पंचायती राज मंत्रालय
विशाखापट्टणम येथे आयोजित पेसा महोत्सव 2025 ची दिमाखदार सांगता
पेसा दिनानिमित्त विशाखापट्टणम येथे आयोजित दोन दिवसीय पेसा महोत्सवातील सहभागींना केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांनी संबोधित केले
आदिवासींच्या हक्कांना संवैधानिक पाठबळ देण्यावर भर देत, पेसा कायद्याची तळागाळापर्यन्त प्रभावी अंमलबजावणी करण्याचे केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2025 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/विशाखापट्टणम, 24 डिसेंबर 2025
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी पेसा दिनानिमित्त (24 डिसेंबर 2025) विशाखापट्टणम येथे आयोजित दोन दिवसीय (23-24 डिसेंबर 2025) पेसा महोत्सवात सहभागी झालेल्यांना व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पेसा (PESA), अर्थात, पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यन्त विस्तार) कायदा, 1996, आदिवासी समुदायाच्या जल, जंगल, जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधनांवरील हक्कांना मजबूत घटनात्मक पाठबळ प्रदान करतो, यावर भर देत, या कायद्याची तळागाळापर्यन्त प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या महोत्सवात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान आणि तेलंगणा या सर्व दहा पेसा राज्यांमधील पंचायत प्रतिनिधी, खेळाडू, कारागीर, हस्तकलाकार आणि आदिवासी समुदायातील सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. सहभागी झालेल्यांनी कबड्डी, तिरंदाजी, पेसा रन आणि आदिवासी क्रीडा प्रकरांची प्रात्यक्षिके, यात आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी खाद्यपदार्थ, हस्तकला, कला, संस्कृती, नृत्य आणि परंपरा याच्या प्रदर्शनाने आदिवासी वारशाला एक चैतन्यदायी राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले.
प्रा. बघेल यांनी नमूद केले की पंचायती राज मंत्रालयाने पेसा क्षेत्रात तळागाळातील प्रशासन मजबूत करण्यासाठी निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी रचनात्मक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले आहेत, तसेच राज्यांमध्ये त्याचे अनुकरण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचे दस्तऐवजीकरण देखील केले आहे. स्थानिक गरजा आणि परंपरांच्या अनुषंगाने गाव स्तरावर तयार केलेले सहभागात्मक विकास आराखडे आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि पंतप्रधानांचे विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले. आदिवासी तरुणांना जोडणे, नेतृत्व कौशल्यांना प्रोत्साहन देणे, आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणे, आणि "मेरी परंपरा, मेरी पेहचान" (माझी परंपरा, माझी ओळख) ही भावना बळकट करणे, हे पेसा महोत्सवाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी, अनुसूचित क्षेत्रांमध्ये तळागाळातील प्रशासन मजबूत करण्याबरोबर, जल, जंगल, जमीन यांचे संरक्षण करण्यासाठी पेसा कायदा महत्वाचा असल्याचे अधोरेखित केले. हा कायदा स्थानिक संस्थांना सक्षम करतो, समुदायाच्या नेतृत्वाखालील निर्णय घेण्याची खात्री देतो आणि ग्रामसभेला लोकशाही सहभागाच्या केंद्रस्थानी ठेवतो, असे त्यांनी नमूद केले. पेसा क्षेत्रातील ग्रामसभांनी घेतलेले निर्णय आदिवासी समुदायांना त्यांच्या संसाधनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या विकासाला मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम करून भारताच्या लोकशाही चौकटीची खरी ताकद प्रतिबिंबित करतात, असे ते म्हणाले.
झारखंड सरकारने पेसा नियमांच्या मसुद्याला मान्यता दिली आहे, त्यामुळे पेसा नियमांच्या अधिसूचनेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दहा पेसा राज्यांपैकी हे नववे राज्य ठरले आहे, असे भारद्वाज यांनी यावेळी सांगितले.
आंध्र प्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव शशी भूषण कुमार यांनी सर्व सहभागींचे विशाखापट्टणम येथे स्वागत केले आणि पेसा दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. पेसा जिल्हे आणि अनुसूचित क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून, पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम बनवण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

‘पेसा’ दिनानिमित्त आयोजित महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या तारखेलाच ‘पेसा दिन’ही साजरा केला जातो. महोत्सवामध्ये त्यानिमित्त पेसा पोर्टल, पेसा निर्देशक, आदिवासी भाषांमधील पेसावरील प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यावरील ई-बुक यासह अनेक महत्त्वाच्या उपक्रमांचे अनावरण करण्यात आले. पंचायती राज मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत विवेक भारद्वाज आणि शशी भूषण कुमार यांनी संयुक्तपणे या ई-पुस्तकाचे अनावरण केले. हे उपक्रम राज्यांमध्ये पेसाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संस्थात्मक बळकटीकरण, देखरेख आणि क्षमता बांधणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
एका समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भारतामधील विविध आदिवासी आणि लोककला वारसा सादर करण्यात आला. यामध्ये आंध्र प्रदेशातील कुचीपुडी शास्त्रीय नृत्याचा आणि तेलंगणातील गुस्साडी, राजस्थानमधील गवारी, ओडिशातील धेम्सा यासारख्या राज्यांतील लोककलांचे सादरीकरण झाले. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातील लोकनृत्यांचा समावेश होता. निवडक आदिवासी प्रात्यक्षिक खेळांचेही सादरीकरण करण्यात आले, त्यानंतर सहभागी संघांचा सत्कार करण्यात आला.

समारोप समारंभात ‘पेसा रन’, कबड्डी आणि तिरंदाजी स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली, तसेच आदिवासी प्रात्यक्षिक खेळांमधील सहभागींना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देण्यात आली. एक प्रतीकात्मक कृती म्हणून, पेसा महोत्सवाची मशाल छत्तीसगड राज्याकडे सुपूर्द करण्यात आली. आता यापुढे होणा-या पेसा महोत्सवाच्या आयोजनाचे यजमानपद छत्तीसगड राज्याला देण्यात आले.
पेसा रन (पुरुष गटात) अतुल चिधाडे (महाराष्ट्र) यांनी प्रथम स्थान पटकावले, त्यानंतरचे क्रमांक सूरज माशी आणि मनोज हिलिन (दोघेही महाराष्ट्राचे) यांनी मिळवले. महिला गटात, राजकुमारी (राजस्थान) यांनी प्रथम स्थान पटकावले, तर त्यापाठोपाठ हिरा सांगा (झारखंड) आणि प्रिया (हिमाचल प्रदेश) यांनी क्रमांक मिळवले.
महिलांच्या तिरंदाजी स्पर्धेमध्ये, खुशी नानोमा (राजस्थान) यांनी सुवर्णपदक, अनुराधा कुमारी (झारखंड) यांनी रौप्यपदक आणि अंबिका (ओडिशा) यांनी कांस्यपदक जिंकले.
पुरुषांच्या तिरंदाजीमध्ये, कृष्णा पिंगुआ (झारखंड) यांनी सुवर्णपदक, बद्रीलाल मीणा (राजस्थान) यांनी रौप्यपदक आणि दिनेश मुर्मू (झारखंड) यांनी कांस्यपदक जिंकले.
विशाखापट्टणम पोर्ट अथॉरिटी इनडोअर स्टेडियममध्ये 23 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या कबड्डी स्पर्धांमध्ये, पुरुष गटात मध्य प्रदेशने तर महिला गटात झारखंडने विजय मिळवला.
पेसा कायद्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार, सर्व दहा पेसा राज्यांमध्ये ग्रामसभांच्या माध्यमातून लोकांच्या सहभागाने पेसा दिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी, तसेच पंचायत प्रतिनिधींनी, पेसा महोत्सवाचे कौतुक केले. हा महोत्सव लोकांचा सहभाग वाढवणारा, तळागाळातील स्व-शासनाला बळकटी देणारा आणि लोकसंस्कृतीत रुजलेला लोकउत्सव म्हणून साजरा केला जात आहे.
विशाखापट्टणम बंदर प्राधिकरण मैदानावर 23-24 डिसेंबर, 2025 रोजी आयोजित दोन दिवसीय पेसा महोत्सवाची आज पेसा दिनी सांगता झाली. या महोत्सवात पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार) अधिनियम, 1996 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि अनुसूचित क्षेत्रांमध्ये तळागाळातील स्व-शासनाला बळकटी देण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208329)
आगंतुक पटल : 15