संरक्षण मंत्रालय
एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर 2026 चा सर्व धर्म पूजेने प्रारंभ
सहभागींमध्ये 898 मुलींसह एकूण 2,406 छात्र
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन 2026 शिबिराचा (आरडीसी) प्रारंभ आज- 30 डिसेंबर, 2025 दिल्ली छावणीमधील करिअप्पा संचलन मैदानावर 'सर्व धर्म पूजे'ने झाला. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात सर्वोत्कृष्ट छात्र स्पर्धा, लहान शस्त्रास्त्रांनी गोळीबार, कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन संचलनादरम्यान पथसंचलन पथक आणि ध्वज क्षेत्र संरचना यांसारख्या अनेक आंतर-संचालनालय स्पर्धा आणि कार्यक्रमांचा समावेश आहे.
यावर्षी 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून निवडण्यात आलेल्या 898 मुलींसह एकूण 2,406 छात्र सहभागी होत आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. याशिवाय 25 मित्र देशांचे (एफएफसी) छात्र आणि अधिकारी देखील यावर्षी युवा देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत (वायईपी) या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी बोलताना, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी सर्व छात्रांचे स्वागत केले आणि प्रजासत्ताक दिन शिबिरासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी छात्रांना 'राष्ट्र प्रथम' या भावनेने धर्म, भाषा आणि जातीचे अडथळे पार करून चरित्र्य, सचोटी, निःस्वार्थ सेवा, सौहार्द आणि सांघिक कार्याचे सर्वोच्च गुण प्रदर्शित करण्याचे आवाहन केले.
'एकता आणि शिस्त' हे ब्रीदवाक्य कायम ठेवत, प्रजासत्ताक दिन शिबीर देशभरातील एनसीसी छात्रांना एकत्र आणणारे असते. या शिबिरामुळे त्यांना प्रशिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच छात्रांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वाची भावना खोलवर रुजवली जाते.

* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209867)
आगंतुक पटल : 12