकन हे क्वचित होणाऱ्या बाह्य सर्वेक्षणांवरील अवलंबित्व कमी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजलेली सातत्यपूर्ण मूल्यांकन यंत्रणा निर्माण करते.

या मूल्यांकनामध्ये खालील प्रमुख सेवा मापदंडांचा समावेश आहे:
- पाणीपुरवठ्याची नियमितता आणि पर्याप्तता
- पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता
- प्रणालींचे संचालन आणि देखभाल
- स्रोताची शाश्वतता
सर्व 'हर घर जल' ग्रामपंचायतींनी 26 जानेवारी 2026 पर्यंत जल सेवा आकलन पूर्ण करणे अपेक्षित आहे.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2209888)
अभ्यागत कक्ष : 71