गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे अहमदाबाद येथे भारतीय वैद्यकीय संघटनेची राष्ट्रीय परिषद आयएमए नॅटकॉन 2025मध्ये मार्गदर्शन

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2025 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधील अहमदाबाद येथे भारतीय वैद्यकीय संघटनेच्या(आयएमए) राष्ट्रीय परिषद आयएमए एनएटीसीओएम - नॅटकॉन 2025मध्ये मार्गदर्शन केले. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की कोणतीही संस्था 100 वर्षे पूर्ण करते तेव्हा तिच्यामागे अत्यंत प्रदीर्घ आणि ऐतिहासिक वाटचाल उभी राहते. कोणत्याही संस्थेसाठी शताब्दी वर्ष हे तिच्या समोरील आव्हानांवर विचार करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांनी सांगितले की देशाच्या आरोग्य क्षेत्रात लोकसेवेसाठी आयएमए मार्फत झालेली कामगिरी वर्षभर विशेषपणे अधोरेखित करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवली जावी. यामुळे सेवेची भावना, कर्तव्याची जाणीव आणि साध्य केलेल्या यशाबद्दल जनमानसात जागरुकता निर्माण होईल. तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी (आरएमपी) पासून ते तज्ज्ञांपर्यंत या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेऊन काळाच्या मागणीप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडविण्याची ही योग्य वेळ आहे.

CR3_8194.JPG

अमित शाह म्हणाले की आरोग्य क्षेत्र हे मूलत: सेवेशी निगडित क्षेत्र आहे. एखादा गंभीर आजाराने पीडित व्यक्ती जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्याला उपचार देणाऱ्या डॉक्टरमध्ये देव दिसतो. त्यांनी सांगितले की 100 वर्षांपूर्वी ठरवलेल्या नैतिक मूल्यांचे परिमाण आता अप्रासंगिक झाले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आरोग्य क्षेत्रातील नैतिक मूल्यांच्या परिमाणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. त्यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना विनंती केली की या क्षेत्रातील नैतिकतेची पुनःपरिभाषा करून ती आजच्या गरजांशी सुसंगत करण्यासाठी एक समिती स्थापन करावी.

शाह म्हणाले की केवळ वैद्यकीय शिक्षण घेतल्याने कोणीही यशस्वी डॉक्टर होत नाही, तर या क्षेत्रातील नैतिक मूल्यांचे सर्व परिमाण देखील वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग असायला हवेत आणि ही जबाबदारी आयएमएवर आहे. त्यांनी सांगितले की नैतिक मूल्ये कोणावर लादता येत नाहीत किंवा कोणत्याही कायद्याद्वारे लागू करता येत नाहीत, कारण हे नैतिक विषय आहे. गृहमंत्री म्हणाले की आयएमएने नैतिकतेच्या सर्व परिमाणांची नव्याने व्याख्या करून भारत सरकारला ती वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग बनविण्याचा सल्ला दिला तर आगामी काळात सेवा ही पवित्र कर्तव्य मानणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढेल, आणि आज त्याची अत्यंत गरज आहे. त्यांनी पुढे सांगितले की जर असे झाले तर शतकी सेवेमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेली डॉक्टरांप्रति आदर आणि विश्वासाची भावना अनेक शतकांपर्यंत टिकून राहील.

CR3_8116.JPG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांसमोर विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प ठेवला आहे, जेणेकरून जेव्हा देश 2047 मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल, तेव्हा जगात असे कोणतेही क्षेत्र नसेल, ज्यात भारत अव्वल स्थानी नसेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक अंगाने निरोगी लोकसंख्या निर्माण करणे आवश्यक आहे – मग ती मानसिक असो वा शारीरिक, किंवा ऊर्जा आणि उत्साहाच्या बाबतीत असो – आणि या प्रयत्नात डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, हे त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार विकसित भारतामध्ये एक मजबूत आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यास कटिबद्ध आहे आणि यामध्ये डॉक्टर निर्णायक भूमिका बजावतील, असे त्यांनी सांगितले.

'इंडियन मेडिकल असोसिएशन' (IMA) संशोधन करणाऱ्या डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी एखादी योजना तयार करून भारत सरकारकडे सादर करू शकते का? अशी विचारणा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली. सध्याच्या डॉक्टरांच्या सेवांचा दूरदृश्य प्रणालीमार्फत आणि टेलिमेडिसिनद्वारे जास्तीत जास्त वापर करण्यासाठी 'आयएमए’ कोणती पावले उचलू शकते?, असेही त्यांनी विचारले. देशाची आरोग्य पायाभूत सुविधा अधिक मजबूत आणि लवचिक बनवणे ही 'आयएमए'ची भूमिका असायला हवी, असे त्यांनी सांगितले. आपल्या योगदानाच्या कक्षांचे पुनरावलोकन करण्याची आणि देशाला पुढे कसे न्यायचे हे निश्चित करण्यासाठी काम करण्याची वेळ आली आहे, यावर त्यांनी भर दिला. देशाला परवडणारी, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करायचे असेल, तर 'आयएमए'ची भूमिका काय असावी, यावर विचारमंथन व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. सेवा क्षेत्रात सर्वाधिक योगदान देणारी संस्था कोणती असेल, तर ती 'आयएमए' आहे, असे त्यांनी नमूद केले. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असू शकते, पण आत्मसंतुष्टतेची नाही, कारण अजून बरेच काही करायचे बाकी आहे, असे ते म्हणाले. 'आयएमए'ने यावर चिंतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

CR3_8093.JPG

'आयएमए'ने आता देशाच्या सध्याच्या गरजांनुसार पुढे जायला हवे. यासाठी, मूळ संकल्पना म्हणून लक्ष आजारांवरून आरोग्याकडे वळवले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. औषधांसोबतच, निरोगी जीवनशैलीसाठी सल्ला आणि मार्गदर्शन देण्यावर अधिक भर दिला पाहिजे. नवीन डॉक्टरांना या दिशेने प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी सूचना त्यांनी दिली. आयुष्मान भारत योजना आणि जेनेरिक औषधांच्या दुकानांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केले.

कोविड संकटाच्या काळात देशात अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले, ज्यात 'आयएमए'ने, विशेषत्वाने लसीकरणात, महत्त्वपूर्ण सहकार्य केले, याचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी केला. केवळ 2022 या वर्षात 2500 हून अधिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. आयएमएने नैतिक मानके अधिक मजबूत करून, जन्मापूर्वी लिंग निदान करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी केली, असे त्यांनी सांगितले. कोविड काळात, हेल्पलाइनवर 20 लाखांहून अधिक कॉल प्राप्त झाले, ज्याद्वारे लोकांना मदत पुरवण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

आज 27 राज्यांमधून 5,000 हून अधिक आयएमए प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत आणि संस्थेच्या नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे, असे शहा यांनी सांगितले. नवीन अध्यक्षांच्या कार्यकाळात आयएमएला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209288) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati , Tamil , Kannada