PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

दिमाखदार महोत्सव : 'इफ्फिएस्टा 2025'

प्रविष्टि तिथि: 14 NOV 2025 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2025

 

या नोव्हेंबर महिन्यात गोव्यामध्ये होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) केवळ चित्रपटांचे सादरीकरण होणार नाही, तर एक सांस्कृतिक आनंदोत्सव होणार आहे. देशातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवणाऱ्या या आयोजनाचा दिमाख अधिक वाढवण्यासाठी यावेळी त्यात भर पडणार आहे ती ‘इफ्फिएस्टा’ ची! यात असणार आहे संगीत, कला व संस्कृतीचा दिमाखदार आविष्कार!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतर्गत ‘इफ्फिएस्टा’2025 मध्ये दूरदर्शन प्रस्तुत भारतीय संगीत व कलाप्रकारांचे सादरीकरण असणार आहे. गोव्यातील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहातील मंचावर 21 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान विविध संगीत कला प्रकारांचे भव्य दिव्य सादरीकरण होणार आहे. वेव्ह्ज सांस्कृतिक व संगीत सभांच्या अंतर्गत निवडण्यात आलेल्या अनेक संगीतकार आणि कलाकारांना मंचावर आपली कला सादर करताना पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

‘इफ्फिएस्टा’मधील प्रत्येक संध्याकाळ स्वतःचा निराळा रंग घेऊन येईल. काही रात्रींची सुरुवात जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सौम्य, परिचित सुरांनी होईल, तर काही रात्री तरुण कलाकार नव्या युगाच्या सर्जनशीलतेचा रंग उधळत आत्मविश्वासाने मंचावर येतील. इफ्फिएस्टामध्ये शास्त्रीय संगीताच्या रागांपासून ते आधुनिक तालवाद्यांच्या ठेक्यांपर्यंत, भारताचे वैविध्यपूर्ण, गतिमान आणि खोल भावनिक मर्म टिपले जाईल. याद्वारे इफ्फिएस्टामध्ये भारताच्या वाढत्या ‘सर्जनशील आणि सजीव अर्थव्यवस्थेचे’ प्रतिध्वनी देखील प्रेक्षकांच्या कानी पडतील. इफ्फिएस्टा - जिथे कला, नवोन्मेष आणि उद्योग एकत्र येऊन केवळ सादरीकरणेच नव्हे तर नव्या संधी निर्माण करतील.

पण संगीत आणि दिव्यांच्या लखलखाटाच्याही पलीकडे जात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे हे ‘इफ्फिएस्टा’चे उद्दिष्ट आहे. एकत्र एकसुरात गाणारे रसिकांचे जत्थ्ये, अलोट गर्दी, सूर्यास्तानंतर एकत्र येणारी कुटुंबे आणि तालासुराद्वारे एकत्र येणारे अनोळखी लोक. हे पाहताना कोणालाही जाणवेल की संगीत फक्त कानावर पडत नाही, तर ते मनाला जाणवते. ते हृदयांना जोडते, सीमा ओलांडून प्रत्येक रसिकाला एकमेकांच्या जवळ आणते.

जादुई संगीताचे चार दिवस

‘इफ्फिएस्टा’ 2025 मध्ये चार दिवस संध्याकाळी अविस्मरणीय कार्यक्रम होतील. प्रत्येक संध्याकाळी स्वतःची लय आणि ऊर्जा असेल. प्रत्येक संध्याकाळचे सूत्रसंचालन एक सेलिब्रिटी होस्ट करणार असून त्यासोबत ‘सारेगामा’ मध्ये सादरीकरण केलेला एक विशेष पाहुणा गायक असेल. हे दोघे एकत्र येऊन एक सळसळत्या ऊर्जेने भरलेला कलाविष्कार सादर करतील. ‘सारेगामा’, एमजे फिल्म्स आणि दिल्ली घराणा यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणाऱ्या या महोत्सवात भारतातील सर्वोत्तम गायक, संगीतकार आणि कथाकार एकाच रंगमंचावर एकत्र येतील - यातून ‘इफ्फिएस्टा’मध्ये देशाच्या सर्जनशील विविधतेचे आणि एकतेच्या भावनेचे प्रतिबिंब दिसून येईल.

स्थळ : श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह, गोवा / वेळ : सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत

दिनांक

कार्यक्रम

प्रवेश

21 नोव्हेंबर 2025 (शुक्रवार)

ओशो जैन - लाईव्ह कॉन्सर्ट

प्रवेश मोफत

22 नोव्हेंबर 2025 (शनिवार)

महोत्सव विशेष प्रस्तुती : बॅटल ऑफ बँड्स

(भारतीय व आंतरराष्ट्रीय), सुरों का एकलव्य, वाह उस्ताद

प्रवेश मोफत

23 नोव्हेंबर 2025 (रविवार)

महोत्सव विशेष प्रस्तुती: बॅटल ऑफ बँड्स

(भारतीय व आंतरराष्ट्रीय), ‘सुरों का एकलव्य’, ‘वाह उस्ताद’, ‘देवाचंल की प्रेमकथा’ (विशेष प्रस्तुती)

प्रवेश मोफत

24 नोव्हेंबर 2025 (सोमवार)

महोत्सव विशेष प्रस्तुती: बॅटल ऑफ बँड्स

(भारतीय व आंतरराष्ट्रीय), ‘सुरों का एकलव्य’, ‘वाह उस्ताद’

प्रवेश मोफत

 

प्रमुख कार्यक्रमाची रूपरेषा :

बॅटल ऑफ बँड्स - भारत आणि आंतरराष्ट्रीय

दूरदर्शन आणि वेव्हज ओटीटी मधील सर्वात प्रतिभाशाली युवा संगीत सादरीकरणांपैकी एक आहे - बॅटल ऑफ बँड्स - भारताने या संगीत स्पर्धेसाठी रॉक, सूफी, बॉलीवूड आणि फ्यूजन शैलीतील 26 उत्कृष्ट गट आमंत्रित केले होते. अनेक उत्तम सादरीकरणांनंतर, ‘द वैरागीज’ विजेते ठरले, सूफी रॉकर्स आणि सोल्स ऑफ सूफी x गौरांश या गटांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.

‘वेव्हज: क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ अंतर्गत 2025 च्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीत, 13 जागतिक बँड्सनी भारतातील आघाडीच्या पाच बँड्ससोबत सादरीकरण केले, यामुळे सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उत्साही वातावरण तयार झाले. दर्जेदार प्रतिभावंतांचे केंद्र म्हणून भारताचे स्थान या कार्यक्रमामधून दिसून आले. संगीत ही वैश्विक भाषा आहे आणि ते सीमा ओलांडून हृदयांना जोडते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

 

‘सुरों का एकलव्य’ - नव्या भारताचा आवाज

उदयोन्मुख गायकांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा दूरदर्शनचा मूळ संगीत कार्यक्रम, ‘सुरों का एकलव्य’, याला शरीब-तोशी, आनंद राज आनंद आणि प्रतिभा सिंग बघेल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमातील विजेते कलाकार इफ्फीएस्टा येथे गजेंद्र सिंग (अंताक्षरी फेम) यांच्यासह आपली कला सादर करतील. दररोज संध्याकाळी एक नवीन सेलिब्रिटी गायक व्यासपीठावर येईल आणि याचे सूत्रसंचालन प्रतिभा सिंग बाघेल करतील.

 

‘वाह उस्ताद’ - भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मा

‘वाह उस्ताद’ हा कार्यक्रम दिल्ली घराणा द्वारे सादर केला जात असून भारतीय शास्त्रीय संगीत आणि सूफी संगीताचा मिलाफ यातून दिसून येईल. वुसत इकबाल खान यांनी त्यांच्या विशिष्ट दास्तानगोई शैलीत या कार्यक्रमाची संकल्पना मंडळी आणि सूत्रसंचालन केले आहे. पंडित साजन मिश्रा आणि मीत ब्रदर्स यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वाह उस्ताद’ सीझन 1 मध्ये आघाडीवर असलेले सहा अंतिम स्पर्धक या विभागात आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये रसिकांना पाहता येईल लाईव्ह जुगलबंदी, दर्विश नर्तक आणि भारताच्या कालातीत शास्त्रीय वारशाचा उत्सव साजरा करणारी एक भव्य फ्यूजन अंतिम फेरी!

 

‘देवाचंल की प्रेमकथा’ - एक हृदयस्पर्शी कहाणी

पालमपुरच्या निसर्गरम्य परिसरात राहणाऱ्या दोन दिव्यांग तरुण तरुणींच्या या कहाणीत सहवेदना, साहस आणि समावेशक प्रेमाचे दर्शन होते. या कलाकृतीचे निर्माते ‘कल्ट डिजिटल’ असून हा मंचीय आविष्कार आहे. त्यानंतर पारंपरिक हिमाचल लोकनृत्य सादर केले जाईल. कथा, संगीत व प्रादेशिक संस्कृतीने नटलेल्या या कार्यक्रमाचे सादरीकरण दररोज संध्याकाळी एक सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी कलाकार करणार आहेत.

 

‘ओशो जैन कॉन्सर्ट’

ओशो जैन, एक गायक-गीतकार असून त्यांच्या भावपूर्ण रचना आणि शक्तिशाली लाईव्ह सादरीकरणासाठी ओळखले जातात. त्यांनी संगीत क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. भावपूर्ण कथानक आणि आधुनिक संगीत ही त्यांच्या गीतांची बलस्थाने आहेत. जुन्या व नव्या पिढीतील रसिकांना ती सारखीच भावतात. ‘इफ्फिएस्टा’ 2025 मध्ये ते 21 नोव्हेंबर रोजी मंचावर येतील व संगीत आणि संस्कृती यांचा मिलाफ घडवत या महोत्सवाला एक नवी दिशा देतील.

 

नव्या भारताची सर्जनशील ऊर्जा :

भारताच्या सांस्कृतिक परिदृश्यात परिवर्तन घडवणारी एक नवीन ऊर्जा ‘इफ्फिएस्टा’च्या केंद्रस्थानी आहे - "सर्जनशील आणि जिवंत अर्थव्यवस्थेचा उदय". ‘इफ्फिएस्टा’ हा केवळ एक महोत्सव नाही, तर सर्जनशीलता आणि संधींचा मिलाफ घडवणारे एक व्यासपीठ म्हणून उदयाला येत आहे. प्रतिभा आणि नवोपक्रमाच्या या उत्सवात कलाकार, प्रेक्षक आणि उद्योगांना एकत्र आणले जाते.

या दृष्टिकोनाचा पाया ‘वेव्हज कल्चरल्स अँड कॉन्सर्ट’मध्ये सापडतो. कलात्मक सहकार्य आणि सांस्कृतिक उद्योजकतेच्या नवीन स्वरूपांचा मार्ग या उपक्रमाने मोकळा केला आहे. ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज)’ या मोठ्या व्यासपीठाअंतर्गत, या महोत्सवामुळे जागतिक प्रतिभा केंद्र म्हणून भारताच्या उदयास प्रोत्साहन मिळेल. तसेच देशोदेशीचे निर्माते, उद्योग आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्यासाठी हे व्यासपीठ नक्कीच उपयोगी ठरेल.

देशभरातील विविध स्तरांमधून तसेच जागतिक पातळीवरील प्रतिभाशाली कलाकारांचा शोध घेऊन त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भारतीय कलात्मकतेची विविधता प्रदर्शित करून भारताच्या वाढत्या सर्जनशील अर्थव्यवस्थेची चौकट तयार करण्यासाठी ‘वेव्हज कल्चरल्स अँड कॉन्सर्ट’ मदत करत आहे. ‘वेव्हज कल्चरल्स अँड कॉन्सर्ट’तर्फे संगीत मैफिल आणि स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांपर्यंत सर्व प्रकारचे उपक्रम राबवले जातात. देशांतर्गत कलाकारांची कलात्मक गुणवत्ता आणि आर्थिक मूल्य वाढवून संगीतकार, कलाकार आणि उत्पादन व्यावसायिकांना प्रोत्साहन देणारी परिसंस्था मजबूत करण्याचे महत्वाचे कार्य या माध्यमातून होत आहे. या परिप्रेक्ष्यात ‘इफ्फिएस्टा’ ही चळवळ म्हणजे जनतेची अभिव्यक्ती म्हणून कार्यरत आहे. प्रतिभेच्या आविष्कारातून माणसांची मने जोडली जातात, आणि कलात्मकतेच्या दर्जेदार अनुभवांमधून केवळ दाद किंवा प्रशंसाच मिळत नाही, तर ते उत्पन्नाचे साधनही बनू शकते, हे या व्यासपीठाद्वारे दर्शवले जाते. या चार रात्रीच्या संस्कृती, संगीत आणि सादरीकरणातून राष्ट्रीय पातळीवरील एक गतिमान चळवळ पुढे जात आहे - जिथे संस्कृती केवळ जतन केली जात नाही तर सहभाग, नवोपक्रम आणि सामायिक उत्सवाद्वारे पुढे नेली जाते.

 

महोत्सवाची फलश्रुती :

‘इफ्फिएस्टा 2025’ हा केवळ एक महोत्सव नसून, तो जनमन, कला आणि कथा एकत्र आल्यावर निर्माण होणाऱ्या जादूची आठवण करून देईल. गोव्यात चार रात्री चालणाऱ्या संगीत कार्यक्रमांची आठवण खूप मोठ्या काळापर्यंत टिकून राहील, सादरीकरण करताना त्यात प्रेक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील आणि प्रत्येक वेळी मिळणारी दाद सर्वांना सामायिक आनंदाची उब देईल. हे समावेशक, उत्स्फूर्त आणि खोलवर रुजलेल्या मानवतेचे प्रतीक म्हणजेच या महोत्सवाची फलश्रुती आहे.

दूरदर्शनच्या दृष्टिकोनाने आणि ‘वेव्हज कल्चरल्स अँड कॉन्सर्ट’ने तयार केलेल्या सर्जनशील मार्गांनी प्रेरित, हा महोत्सव संस्कृती अनुभवण्याचा अर्थ काय आहे हे पुन्हा परिभाषित करेल. कला केवळ कॉन्सर्ट हॉल किंवा स्टुडिओमध्ये नसते - जिथे जिथे लोक ती साजरी करण्यासाठी एकत्र येतात तिथे ती अंकुरते आणि श्वास घेते याची आठवण हा महोत्सव करून देईल. तरुण कलाकाराच्या पहिल्या झंकारापासून ते पंडितांच्या कालातीत सादरीकरणापर्यंत, भारतीय कलाकारांच्या भावना आणि अमर्याद सर्जनशील ऊर्जेचे दर्शन या ‘इफ्फिएस्टा’ मधून घडत राहील.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/उमा रायकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207498) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Khasi , English , Urdu , Nepali , हिन्दी , Odia , Tamil , Kannada