पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आसाममधील नामरूप येथील युरिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

प्रविष्टि तिथि: 21 DEC 2025 11:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2025

 

उज्जनिर रायज केने आसे? आपुनालुकोलोई मुर अंतोरिक मोरोम आरु स्रद्धा जासिसु।

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, केंद्र सरकारमधील माझे सहकारी, येथील लोकप्रतिनिधी, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, मंत्री, खासदार, आमदार, सर्व मान्यवर आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो, आज इथे मंडपातच नाही, तर बाहेरही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.

ही वीरांची भूमी आहे. सौलुंग सुकाफा, महावीर लचित बोरफुकन, भीमबर देउरी, शहीद कुसल कुवर, मोरान राजा बोडौसा, मालती मेम, इंदिरा मिरी, स्वर्गदेव सर्वानंद सिंह आणि वीरांगना सती साधनी यांसारख्या महान व्यक्तींनी ही भूमी पवित्र केली आहे. अशा या वरच्या आसामच्या मातीत मी आदराने नमन करतो.

मित्रांनो,

समोर पाहिलं तर दूरवरपर्यंत तुम्ही सगळे मोठ्या उत्साहात उभे आहात. विशेषतः माझ्या मातांनो आणि भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही प्रेम आणि आशीर्वाद घेऊन आलात, हीच आमची खरी ताकद आहे. ही अनुभूती खूपच भावूक करणारी आहे. आज इथे आलेल्या अनेक भगिनी आसामच्या चहाबागांचा सुगंध सोबत घेऊन आल्या आहेत. या चहाच्या सुगंधामुळे माझं आणि आसामचं नातं अजून घट्ट झाल्यासारखं वाटतं. तुमच्या प्रेमासाठी मी मनापासून आभार मानतो.

मित्रांनो,

आज आसामसाठी आणि संपूर्ण ईशान्य भारतासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. नामरूप आणि डिब्रुगढ अनेक वर्षांपासून ज्या स्वप्नाची वाट पाहत होते, ते आज पूर्ण होत आहे. या भागात औद्योगिक विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. थोड्याच वेळापूर्वी इथे अमोनिया-युरिया खत प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. त्याआधी गुवाहाटीमध्ये विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटनही झाले.

आज सगळीकडे अले बोलले जात आहे की, आसामने विकासाची नवी गती पकडली आहे. पण मी सांगू इच्छितो की ही फक्त सुरुवात आहे. आसामला अजून खूप पुढे जायचं आहे आणि या प्रवासात तुम्हा सर्वांना सोबत घ्यायचे आहे. अहोम साम्राज्याच्या काळात आसाम जसे सामर्थ्यवान होते, तसेच आसामला विकसित भारतात पुन्हा एकदा मजबूत बनवायचे आहे.

नवे उद्योग, उत्तम रस्ते-रेल्वे-विमानतळांसारख्या सुविधा, सेमीकंडक्टरसारखी आधुनिक क्षेत्र, शेतीत नव्या संधी, चहाबागा आणि तिथल्या कामगारांचा विकास, पर्यटनात वाढ अशा सगळ्याच क्षेत्रात आसाम पुढे जात आहे. या आधुनिक खत प्रकल्पासाठी आणि गुवाहाटी विमानतळाच्या नवीन टर्मिनलसाठी मी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो. भाजपाचे डबल इंजिन सरकार उद्योग आणि संपर्क व्यवस्था मजबूत करत असून त्यामुळे आसामची स्वप्नं साकार होत आहेत आणि तरुणांना नवी स्वप्नं पाहायचे धैर्य मिळत आहे.

मित्रांनो,

विकसित भारत घडवायचा असेल तर शेतकऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. म्हणूनच आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी दिवसरात्र काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर खताचा पुरवठा वेळेवर आणि पुरेसा होणेही तितकेच गरजेचे आहे. हा युरिया प्रकल्प ही गरज पूर्ण करणार आहे.

या प्रकल्पावर सुमारे 11 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दरवर्षी इथे 12 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त खत तयार होईल. खत इथेच तयार झाल्यामुळे ते लवकर मिळेल आणि वाहतूक खर्चही कमी होईल.

मित्रांनो,

हा प्रकल्प हजारो लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यावर अनेकांना कायमची नोकरी मिळेल. त्याशिवाय देखभाल, पुरवठा, बांधकाम यांसारख्या अनेक कामांमधून स्थानिक लोकांना, विशेषतः तरुणांना रोजगार मिळेल.

पण बंधूंनो-भगिनींनो,

एक प्रश्न विचारायला हवा, शेतकऱ्यांसाठीची ही सगळी कामे भाजपाचे सरकार आल्यानंतरच का होत आहेत? नामरूप पूर्वी खत उत्पादनाचे मोठे केंद्र होते. इथल्या खतामुळे ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत होता. पण जुने तंत्रज्ञान आणि काँग्रेस सरकारचे दुर्लक्ष यामुळे हे कारखाने हळूहळू बंद पडले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले, उत्पादन घटले आणि उत्पन्नावर परिणाम झाला. तरीही काँग्रेसने काहीच केले नाही.

आज आमचे डबल इंजिन सरकार त्या जुन्या चुका सुधारत आहे.

मित्रांनो,

देशात इतरही अनेक खत कारखाने बंद पडले होते. त्या काळात शेतकऱ्यांना युरियासाठी रांगा लावाव्या लागत होत्या. दुकानांवर पोलीस ठेवावे लागत होते. कधी-कधी लाठीचार्जही व्हायचा.

बंधूंनो-भगिनींनो,

काँग्रेसने जे नुकसान केले, ते भरून काढण्यासाठी आमचे सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे. त्यांनी इतके बिघडवले की, 11 वर्षे सतत मेहनत करूनही अजून बरेच काही करायचे बाकी आहे.

काँग्रेसच्या काळात खतांचे कारखाने बंद पडत होते. पण आमच्या सरकारने मात्र गोरखपुर, सिंदरी, बरौनी, रामागुंडम असे अनेक खत प्रकल्प सुरू केले आहेत. या क्षेत्रात खासगी क्षेत्रालाही प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच परिणाम असा होणार आहे की, आगामी काही काळात युरियाच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होऊ शकू, या अनुषंगाने अत्यंत ठोस अशी पावले उचलण्यात येत आहेत.  

मित्रांनो,

2014 मध्ये देशात फक्त 225 लाख मेट्रिक टन युरियाचेच उत्पादन होत होते. हा आकडा तुमच्या लक्षात राहील?  राहील ना लक्षात हा आकडा? तुम्ही 10-11 वर्षांपूर्वी माझ्याकडे कारभार सोपवलात, तेव्हा 225 लाख मेट्रिक टन उत्पादन होत होते, हे लक्षात घ्या. गेल्या 10-11 वर्षात केलेल्या प्रयत्नांनी हे उत्पादन वाढून 306 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचे नाही, कारण अजूनही खूप काही करण्याची आवश्यकता आहे. जे काम त्यांनी तेव्हा करायला हवे होते, तेव्हा त्यांनी केले नाही आणि म्हणूनच मला थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागत आहेत. आता आपल्याला दर वर्षाला जवळपास 380 लाख मेट्रिक टन युरियाची गरज भासते. आपण 306 वर पोहोचलो आहोत, आणखी 70-80 साध्य करायचे आहे. पण मी देशातील नागरिकांना खात्री देतो की, आम्ही ज्या प्रकारे प्रयत्न करत आहोत, ज्या प्रकारे योजना तयार करत आहोत आणि ज्या प्रकारे माझे शेतकरी बंधू-भगिनी आम्हाला आशीर्वाद देत आहेत, आम्ही शक्य तितक्या लवकर हा फरक भरून काढण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसूर सोडणार नाही.

आणि बंधू आणि भगिनींनो,

मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, तुमच्या हिताच्या बाबतीत आमचे सरकार अत्यंत संवेदनशील आहे. जो युरिया आपल्याला महागड्या किंमतीने परदेशातून आयात करावा लागतो, त्याचा भार आम्ही आपल्या शेतकऱ्यांवर टाकत नाही. भाजप सरकार अनुदान देऊन तो भार स्वतः उचलत आहे, भारतातील शेतकऱ्यांना फक्त 300 रुपयांमध्ये युरियाची गोणी मिळते, त्या एका गोणीसाठी भारत सरकारला, ज्या दुसऱ्या देशांमधून आपण युरिया आणतो त्यासाठी जवळ जवळ तीन हजार रुपये मोजावे लागतात. आता तुम्हीच विचार करा, आपण बाहेरून आणतो 3000 रुपयांना आणि देतो 300 मध्ये. हा सगळा भार देशातील शेतकऱ्यांवर पडू देत नाही, हा सारा भार सरकार स्वतः उचलते. जेणेकरून माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना तो आर्थिक बोजा उचलावा लागणार नाही. पण मी शेतकरी बंधू-भगिनींना असेही सांगेन की, तुम्हाला मला मदत करावी लागेल आणि ही मदत फक्त मलाच नाही तर शेतकरी बंधू-भगिनींनो तुमच्यासाठीही असेल आणि ती मदत म्हणजे आपल्या धरणी मातेला वाचविणे. आपण आपल्या धरणी मातेचे रक्षण केले नाही, तर युरियाची कितीही पोती रिकामी केलीत, तरी ही धरणी माता आपल्याला काहीच देऊ शकणार नाही आणि म्हणूनच जेव्हा शरीराला आजार होतो, तेव्हा जसे औषध योग्य प्रमाणातच घ्यावे लागते, दोन गोळ्या घेण्याची गरज असताना चार गोळ्या घेतल्यात, तर ज्याप्रमाणे शरीराला फायदा न होता नुकसानच होते. तसेच धरणीमातेला शेजारचा जास्त पोती खत घालतो म्हणून आपण सुद्धा गरजेपेक्षा जास्त खत घातले तर, धरणी माता आपल्यावर नाराज होईल. युरियाची जोरदार उधळण करून धरणी मातेवर तिचा मारा करण्याचा आपल्याला अजिबात हक्क नाही. ही आपली माता आहे आणि आपल्याला या मातेला वाचवायचे देखील आहे.           

मित्रांनो,

आज बियाणांपासून ते बाजारापर्यंत भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना उधार मागण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत जवळपास 4 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचवले गेले आहेत. हा आकडा लक्षात राहील? की विसरून जाल? 4 लाख कोटी रुपये माझ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले गेले आहेत, याच वर्षी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी 35 हजार कोटी रुपयांच्या दोन नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत, 35 हजार कोटींच्या. पीएम धन धान्य कृषी योजना आणि कडधान्य आत्मनिर्भरता मिशन, यामुळे शेतीला प्रोत्साहन मिळेल. 

मित्रांनो,

आम्ही शेतकऱ्यांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन काम करत आहोत. प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा आधार मिळत आहे. पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी खरेदीची व्यवस्था सुधारण्यात आली आहे. जेव्हा शेतकरी सशक्त होतील, तेव्हाच देश पुढे जाईल, असे आमच्या सरकारचे स्पष्ट मत आहे आणि यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. 

मित्रांनो, 

केंद्रात आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही किसान क्रेडिट कार्ड सुविधेच्या लाभार्थींमध्ये पशुपालक आणि मत्स्यपालन करणाऱ्यांचाही समावेश केला. किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी, ही केसीसी ची सुविधा मिळायला लागल्यापासून आपले पशुपालक, आमचे मत्स्यपालन करणारे याचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घेत आहेत.  केसीसी मुळे यावर्षी शेतकऱ्यांना, हा आकडा पण लक्षात ठेवा, केसीसी मुळे यावर्षी शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत दिली गेली आहे. 10 लाख कोटी रुपये. जैविक खतांवरील जीएसटी कमी झाल्यामुळेही शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. भाजपा सरकार भारतातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे आणि मला तर असे वाटते की, आसाम मधील काही असे तालुके पुढे यावेत, जिथे शंभर टक्के नैसर्गिक शेती केली जाते. तुम्ही विचार करा, आसाम हिंदुस्थानला दिशा दाखवू शकतो. आसामचा शेतकरी देशाला दिशा देऊ शकतो. आम्ही नैसर्गिक शेतीसाठी राष्ट्रीय मिशन सुरू केले, आज लाखो शेतकरी त्याच्याशी जोडले गेले आहेत. गेल्या काही वर्षात देशात 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना-FPO’s स्थापन झाल्या आहेत. ईशान्य भागाचा विशेष विचार करून आमच्या सरकारने खाद्य तेल-  पाम तेलाशी संबंधित अभियानही सुरू केले आहे. हे मिशन भारताला खाद्यतेलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर बनवेलच शिवाय त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची प्रगती देखील होईल. 

मित्रांनो, 

इथे या भागात चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार देखील मोठ्या संख्येने आहेत, या भाजपाच्या सरकारमुळेच आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या साडेसात लाख कामगारांची जनधन बँक खाती उघडली गेली आहेत. आता बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेल्यामुळे या कामगारांना बँक खात्यांमधून थेट पैसे पाठवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. आमचे सरकार चहाचे मळे असलेल्या भागात शाळा, रस्ते, वीज, पाणी, रुग्णालय अशा सुविधांमध्ये वाढ करत आहे. 

मित्रांनो,

आमचे सरकार 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रासह पुढे वाटचाल करत आहे. आमचा हा दृष्टिकोन देशातील गरीब वर्गाच्या जीवनात खूप मोठा बदल घेऊन आला आहे. गेल्या 11 वर्षांतील आमच्या प्रयत्नांमुळे, योजनांमुळे आणि योजना प्रत्यक्षात साकारल्यामुळे 25 कोटी लोक, हा आकडा देखील लक्षात ठेवा, 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. देशात एक नव-मध्यमवर्ग तयार झाला आहे. हे यामुळे घडू शकले आहे, कारण गेल्या वर्षांमध्ये भारतातील गरीब कुटुंबांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा झाली आहे. काही ताजी आकडेवारी आली आहे, जी भारतात होत असलेल्या बदलांचे प्रतीक आहे.

मित्रांनो,

मला प्रसारमाध्यमांमध्ये या सर्व गोष्टी खूप उपयोगी पडतात, आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की मी ज्या गोष्टी सांगतो त्या जरा लक्षात ठेवून इतरांना सांगा.

मित्रांनो,

पूर्वी गावातील सर्वात गरीब कुटुंबांपैकी दहा कुटुंबांमागे एका कुटुंबाकडे दुचाकी सुद्धा नसायची. दहा पैकी एका कडे देखील नसायची. आता जी सर्वेक्षणे आली आहेत, त्यानुसार आता गावात राहणाऱ्या जवळ-जवळ निम्म्या कुटुंबांकडे दुचाकी किंवा कार असते. इतकेच नाही मोबाईल फोन तर जवळजवळ प्रत्येक घरात पोहोचले आहेत. फ्रीज सारख्या गोष्टी, ज्या पूर्वी चैनीच्या मानल्या जात होत्या, आता त्या आपल्या नव-मध्यमवर्गाच्या घरांमध्येही दिसू लागल्या आहेत. आज गावांतील स्वयंपाकघरातही त्यांचे स्थान निर्माण झाले आहे. नव्या आकडेवारी सांगतात की, स्मार्टफोन असूनही, गावात दूरचित्रवाणी संच ठेवण्याचा कल वाढतो आहे. हा बदल आपोआप झाला नाही. हा बदल यामुळे झाला आहे कारण आज देशातील गरीब सक्षम होत आहे, दुर्गम भागात राहणाऱ्या गरिबांपर्यंतही विकासाचा लाभ पोहोचू लागला आहे.

मित्रांनो,

भाजपचे डबल इंजिन सरकार हे गरीब, आदिवासी, युवा आणि महिलांचे सरकार आहे. म्हणूनच आमचे सरकार आसाम आणि ईशान्येतील दशकांची हिंसा संपवण्याचे काम करते आहे. आमच्या सरकारने नेहमीच आसामची ओळख आणि आसामच्या संस्कृतीला सर्वोच्च स्थान दिले आहे. भाजपा सरकार आसामी अभिमानाची प्रतीके प्रत्येक व्यासपीठावर अधोरेखित करते. म्हणूनच, आम्ही अभिमानाने महावीर लसित बोरफुकन यांचा 125 फुटांचा पुतळा उभारतो, आम्ही आसामचे भूषण भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष साजरे करतो. आम्ही आसामची कला आणि शिल्पांना, आसामच्या गोमोशाला जगात ओळख मिळवून देतो, आता काही दिवसांपूर्वीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष श्रीमान पुतीन येथे आले होते, जेव्हा ते दिल्लीत आले, तेव्हा मी मोठ्या अभिमानाने त्यांना आसामचा काळा चहा भेट दिला होता. आम्ही आसामची मान सन्मान वाढवणाऱ्या प्रत्येक कामाला प्राधान्य देतो.

पण बंधू भगिनींनो, भाजप जेव्हा हे काम करते तेव्हा सर्वात जास्त त्रास काँग्रेसला होतो. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आमच्या सरकारने भूपेनदांना भारतरत्न दिले होते, तेव्हा काँग्रेसने उघडपणे त्याचा विरोध केला होता. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले होते की, मोदी नाचणाऱ्या-गाणाऱ्यांना भारतरत्न देत आहेत. मला सांगा, हा भूपेनदांचा अपमान आहे की नाही? कला संस्कृतीचा अपमान आहे की नाही? आसामचा अपमान आहे की नाही? ही काँग्रेस रात्रंदिवस अपमान करण्याचेच काम करते. आम्ही आसाममध्ये अर्धसंवाहक घटक (Semiconductor Unit) लावले, तरीही काँग्रेसने त्याला विरोध केला. तुम्ही विसरू नका, हेच काँग्रेस सरकार होते, ज्याने इतकी दशके चहाशी जोडलेल्या समुदायातील बंधु भगिनींना जमिनीचे अधिकार मिळू दिले नाहीत! भाजपाच्या सरकारने त्यांना जमिनीचे अधिकारही दिले आणि सन्मानजनक जीवनही दिले. आणि मी तर चहावाला आहे, मी नाही करणार तर कोण करणार? ही काँग्रेस आजही देशविरोधी विचार पुढे नेत आहे. हे लोक आसामच्या जंगलात आणि जमिनीवर त्या बांगलादेशी घुसखोरांना वसवू इच्छितात, ज्यांच्यामुळे त्यांची मतपेढी मजबूत होते. तुम्ही उद्ध्वस्त झालात, त्यांना त्याची पर्वा नाही, त्यांना आपली मतपेढी मजबूत करायची आहे.

बंधू भगिनींनो,

काँग्रेसला आसाम आणि आसामच्या लोकांशी, तुमच्या ओळखीशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ सत्ता, सरकार आणि मग जे काम पूर्वी करायचे, ते करण्यात रस आहे. म्हणूनच, त्यांना बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर जास्त चांगले वाटतात. बेकायदेशीर घुसखोरांना काँग्रेसनेच वसवले आणि काँग्रेसच त्यांना वाचवत आहे. म्हणूनच, काँग्रेस पक्ष मतदार यादीच्या शुद्धीकरणाला विरोध करत आहे. लांगूलचालन आणि मतपेढीच्या या काँग्रेसी विषापासून आपल्याला आसामला वाचवायचे आहे. मी आज तुम्हाला एक हमी देतो, आसामची ओळख आणि आसामच्या सन्मानाच्या रक्षणासाठी भाजपा पोलाद बनून तुमच्या सोबत उभी आहे.

मित्रांनो,

विकसित भारताच्या निर्माणात तुमचे हे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. तुमचे हे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक क्षण तुमच्यासाठी जगण्यात मला आनंद मिळतो. विकसित भारताच्या निर्माणात पूर्व भारताची, आमच्या ईशान्य भारताची भूमिका सातत्याने वाढते आहे. मी याआधीही म्हटले आहे की पूर्व भारत हा भारताच्या विकासाचे प्रगतीचे इंजिन बनेल. नामरूपमधील हे नवे युनिट याच बदलाचे उदाहरण आहे. येथे जे खत तयार होईल, ते फक्त आसामच्या शेतांपर्यंतच मर्यादित राहणार नाही. ते बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचेल. ही काही छोटी गोष्ट नाही. ही देशाच्या खताच्या गरजेमधील ईशान्येची भागीदारी आहे. नामरूपसारखे प्रकल्प हे दाखवून देतात की, आगामी काळात ईशान्य भारत हा आत्मनिर्भर भारताचे खूप मोठे केंद्र म्हणून उदयाला येईल. खऱ्या अर्थाने अष्टलक्ष्मी बनूनच राहील. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे नव्या खत कारखान्याबद्दल अभिनंदन करतो. माझ्यासोबत बोला-

भारत माता की जय.

भारत माता की जय.

आणि या वर्षी तर वंदे मातरम् ची 150 वर्षे हा आपला गौरवशाली क्षण आहे, चला आपण सर्वजण बोलू या:

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

वंदे मातरम्।

* * *

नितीन फुल्लुके/गजेंद्र देवडा/मंजिरी गानू /तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2207420) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Kannada