पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

प्रविष्टि तिथि: 18 DEC 2025 2:45PM by PIB Mumbai

 

नमस्ते!

अहलन वा सहलन !!!

तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना  सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.

मित्रांनो,

मी आता माझ्या समोर एक मिनी भारत पाहत आहे. मला वाटते, इथे खूप संख्येने मल्याळी भाषिक देखील आले आहेत.

सुखम आणो?

आणि फक्त मल्याळी नव्हे तर इथे खूप संख्येने तामिळ, तेलगू , कन्नड व गुजराती भाषिक देखील खूप आहेत.

नलमा?

बागुन्नारा?

चेन्ना-गिद्दिरा?

केम छो?

मित्रांनो,

आज इथे आपण सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आलो आहोत. आज आपण आपल्या देशाला, आपल्या टीम इंडियाला सेलिब्रेट करत आहोत.

मित्रांनो,

भारतात आपली विविधता आपल्या संस्कृतीचा बळकट आधार आहे. प्रत्येक दिवस आपल्या जीवनात नवा रंग भरतोप्रत्येक ऋतू एक नवा उत्सव बनतो. प्रत्येक परंपरेतून एक नवा विचार पुढे येतो.

म्हणूनच आपण भारतीय जिथे जातो तिथे विविधतेचा आदर करतो. तिथल्या स्थानिक संस्कृती आणि परंपरांशी  आपण सहद जुळवून घेतो. ओमानमध्येही मी आज हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर होताना पाहत आहे.

येथील भारतीय समुदाय सहजीवनाचे, सहकार्याचे जिवंत उदाहरण आहे.

मित्रांनो,

भारताची हीच समृद्ध सांस्कृतिक परंपरा नुकतीच सन्मानित झाली आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल की युनेस्को ने दिवाळी या सणाला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे.

आता दिवाळीच्या दिव्यांमुळे फक्त आपलीच घरे नव्हेत तर सर्व जगामध्ये प्रकाश पसरेल. जगभरात स्थायिक झालेल्या प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा विषय आहे. दिवाळी सणाची ही वैश्विक ओळख म्हणजे आपल्या आशा, सद्भाव आणि मानवतेच्या संदेशाला, त्याच्या प्रकाशाला सर्व जगात पसरवत आहे.

मित्रांनो,

आज आपण सर्वजण इथे भारत ओमान मैत्री पर्व साजरे करत आहोत.

मैत्री म्हणजे :

M वरून  सागरी वारसा

A वरून आकांक्षा

I वरून नवोन्मेष

T वरून विश्वास आणि तंत्रज्ञान

R वरून परस्पर आदर

I वरून समावेशक विकास

 हे मैत्री पर्व म्हणजे आपल्या दोन्ही देशांची मैत्री, आपला सामायिक इतिहास, आणि समृद्ध भविष्यकाळाचा उत्सव आहे. भारत आणि ओमान दरम्यान अनेक शतकांपासून एक अतिशय जवळचे व जिवंत नाते आहे.

हिंदी महासागरातील पावसाळी वाऱ्यांमुळे दोन्ही देशांमधील व्यापाराला दिशा दिली आहे. आपले पूर्वज लोथल, मांडावी व ताम्रलिप्ती सारख्या अनेक बंदरांमधून लाकडी जहाजे घेऊन मस्कत, सूर आणि सलालाह पर्यंत येत असत. 

आणि मित्रांनो,

मांडावी ते मस्कत च्या या ऐतिहासिक संबंधांना आपल्या दूतावासाने प्रकाशित केलेल्या एका पुस्तकात दर्शवले आहे, याचा मला आनंद आहे. इथे राहणाऱ्या आमच्या प्रत्येक मित्राने, प्रत्येक युवकाने हे पुस्तक वाचावे, आपल्या ओमानी मित्रांना ते भेट देखील द्यावे असे आवाहन मी करतो आहे.

आता तुम्हाला वाटेल कि शाळेत जसे शिक्षक गृहपाठ देतात तसा  मोदीजींनीही गृहपाठ दिला आहे.

मित्रांनो,

भारत व ओमान चे संबंध फक्त भौगोलिक दृष्ट्याच नव्हे तर पिढ्यांपिढ्यांपासून जवळचे आहेत, असे या पुस्तकात म्हटले आहे. आणि आता आपण सर्वजण या शतकानुशतकांपासूनच्या या संबंधांचे रक्षणकर्ते आहोत. 

मित्रांनो,

भारताला जाणून घ्या या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ओमानच्या सहभागाबद्दल मला माहिती मिळाली आहे. ओमानमधून 10 हजाराहून अधिक लोकांनी या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. जगभरातून ओमान चौथ्या क्रमांकावर आहे.

परंतु मी यासाठी टाळ्या नाही वाजवणार, ओमानने  तर प्रथम क्रमांकावर यायला हवे होते! ओमानच्या आमच्याशी भागीदारीत अधिकाधिक वाढ व्हावी, जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे. मुलांनी तर यात नक्की भाग घ्यावा. आपल्या ओमानी मित्रांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या.

 मित्रांनो,

भारत आणि ओमानमध्ये जे संबंध व्यापारामुळे बनले होते, त्यांना आज शिक्षणामुळे बळ मिळत आहे. मला माहिती मिळाली आहे, कि इथल्या भारतीय शाळांमधून जवळजवळ 46 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, ओमानमध्ये राहणाऱ्या अनेक समुदायांची हजारो मुले देखील या शाळांमध्ये शिकत आहेत.

ओमानमध्ये भारतीय शाळांना 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांमधील हा एक महत्वाचा टप्पा आहे.

मित्रांनो,

महामहिम स्वर्गीय सुलतान काबूस यांच्या प्रयत्नांविना भारतीय शाळांना इतके यश मिळू शकले नसते. त्यांनी मस्कतच्या इंडियन स्कुल सहित अनेक भारतीय शाळांना जमीन मिळवून दिली, इतरही बरीच महत्वाची मदत दिली. याच परंपरेला महामहिम सुलतान हॅथम यांनी पुढे चालवले.

त्यांनी इथल्या भारतीयांना केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे विशेषरूपाने आभार व्यक्त करतो.

मित्रांनो,

परीक्षा पे चर्चाया कार्यक्रमाबद्दल आपण सर्वांना माहितीच आहे. इथले ओमानचे अनेक विद्यार्थीदेखील  यात सहभागी होतात. या चर्चेचा आपल्याला उपयोग होत असेल याची मला खात्री आहे. पालक असोत वा विद्यार्थी, सर्वांनाच तणावमुक्त पद्धतीने परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आपल्या चर्चेमुळे खूप मदत मिळत असेल.

मित्रांनो,

ओमानमध्ये राहणारे भारतीय बरेच वेळा भारतात येत जात असतात. भारतातील प्रत्येक घडामोडीची माहिती घेत असतात. आपण सर्वजण आज पाहत आहात कि आपला भारत कसा प्रगतीच्या नव्या गतीने पुढे जात आहे. भारताचा वेग आपल्या निश्चयातून दिसून येतो, आपल्या कामगिरीतून दिसून येतो.

नुकतेच आर्थिक प्रगतीची आकडेवारी मिळाली आहे. आणि आपणाला कळले असेलच कि भारताच्या वाढीचा वेग  8 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच भारत आता सातत्याने जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आणि हे तेव्हा घडत आहे, जेव्हा सर्व जगाला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. जगभरातील मोठमोठ्या अर्थव्यवस्था जिथे काही टक्के वाढ नोंदवण्यासाठी धडपडत आहेत, तिथे भारत मात्र सातत्याने उच्च वाढ नोंदवत आहे. भारताचे सामर्थ्य यातून दिसून येते.

मित्रांनो,

भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व गतीने काम करत आहे. आज मी आपल्यासमोर गेल्या 11 वर्षांची आकडेवारी ठेवत आहे. ती ऐकून आपल्याला निश्चितच अभिमान वाटेल.

आज इथे मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी आले आहेत, त्यामुळे मी आधी शिक्षण आणि कौशल्य क्षेत्राबद्दल बोलेन. गेल्या 11 वर्षांमध्ये भारतात हजारो नवीन महाविद्यालये सुरु झाली आहेत.

आयआयटी ज  ची संख्या 16 वरून वाढून 23 झाली आहे. 11 वर्षांपूर्वी भारतात 13 आयआयएम होते आता 21 आहेत. याच पद्धतीने एम्स बद्दल बोलायचे झाले, तर 2014 च्या आधी फक्त 7 एम्स होते. आज भारतात 22 एम्स आहेत.

वैद्यकीय महाविद्यालये 400 हुन कमी होती, आज भारतात सुमारे 800 वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

मित्रांनो,

आज आपण विकसित भारतासाठी आपली शैक्षणिक व कौशल्य परिसंस्था तयार करत आहोत. नवीन शैक्षणिक धोरणाची यात खूप मोठी भूमिका आहे. या धोरणाचे  प्रारूप म्हणून 14 हजाराहून जास्त पीएम श्री विद्यालये सुरु केली जात आहेत. 

मित्रांनो,

जेव्हा शाळांची, महाविद्यालयांची , विद्यापीठांची  संख्या वाढते, तेव्हा फक्त इमारती तयार होत नाहीत, तर देशाचे भवितव्य मजबूत होत असते.

मित्रांनो,

भारताच्या विकासाचा वेग आणि आवाका शिक्षणासोबतच अन्य क्षेत्रांमध्येही दिसून येतो. गेल्या 11 वर्षांत आपली सौरऊर्जा स्थापित क्षमता 30 पटींनी वाढली आहे, सोलर मोड्यूल उत्पादन 10 पटींनी वाढली आहे, म्हणजेच भारत आता हरित विकासाच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे.

आज भारत जगातील सर्वात मोठी फिनटेक परिसंस्था बनला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक बनला आहे, दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक आहे.

मित्रांनो,,

आज जो कोणी भारतात येतो, तो आपल्या आधुनिक पायाभूत सुविधा पाहून आश्चर्यचकित होतो. हे शक्य झाले, कारण आपण गेल्या 11 वर्षांत पायाभूत सुविधांवर पाच पट जास्त गुंतवणूक केली आहे.

विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वेगाने आज महामार्ग बांधले जात आहेत, रेल्वे मार्ग वेगाने टाकले जात आहेत, रेल्वेचे विद्युतीकरण केले जात आहे.

मित्रहो,

हे आकडे केवळ यशाचे नाहीत, तर विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने टाकलेली पावले आहेत. 21 व्या शतकातील भारत मोठमोठे निर्णय घेतो. झटपट निर्णय घेतो, मोठी उद्दिष्टे घेऊन पुढे जातो आणि निश्चित वेळेत निकाल दिल्यावरच तो श्वास घेतो.

मित्रहो,

अभिमान वाटण्याजोगी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आज भारत जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. भारताची युुपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस ही जगातील सर्वात मोठी रियल टाइम डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. या पेमेंट प्रणालीच्या व्याप्तीची कल्पना देण्यासाठी, मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो. मला इथे येऊन सुमारे 30 मिनिटे झाली आहेत. या 30 मिनिटांत, भारतात युपीआयद्वारे चौदा दशलक्ष रिअल-टाइम डिजिटल पेमेंट झाले आहेत. या व्यवहारांचे एकूण मूल्य वीस अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतातील सर्वात मोठ्या शोरूमपासून ते छोट्या विक्रेत्यापर्यंत प्रत्येकजण या पेमेंट प्रणालीशी जोडला गेला आहे.

 

मित्रहो,

इथे अनेक विद्यार्थी आहेत. मी आपल्याला आणखी एक गमतीशीर उदाहरण देतो. भारताने आधुनिक डिजिलॉकर प्रणाली विकसित केली आहे. जेव्हा भारतात बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात, तेव्हा गुणपत्रिक थेट विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकर खात्यात जमा होतात. जन्मापासून, ते  वृद्धापकाळापर्यंत, सरकारने तयार केलेले कोणतेही दस्त ऐवज, डिजीलॉकरमध्ये जमा करता येतात. अशा अनेक डिजिटल प्रणाली आज भारतात जीवन सुलभता सुनिश्चित करत आहेत.

मित्रहो,

तुम्ही भारताच्या चांद्रयानाने केलेली कमाल देखील पाहिली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. इतकेच नाही, तर आपण एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रमही केला आहे.

आता भारत आपल्या गगनयानातून पहिली मानवी अंतराळ मोहीमही पाठवणार आहे. आणि तो काळ फार दूर नाही, जेव्हा अंतराळात भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानकही असेल.

मित्रहो,

भारताचा अंतराळ कार्यक्रम केवळ स्वतःपुरता मर्यादित नाही तर आम्ही ओमानच्या अंतराळ आकांक्षांनाही पाठबळ देत आहोत. आम्ही 6-7 वर्षांपूर्वी अंतराळ सहकार्याबाबत एक करार केला होता. मला हे सांगताना आनंद होत आहे की इस्रोने भारत-ओमान अंतराळ पोर्टल विकसित केले आहे. आता आमचा प्रयत्न आहे, की ओमानच्या तरुणांनाही या अंतराळ भागीदारीचा लाभ मिळावा.

इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना मी आणखी एक माहिती देईन. इस्रो, युविकानावाचा एक विशेष कार्यक्रम राबवते. या कार्यक्रमाद्वारे हजारो भारतीय विद्यार्थी अंतराळ विज्ञानाशी जोडले गेले आहेत, आता आम्ही या कार्यक्रमात ओमानी विद्यार्थ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहोत. ओमानमधील काही विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्रो केंद्रात येऊन तिथे थोडा वेळ व्यतीत करावा, अशी माझी इच्छा आहे. ओमानच्या तरुणांच्या अंतराळ आकांक्षांना नवीन उंची देण्यासाठी ही एक उत्तम सुरुवात असू शकते.

मित्रहो,

आज, भारत केवळ आपल्या समस्यांवर उपाय शोधत नाही तर जगभरातील लाखो लोकांचे जीवन कसे सुधारता येईल, यावरही काम करत आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपासून ते पेरोल व्यवस्थापनापर्यंत, डेटा विश्लेषणापासून ते ग्राहक समर्थनापर्यंत, अनेक जागतिक ब्रँड भारतीय प्रतिभेच्या बळावर पुढे जात आहेत.

अनेक दशकांपासून, भारत माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवांचे जागतिक उर्जाकेंद्र आहे. आता आपण उत्पादनाला माहिती तंत्रज्ञानाच्या शक्तीची जोड देत होत. आणि यामागील कल्पना वसुधैव कुटुंबकम या तत्वाने प्रेरित आहे, म्हणजेच मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड.

मित्रहो,

लस असो, की जेनेरिक औषधे, जग आपल्याला जगाची फार्मसी म्हणते. याचा अर्थ असा, की भारतातील परवडणारे आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपाय जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचवत आहेत.

कोविडच्या काळात भारताने जगभरात सुमारे 30 कोटी लसी पाठवल्या होत्या. ओमानच्या लोकांना सुमारे एक लाख मेड इन इंडिया कोविड लसी उपयोगी पडल्याचे मला समाधान आहे.

मित्रहो,

लक्षात ठेवा, जेव्हा प्रत्येकजण स्वतःचा विचार करत होता, तेव्हा भारताने हे काम केले. त्यावेळी आम्ही जगाची काळजी घेतली. भारताने देखील आपल्या 140 कोटी नागरिकांचे विक्रमी वेळेत लसीकरण केले आणि जगाच्या गरजाही पूर्ण केल्या.

हे भारताचे मॉडेल आहे, एकविसाव्या शतकातील जगाला नवी आशा देणारे मॉडेल आहे. म्हणूनच, आज जेव्हा भारत मेड इन इंडिया चिप्स बनवत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कंप्युटिंग आणि हरित हायड्रोजन यावर मिशन मोडवर काम करत आहे, तेव्हा जगातील इतर देशांनाही आशा आहे की भारताच्या या यशामुळे त्यांना देखील सहकार्य मिळेल.

मित्रहो,

तुम्ही ओमानमध्ये शिक्षण घेत आहात आणि काम करत आहात. भविष्यात, तुम्ही ओमान आणि भारताच्या विकासात मोठी भूमिका बजावाल. जगाला नेतृत्व देणारी तुमची पिढी आहे.

ओमानमध्ये राहणाऱ्या भारतीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ओमान सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे.

भारत सरकार तुमच्या सोयीची पूर्ण काळजी घेत आहे. संपूर्ण ओमानमध्ये अकरा कॉन्सुलर सेवा केंद्रे उघडण्यात आली आहेत.

मित्रहो,

गेल्या दशकात आलेल्या सर्व जागतिक संकटांमध्ये, आमच्या सरकारने भारतीयांना त्वरित मदत केली आहे. भारतीय जगात कुठेही राहिले तरी आमचे सरकार प्रत्येक पावलावर त्यांना साथ देत आहे. यासाठी भारतीय समुदाय कल्याण निधी, मदद पोर्टल आणि प्रवासी भारतीय विमा योजना यासारखे प्रयत्न केले आहेत.

मित्रहो,

हा संपूर्ण प्रदेश भारतासाठी खूप खास आहे आणि ओमान आमच्यासाठी त्याहूनही खास आहे. भारत-ओमान संबंध आता कौशल्य विकास, डिजिटल शिक्षण, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आणि उद्योजकतेपर्यंत पोहोचत आहेत याचा मला आनंद आहे. मला खात्री आहे की तुमच्यामधून असे तरुण नवोन्मेषक उदयाला येतील जे येत्या काळात भारत-ओमान संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जातील. इथल्या भारतीय शाळांनी नुकतीच आपली 50 वर्षे साजरी केली. आता आपल्याला पुढील 50 वर्षांसाठी ध्येय निश्चित करून पुढे जायचे आहे. म्हणून, मी प्रत्येक तरुणाला सांगेन:

मोठी स्वप्ने पहा.

सखोल माहिती घ्या.

धाडसाने नवोन्मेष करा.

कारण तुमचे भविष्य हे केवळ तुमचे नाही, तर संपूर्ण मानव जातीचे भविष्य आहे.

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.

धन्यवाद!

धन्यवाद!

***

नेहा कुलकर्णी/उमा रायकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206514) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam