पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 25 DEC 2025 6:05PM by PIB Mumbai

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,

आज लखनौची ही भूमी नव्या प्रेरणेची साक्षीदार ठरत आहे. याविषयी विस्ताराने बोलण्यापूर्वी मी देश-विदेशातल्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा देतो. भारतातही कोट्यवधी ख्रिश्चन कुटुंबे आज उत्सव साजरा करत आहेत, नाताळचा हा उत्सव सर्वांच्या जीवनात आनंद आणणारा ठरो ही आमची सर्वांचीच कामना आहे.

मित्रहो,

25 डिसेंबरचा हा दिवस देशाच्या दोन थोर व्यक्तींच्या जयंतीचा विलक्षण योग घेऊन येतो. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी, भारतरत्न महामना मदन मोहन मालवीय जी, या दोन थोर पुरुषांनी भारताची अस्मिता, एकता आणि सन्मान यांचे रक्षण केले आणि राष्ट्राच्या जडणघडणीवर आपला अमिट ठसा उमटविला.

मित्रहो,     

25 डिसेंबर या दिवशीच महाराजा बिजली पासी यांचीही जयंती आहे. लखनौचा प्रसिद्ध बिजली पासी किला इथून जवळच आहे. महाराजा बिजली पासी यांचा शौर्य, सुशासन आणि समावेशकतेचा वारसा पासी समाजाने अभिमानाने चालविला आहे. वर्ष 2000 मध्ये अटल जी यांनीच  महाराज  बिजली पासी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले होते, हाही एक योगायोगच ! आजच्या या पवित्र दिनी मी महामना मालवीय जी, अटल जी आणि  महाराजा बिजली पासी यांना आदराने नमन करतो, त्यांना वंदन करतो.

मित्रहो,

थोड्या वेळापूर्वीच मला इथे राष्ट्र  प्रेरणा स्थळाचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. हे राष्ट्र प्रेरणा स्थळ, या विचारांचे प्रतिक आहे ज्यांनी भारताला आत्मसन्मान, एकता आणि सेवेचा मार्ग दाखवला. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीन दयाल उपाध्याय जी आणि  अटल बिहारी वाजपेयी जी, यांच्या पुतळ्यांच्या उंचीपेक्षा त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा त्यापेक्षाही उत्तुंग आहे. अटल जी यांनी लिहिले होते, नीरवता से मुखरित मधुबन, परहित अर्पित अपना तन-मन, जीवन को शत-शत आहुति में, जलना होगा, गलना होगा। क़दम मिलाकर चलना होगा। हे राष्ट्र प्रेरणा स्थळ आपल्याला संदेश देते की आपले प्रत्येक पाऊल, प्रत्येक प्रयत्न राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित असावा. ‘सबका प्रयास’ च विकसित भारत हा संकल्प साकार करेल. लखनौचे ,उत्तर प्रदेशचे मी या आधुनिक प्रेरणा स्थळासाठी अभिनंदन करतो. आत्ता जे सांगण्यात आले आणि व्हिडिओमध्येही दाखविण्यात आले की, ज्या भूमीवर हे प्रेरणा स्थळ  साकारले आहे त्यातल्या 30 एकरपेक्षा जास्त जागेवर अनेक दशके कचऱ्याचे डोंगर साठले होते. गेल्या तीन वर्षात ते  पूर्णपणे साफ करण्यात आले. या प्रकल्पाशी संबंधित कामगार, कारागीर, योजनाकार, योगी जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी देशाला दिशा देण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. भारतात दोन संविधान,दोन निशाण आणि दोन पंतप्रधान ही तरतूद डॉक्टर मुखर्जी यांनीच फेटाळून लावली होती.स्वातंत्र्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये ही व्यवस्था भारताच्या अखंडतेला मोठे आव्हान होते. आमच्या सरकारला कलम 370 ची ही भिंत पाडण्याची संधी मिळाली याचा भाजपला अभिमान आहे.आज जम्मू काश्मीरमध्ये भारताचे संविधान पूर्णपणे लागू आहे.

मित्रहो,

स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री या नात्याने डॉक्टर मुखर्जी यांनी भारतात आर्थिक आत्मनिर्भरतेचा  पाया घातला होता.त्यांनी देशाला पहिले औद्योगिक धोरण दिले. म्हणजेच भारतात औद्योगिकीकरणाचा पाया उभारला.आज आत्मनिर्भरतेचा हा मंत्र आम्ही अधिक बळकट करत आहोत.  मेड इन इंडिया साहित्य आज जगभरात पोहोचत आहे.उत्तर प्रदेशातच पहा ना,एकीकडे एक जिल्हा एक उत्पादन हे मोठे अभियान सुरु आहे,छोटे-छोटे उद्योग,छोटी आस्थापने यांन बळ देत आहेत.तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात मोठा संरक्षण कॉरिडॉर उभारण्यात येत आहे.ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने ज्या  ब्रह्मोस  क्षेपणास्त्राची कामगिरी पाहिली ते आता लखनौमध्ये तयार होत आहे.उत्तर प्रदेशाचा संरक्षण कॉरिडॉर संरक्षण उत्पादनासाठी जगभरात ओळखला जाईल तो दिवस आता दूर नाही.

मित्रहो,

दशकांपूर्वी पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांनी  अंत्योदय हे स्वप्न पाहिले होते. समाजातल्या तळाच्या'अंतिम व्यक्ति' च्या चेहऱ्यावरचे हास्य याद्वारे भारताच्या प्रगतीचे मोजमाप होईल असे ते मानत.    

 शरीर,मन,बुद्धी आणि आत्मा यांचा सर्वांगीण  विकास साधणारे  'एकात्म मानववाद' हे तत्वज्ञान दीनदयाल जी यांनी  दिले.

दीन दयाल जी यांचे स्वप्न हा  मोदीनी आपला  संकल्प केला आहे. आम्ही अंत्योदयाचा  संपृक्ती म्हणजे संतुष्टतेचा नवा विस्तार केला आहे. संपृक्ती म्हणजे प्रत्येक गरजू,प्रत्येक लाभार्थ्याला सरकारच्या कल्याणकारी योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न.

जेव्हा संपृक्ततेची जाणीव जागृत असते तेव्हा भेदभाव होत नाही, आणि हेच तर सुशासन आहे, हाच खरा सामाजिक न्याय आहे, हीच अस्सल धर्मनिरपेक्षता आहे. आज जेव्हा देशातील कोट्यवधी नागरिकांना कोणत्याही भेदभावाविना प्रथमच पक्के घर, शौचालय, नळाने पाणीपुरवठा, वीज आणि गॅसची जोडणी मिळत आहे, कोट्यवधी लोकांना पहिल्यांदाच मोफत अन्नधान्य आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत, रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवण्याचे प्रयत्न होत आहेत, तेव्हा पंडित दीनदयाळजींच्या संकल्पनेला न्याय मिळत आहे.

मित्रांनो,

गेल्या दशकात कोट्यवधी भारतीयांनी गरीबीवर मात केली आहे, दारिद्र्यावर विजय मिळवला आहे. प्रवाहात जे मागे राहून गेले आहेत त्यांना भाजपाने प्राधान्य दिले, जी व्यक्ती शेवटच्या रांगेत होती तिला प्राधान्य दिले त्यामुळेच हे शक्य होऊ शकले.

मित्रांनो,

वर्ष 2014 पूर्वी सुमारे 25 कोटी देशवासीय असे होते ज्यांना सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ मिळत होते, किती तर केवळ 25 कोटी. आज सुमारे 95 कोटी भारतवासीयांना या योजनांचा लाभ मिळू लागला आहे. मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. त्या काळात जशी केवळ ठराविक लोकांचीच बँकेत खाती असत त्याचप्रमाणे विम्याचे कवच देखील केवळ मोजक्याच श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित राहिले होते. आमच्या सरकारने समाजातील प्रत्येक व्यक्तीला विम्याचे संरक्षण देण्याचा विडा उचलला. यासाठी पंतप्रधान जीवनज्योती योजना तयार केली, या योजनेतून अत्यंत किरकोळ रकमेच्या प्रिमियमसह दोन लाख रुपयांच्या विम्याची सुनिश्चिती झाली. आज देशातील 25 कोटीहून अधिक गरीब व्यक्ती या योजनेशी जोडल्या गेल्या आहेत. त्याच प्रकारे अपघात विम्याच्या सुविधेसाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेशी देखील सुमारे 55 कोटी गरीब लोक जोडले गेले आहेत. हे असे गरीब देशवासीय आहेत जे पूर्वी विम्याचा विचार देखील करू शकत नव्हते.

मित्रांनो,

या योजनांतून जवळजवळ 25 हजार कोटी रुपयांचे दावे देण्यात आले आहेत, देशातील या छोट्या छोट्या कुटुंबांतील, लहानसहान कामांतून जीवन जगणाऱ्या माझ्या सामान्य कुटुंबांना 25 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे हे समजल्यावर तुम्ही चकित व्हाल. म्हणजेच संकटाच्या वेळी हा पैसा गरीब कुटुंबांच्या उपयोगी पडला आहे.

मित्रांनो,

आज अटलजींच्या जयंतीचा हा दिवस सुशासनाच्या उत्सवाचा देखील दिवस आहे. बऱ्याच काळापर्यंत, देशात, गरिबी हटाव सारख्या घोषणांनाच प्रशासन समजण्यात येत होते. मात्र, अटलजींनी खऱ्या अर्थाने सुशासन प्रत्यक्षात साकार केले. आज डिजिटल ओळख या बाबीची इतकी चर्चा सुरु असते, त्याचा पाया घालण्याचे काम अटलजींच्या सरकारनेच केले होते. त्या काळात ज्या विशेष कार्डसंदर्भात कार्य सुरु झाले होते, तेच आज आधार च्या रुपात, जगभरात प्रसिद्ध झाले आहे. भारतात दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीला वेग देण्याचे श्रेय देखील अटलजींना द्यायला हवे. त्यांच्या सरकारने जे दूरसंचार धोरण तयार केले, त्यामुळे घराघरापर्यंत टेलिफोन तसेच इंटरनेट पोहोचवणे सोपे झाले आणि आज भारत, जगातील सर्वाधिक मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्ते असलेल्या देशांमध्ये समाविष्ट झाला आहे.

मित्रांनो,

आज अटलजी जिथे कुठे असतील तिथे, गेल्या 11 वर्षांमध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल निर्माता देश झाला आहे हे पाहून प्रसन्न झाले असतील. ज्या उत्तर प्रदेश राज्यातून ते खासदार म्हणून निवडून आले तेच राज्य आज भारतातील पहिल्या क्रमांकाचे मोबाईल उत्पादक राज्य बनले आहे.

मित्रांनो,

संपर्क जोडणीच्या बाबतीत अटलजींच्या दूरदृष्टीने 21 व्या शतकातील भारताला प्रारंभीची ताकद दिली. अटलजींच्या सरकारच्या काळातच, गावा-गावांपर्यंत रस्ते बांधण्याची मोहीम सुरु करण्यात आली होती. त्याच काळात सुवर्ण चतुष्कोन म्हणजेच राष्ट्रीय महामार्गांच्या विस्ताराचे काम सुरु झाले.

मित्रांनो,

वर्ष 2000 नंतर पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेंतर्गत गावांमध्ये आतापर्यंत 8 लाख किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे 4 लाख किमीचे ग्रामीण रस्ते गेल्या 10-11 वर्षांत बांधण्यात आले आहेत.

आणि मित्रांनो,

आज तुम्ही पहा, आज आपल्या देशात अभूतपूर्व वेगासह द्रुतगती महामार्ग उभारण्याचे काम किती वेगाने सुरु आहे. आपला उत्तर प्रदेश देखील द्रुतगती महामार्ग राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत आहे. दिल्लीत मेट्रोची सुरुवात देखील अटलजींनीच केली. आज देशातील 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये उभारलेले मेट्रो सेवेचे जाळे लाखो लोकांचे जीवन सुलभ करत आहे. भाजपा-एनडीए सरकारने उत्तम प्रशासनाचा जो वारसा निर्माण केला आहे त्याला भाजपाची केंद्र आणि राज्यातील सरकारे नवा आयाम, नवा विस्तार देत आहेत.

मित्रांनो,

डॉक्टर मुखर्जी, पंडित दीन दयाळजी आणि अटलजी या तीन महापुरुषांची प्रेरणा, त्यांचे द्रष्टे कार्य, त्यांची उत्तुंग व्यक्तित्वे ही विकसित भारताचा फार मोठा आधार आहेत. आज यांच्या प्रतिमा आपल्यात नवी उर्जा निर्माण करत आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर, भारतात झालेल्या प्रत्येक उत्तम कार्याला कशा प्रकारे एकच कुटुंबाशी जोडण्याची प्रवृत्ती फोफावत गेली हे आपण विसरता कामा नये. पुस्तके असोत, सरकारी योजना असोत, सरकारच्या विविध संस्था असोत, गल्ल्या, रस्ते, चौक असोत, सगळीकडे एकाच कुटुंबाचा उदोउदो, एकाच कुटुंबाची नवे, त्यांच्याच मूर्त्या, हेच सुरु होते. भाजपाने एका कुटुंबाच्या अधीन झालेल्या देशाला या जुन्या पद्धतीतून मुक्त केले आहे. आमचे सरकार भारतमातेची सेवा करणाऱ्या प्रत्येक अमर अपत्याच्या, प्रत्येकाच्या योगदानाचा गौरव करत आहे.

मी तुम्हाला काही उदाहरणे देतो,  आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीतील कर्तव्य पथावर आहे. अंदमानमध्ये ज्या बेटावर नेताजींनी तिरंगा फडकावला होता , आज त्याला नेताजींचे नाव देण्यात आले आहे . 

मित्रहो,

 बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा मिटवण्याचा कसा प्रयत्न केला गेला हे कुणीही विसरू शकत नाही , दिल्लीत काँग्रेसच्या शाही कुटुंबाने हे पाप केले. आणि इथे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने देखील हेच दुःसाहस केले, मात्र भाजपाने बाबासाहेबांचा वारसा पुसला जाणार नाही याची काळजी घेतली. आज दिल्ली पासून लंडन पर्यंत  बाबासाहेब आंबेडकरांचे पंचतीर्थ त्यांच्या वारशाचा जयघोष करत आहेत. 

मित्रहो,

सरदार वल्लभभाई पटेल यांनी शेकडो संस्थानांमध्ये विभाजन झालेल्या आपल्या देशाला  एकसंध राष्ट्रात बांधले; मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कार्याचे आणि योगदानाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले. भाजपानेच सरदार पटेल यांना यथोचित मान-सम्मान दिला . भाजपानेच  सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारून एकता नगरला प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले. आता दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी तिथे  राष्ट्रीय एकता दिनाचा मुख्य सोहळा आयोजित केला जातो.

 मित्रहो,

आपल्याकडे अनेक दशकांपर्यंत आदिवासी समाजाच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमच्या सरकारनेच भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक उभारले, आता काही आठवड्यांपूर्वीच छत्तीसगडमध्ये शहीद वीर नारायण सिंह आदिवासी संग्रहालयाचे लोकार्पण झाले आहे.

मित्रहो,

देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत, इथेच उत्तर प्रदेशमध्ये पाहिले तर, महाराजा सुहेलदेव यांचे स्मारक आमच्या सरकारच्या काळातच उभारण्यात आले.  इथे निषादराज आणि भगवान श्रीराम यांच्या भेटीच्या स्थळालाही अखेर योग्य मान -सन्मान प्राप्त झाला आहे .  राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्यापासून ते चौरी चौरा येथील हुतात्म्यांपर्यंत, मातृभूमीच्या सुपुत्रांच्या योगदानाचे भाजपा  सरकारनेच  संपूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने स्मरण केले आहे. 

मित्रहो,

कुटुंबाधिष्ठित राजकारण ही असुरक्षिततेतून जन्मलेली विशिष्ट  ओळख असते. म्हणूनच , परिवारवादी स्वतःच्या कुटुंबाचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी इतरांचे योगदान जाणीवपूर्वक कमी लेखतात.  याच मानसिकतेमुळे भारतात  राजकीय अस्पृश्यतेचा शिरकाव झाला. तुम्हीच विचार करा, स्वतंत्र भारतात अनेक पंतप्रधान होऊन गेले, मात्र राजधानी दिल्लीत जे  संग्रहालय होते, त्यात अनेक माजी पंतप्रधानांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले गेले. ही स्थिती देखील भाजपाने , रालोआने बदलली आहे.  आज तुम्ही दिल्लीत जाता , तेव्हा भव्य पंतप्रधान संग्रहालय तुमचे स्वागत करते. , तिथे स्वतंत्र भारतातील प्रत्येक पंतप्रधान, भले त्यांचा  कार्यकाळ कितीही अल्प असला तरी त्यांना योग्य सन्मान आणि  स्थान देण्यात आले आहे.

मित्रहो,

काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपाला  नेहमीच राजकीयदृष्ट्या अस्पृश्य मानले.   मात्र भाजपाचे संस्कार आपल्याला सर्वांचा सन्मान करण्याची  शिकवण देतात. मागील 11 वर्षांमध्ये  भाजपा सरकारच्या कार्यकाळात नरसिंह राव आणि  प्रणव मुखर्जी  यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले . हे आमचे सरकार आहे ज्याने मुलायम सिंह यादवजी आणि तरुण गोगोईजी सारख्या अनेक नेत्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले. काँग्रेसकडून, इथे समाजवादी पार्टीकडून कुणीही अशी अपेक्षा करूच  शकत नाही. त्यांच्या राजवटीत तर भाजपाच्या  नेत्यांना फक्त अपमान सहन करावा लागला होता.

मित्रहो,

भाजपाच्या डबल इंजिन सरकारचा मोठा लाभ उत्तर प्रदेशला होत आहे. उत्तर प्रदेश, 21 व्या शतकातील भारतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणि माझे सौभाग्य आहे की मी उत्तर प्रदेशचा खासदार आहे. आज मी अतिशय अभिमानाने म्हणू शकतो  की उत्तर प्रदेशचे मेहनती लोक एक नवीन भविष्य लिहित आहेत.  एकेकाळी ढासळलेली  कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत उत्तर प्रदेशची चर्चा होत असे , परंतु आज विकासासाठी चर्चा केली जाते. आज देशाच्या पर्यटन नकाशावर उत्तर प्रदेश वेगाने उदयास येत आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम हे उत्तर प्रदेशच्या नव्या ओळखीचे प्रतीक बनत आहेत. आणि राष्ट्र प्रेरणा स्थळासारख्या आधुनिक बांधकामांमुळे उत्तर प्रदेशची नवीन प्रतिमा आणखी उजळते आहे.

मित्रहो,

आपला  उत्तर प्रदेश सुशासन, समृद्धी आणि खऱ्या सामाजिक न्यायाचे मॉडेल म्हणून अधिक उंची गाठत राहो याच इच्छेसह तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा राष्ट्र प्रेरणा स्थळाबद्दल अभिनंदन. मी म्हणेन डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, तुम्ही म्हणा,  अमर रहे, अमर रहे। मी म्हणेन पंडित दीनदयाल उपाध्याय जी,  तुम्ही म्हणा, अमर रहे, अमर रहे। मी म्हणेन, अटल बिहारी वाजपेयी जी,  तुम्ही म्हणा, अमर रहे, अमर रहे।

श्यामा प्रसाद मुखर्जी -  अमर रहे, अमर रहे।

श्यामा प्रसाद मुखर्जी - अमर रहे, अमर रहे।

श्यामा प्रसाद मुखर्जी - अमर रहे, अमर रहे।

पंडित दीनदयाल जी - अमर रहे, अमर रहे।

पंडित दीनदयाल जी - अमर रहे, अमर रहे।

पंडित दीनदयाल जी - अमर रहे, अमर रहे।

अटल बिहारी वाजपेयी जी - अमर रहे, अमर रहे।

अटल बिहारी वाजपेयी जी - अमर रहे, अमर रहे।

अटल बिहारी वाजपेयी जी - अमर रहे, अमर रहे।

भारत माता की जय!

वंदे  मातरम्।

वंदे मातरम्।

***

NehaKulkarni/NilimaChitale/SanjanaChitnis/SushamaKane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209386) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Kannada , Malayalam