पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल 'टीम इस्रो'ला संबोधित करताना, पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

प्रविष्टि तिथि: 26 AUG 2023 11:13AM by PIB Mumbai

नमस्कार मित्रहो,

तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन आज एक वेगळाच आनंद अनुभवत आहे. कदाचित असा आनंद खूप अपवादात्मक प्रसंगांमध्येच होतो.  जेव्हा तन मन आनंदाने भारून गेलेले असते,  आणि व्यक्तीच्या जीवनात अनेकदा अशा घटना घडतात की, त्यावर अधीरता स्वार होते. यावेळेस माझ्यासोबतही असेच झाले आहे, इतकी अधीरता. मी दक्षिण आफ्रिकेत होतो, नंतर ग्रीसचा कार्यक्रम होता, तिथे गेलो, पण माझे मनाला पूर्णतः  तुमचीच ओढ लागली होती. पण कधीकधी वाटते की, मी तुमच्यावर अन्याय करतो. अधीरता माझी आणि अडचण तुमची. इतक्या सकाळी-सकाळी तुम्हा सर्वांना, आणि इतका वेळ, पण बास, मन करत होते, जाऊ आणि तुम्हाला वंदन करू. तुम्हाला अडचण झाली असेल, पण मी भारतात येताच लवकरात लवकर तुमचे दर्शन घेऊ इच्छित होतो. तुम्हा सगळ्यांना अभिवादन करू इच्छित होतो. अभिवादन तुमच्या मेहनतीला, अभिवादन तुमच्या धैर्याला, अभिवादन तुमच्या निष्ठेला, अभिवादन तुमच्या चैतन्यमयतेला, अभिवादन तुमच्या जिद्दीला. तुम्ही देशाला ज्या उंचीवर घेऊन गेला आहात, हे काही सामान्य यश नाही. हे विशाल अंतराळातील भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा शंखनाद आहे.

India is on the Moon. We have our national pride placed on the Moon. आपण तिथे पोहोचलो, जिथे कोणी पोहोचले नव्हते. आपण ते केले जे यापूर्वी कधीही कोणी केले नव्हते. हा आजचा भारत आहे, निर्भीड भारत, झुंजार भारत. हा असा भारत आहे, जो नवीन विचार करतो, नव्या पद्धतीने विचार करतो. जो अंधाऱ्या क्षेत्रात जाऊनही जगभरात प्रकाशाची किरणे पोहोचवतो. 21 व्या शतकात हाच भारत जगातील मोठ्या-मोठ्या समस्या सोडवेल. माझ्या डोळ्यांसमोर 23 ऑगस्टचा तो दिवस, तो एक-एक सेकंद, सतत सतत येतो आहे.  जेव्हा  टच डाउन निश्चित झाले, तेव्हा ज्या प्रकारे येथे इस्रोच्या केंद्रात, संपूर्ण देशात लोक आनंदाने उड्या मारत होते, असे दृश्य कोण विसरू शकेल, काही स्मृती अमर होतात. तो क्षण अमर झाला, तो क्षण या शतकातील सर्वात प्रेरणादायी क्षणांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीयाला वाटत होते की, विजय त्याचा स्वतःचा आहे. स्वतः अनुभवत होते. प्रत्येक भारतीयाला वाटत होते की, जणू तो स्वतः एका मोठ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. आजही अभिनंदन केले जात आहे, संदेश दिले जात आहेत, आणि हे सर्व शक्य केले आहे, तुम्हा सर्वांनी, तुम्ही. देशाच्या माझ्या वैज्ञानिकांनी हे शक्य केले आहे. मी तुमचे जितके कौतुक करेन, तितके कमी आहे, मी तुमची जितकी प्रशंसा करेन, तितकी ती कमी आहे.

मित्रहो,

मी तो फोटो पाहिला, ज्यात आमच्या Moon Lander ने अंगदा प्रमाणेच चंद्रावर आपला पाय भक्कमपणे रोवला आहे. एका बाजूला विक्रमचा विश्वास आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. आपले प्रज्ञान सतत चंद्रावर आपल्या पाऊलखुणा सोडत आहे. वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी घेतलेल्या ज्या प्रतिमा नुकत्याच प्रकाशित झाल्या, आणि त्या पाहण्याचे मला भाग्य लाभले आहे, त्या अद्भुत आहेत. मानवी संस्कृतीत पहिल्यांदा, पृथ्वीच्या लाखो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा, त्या ठिकाणची प्रतिमा मानवाने आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि ही प्रतिमा जगाला दाखवण्याचे काम भारताने केले आहे, तुम्हा सर्व वैज्ञानिकांनी केले आहे. आज संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिक वृत्तीचा, आपल्या तंत्रज्ञानाचा आणि आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. चांद्रयान मोहीम केवळ भारताचीच नाही, तर संपूर्ण मानवतेचे यश आहे. आपल्या मोहिमेअंतर्गत ज्या क्षेत्राचा अभ्यास केला जाईल, त्यामुळे सर्व देशांसाठी भविष्यातील मोहिमांसाठी नवे मार्ग खुले होतील. हे चंद्राचे रहस्य तर उलगडेलच, त्यासोबतच  पृथ्वीवरील आव्हानांवर मात करण्यातही मदतीचे ठरेल. तुमच्या या यशाबद्दल मी पुन्हा एकदा सर्व वैज्ञानिकांना, तंत्रज्ञ, अभियंते आणि चंद्रयान महाअभियानाशी जोडलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

तुम्हाला ठाऊकच आहे की, अवकाश मोहिमांच्या touchdown ठिकाणाला एक नाव देण्याची वैज्ञानिक परंपरा आहे. चंद्राच्या ज्या भागावर आपले चंद्रयान उतरले आहे, भारताने त्या ठिकाणाचेही नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी चंद्रयान-3 चे Moon Lander उतरले आहे, आता त्या ठिकाणाला, शिवशक्ती या नावाने ओळखले जाईल. शिव मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प अंतर्भूत आहे आणि शक्ती मधून आपल्याला त्या संकल्पांना पूर्ण करण्याचे सामर्थ्य मिळते. चंद्रावरचे शिवशक्ती केंद्र, हिमालय  कन्याकुमारीशी जोडले असल्याची भावना निर्माण करते. आपल्या ऋषींनी म्हटलेच आहे - येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीराः। यदपूर्व यक्षमन्तः प्रजानां तन्मे मनः शिव-संकल्पमस्तु। म्हणजेच, ज्या मनाने आपण कर्तव्य-कर्म करतो, कल्पना आणि विज्ञानाला गती देतो, आणि जे प्रत्येकात सामावलेले आहे, ते मन शुभ आणि कल्याणकारी संकल्पांशी जोडले जावे. मनाच्या या शुभ संकल्पांना पूर्ण करण्यासाठी शक्तीचा आशीर्वाद अनिवार्य आहे. आणि ही शक्ती आपली महिला शक्ती आहे. आपल्या माता भगिनी आहेत. आपल्याकडे म्हटलेलेच आहे - सृष्टि स्थिति विनाशानां शक्तिभूते सनातनि। म्हणजेच, निर्मितीपासून प्रलयापर्यंत, संपूर्ण सृष्टीचा आधार महिला शक्तीच आहे. तुम्हा सगळ्यांनी पाहिलेच आहे, चंद्रयान 3 मध्ये देशाच्या आपल्या महिला वैज्ञानिकांनी, देशाच्या महिला शक्तीने किती मोठी भूमिका बजावली आहे. चंद्रावरचे शिवशक्ती पॉइंट, शतकानुशतके भारताच्या या तत्वज्ञानाधारीत विचारांची साक्षीदार बनेल. हा शिवशक्ती पॉइंट, भावी पिढ्यांना प्रेरणा देईल की, आपल्याला विज्ञानाचा उपयोग, मानवतेच्या कल्याणासाठीच करायचा आहे. मानवतेचे कल्याण, हीच आपली सर्वोच्च बांधिलकी आहे.

मित्रहो,

एक आणखी नामकरण बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रयान-2 चंद्राजवळ पोहोचले होते, जिथे त्याच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या, तेव्हा हा प्रस्ताव होता की, त्या ठिकाणाचे नाव निश्चित करावे. पण त्या परिस्थितीत निर्णय घेण्याऐवजी, आम्ही प्रण केला होता की, जेव्हा चंद्रयान-3, यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचेल, तेव्हा आम्ही दोन्ही ठिकाणांची नावे एकाच वेळी ठेवू. आणि आज मला वाटते की, जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा आहे, आता जर प्रत्येक मनात तिरंगा आहे, आणि चंद्रावरही तिरंगा आहे, तर तिरंगा याशिवाय, चंद्रयान 2 शी जोडलेल्या त्या ठिकाणाला दुसरे काय नाव दिले जाऊ शकते? म्हणून, चंद्राच्या ज्या भागावार चंद्रयान 2 ने आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत, ते ठिकाण आता तिरंगा म्हणून ओळखला जाईल. हा तिरंगा पॉइंट, भारताच्या प्रत्येक प्रयत्नांमागची प्रेरणा बनेल. हा तिरंगा पॉइंट, आपल्याला शिकवण देईल की, कोणतेही अपयश अखेर नसते, जर दृढ इच्छाशक्ती असेल तर यश मिळतेच मिळते. म्हणजेच, मी पुन्हा एकदा सांगतो. चंद्रयान 2 च्या पाऊलखुणा जिथे आहेत, ते ठिकाण आजपासून तिरंगा पॉईंट  म्हणून ओळखले जाईल. आणि जिथे चंद्रयान 3 चे Moon Lander उतरले, ते ठिकाण, आजपासून शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाईल.

मित्रहो,

आज भारत जगातील चौथा असा देश बनला आहे, ज्याने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला आहे. हे यश अशावेळी आणखी मोठे होते, जेव्हा आपण हे पाहतो की भारताने आपला प्रवास कुठपासून सुरू केला होता. एक काळ होता, जेव्हा भारताकडे आवश्यक तंत्रज्ञान नव्हते, सहकार्यही नव्हते. आपली गणना तिसऱ्या जगातील म्हणजे तिसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत होती. तिथून बाहेर पडत आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत, भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. म्हणजेच तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या वाटचालीत आपल्या इस्रो सारख्या संस्थांची खूप मोठी भूमिका राहिली आहे. तुम्ही आज Make in India ला चंद्रापर्यंत पोहोचवले आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

मी आज तुमच्यामध्ये येऊन विशेषत्वाने देशवासीयांना तुमच्या मेहनतीबद्दल सांगू इच्छितो. ज्या गोष्टी मी सांगतो आहे, त्या तुमच्यासाठी नवीन नाहीयेत. पण तुम्ही जे केले आहे, जी साधना केली आहे, ती देशवासीयांनाही माहित असायला हवी. भारताच्या दक्षिण भागातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत चंद्रयानचा हा प्रवास सोपा नव्हता. Moon Lander चे Soft Landing सुनिश्चित करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांनी इस्रोच्या संशोधन केंद्रात कृत्रिम चंद्र देखील बनवला. या कृत्रिम चंद्रावर विक्रम लँडरला गवेगळ्या स्वरुपाच्या पृष्ठभागांवर उतरवून त्याची चाचणी करण्यात आली होती. आता इतक्या सार्‍या परीक्षा दिल्यानंतर आपला Moon Lander तिथे पोहचला आहे, अशावेळी त्याला यश मिळणे स्वाभाविकच होते.

मित्रहो,

आज भारताच्या युवा पिढीमध्ये, विज्ञान, अंतराळ, नवोन्मेष यासंदर्भात अमाप उत्साह मी पाहतो, तेव्हा त्यामागे आपल्या अशाच अंतराळ मोहिमांचे यश आहे. मंगळयानाचे यश, चांद्रयानाचे यश, गगनयानाची तयारी यांनी देशाच्या युवा पिढीला अभिमानाची नवी भावना दिली आहे. आज भारताच्या लहान-लहान मुलांच्या ओठावर चांद्रयानचे नाव आहे. भारतातले प्रत्येक मूल वैज्ञानिकांमध्ये आपले भविष्य पहात आहे, म्हणूनच आपण चंद्रावर तिरंगा फडकवला, या यशाबरोबरच आपण आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे, ते म्हणजे भारताच्या अवघ्या पिढीला जागृत करण्याचे, त्यांना नवी उर्जा देण्याचे. आपण संपूर्ण पिढीवर आपल्या यशाचा अमिट ठसा निर्माण केला आहे. आजपासून कोणतेही मूल रात्रीच्या आकाशात चंद्र पाहिल, तेव्हा ज्या उमेदीने आपला  देश चंद्रावर पोहोचला आहे तीच उमेद, तीच भावना, त्या मुलाच्या मनात असेल, त्या युवकांमध्ये असेल, याचा विश्वास आहे. आज भारताच्या बालकांमध्ये आपण आकांक्षांचे बीज रोवले आहे, उद्या त्याचे वटवृक्षात रुपांतर होईल आणि विकसित भारताचा तो पाया बनेल.

आपल्या युवा पिढीला अखंड प्रेरणा मिळत राहावी, यासाठी आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. 23 ऑगस्टला भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला, तो दिवस हिंदुस्तानमध्ये आता राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाईल. देश आता दर वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष जोपासण्याच्या वृत्तीने साजरा करेल, तेव्हा हे यश आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.

माझ्या कुटुंबियांनो,

अंतराळ क्षेत्राचे सामर्थ्य हे उपग्रह प्रक्षेपित करण्यापेक्षा किंवा अंतराळाचा वेध घेण्याहून प्रचंड व्यापक आहे, हे आपणही जाणता. अंतराळ क्षेत्राचे एक मोठे सामर्थ्य आहे, जे मी पहात आहे ते म्हणजे जीवनमान सुलभता आणि प्रशासन सुलभता. आज देशात अंतराळ क्षेत्रातले संशोधन प्रशासनाच्या प्रत्येक पैलूशी जोडण्याच्या दिशेने मोठे काम झाले आहे. जनतेने, पंतप्रधान या नात्याने काम करण्याचे दायित्व माझ्याकडे सोपवले, तेव्हा भारत सरकारच्या सह सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांची, अंतराळ संशोधकांसमवेत मी एक कार्यशाळा आयोजित केली होती. प्रशासनात, शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी अंतराळ क्षेत्राच्या सामर्थ्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल, यावर विचार करण्याचा या कार्यशाळेचा उद्देश होता. तेव्हा बहुतेक किरण जी आमच्या समवेत काम करत होते. देशाने जेव्हा स्वच्छ भारत अभियान सुरु केले, स्वच्छतागृहे उभारण्याचे काम सुरु केले, कोट्यवधी घरे उभारण्याचे अभियान हाती घेतले, तेव्हा या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी, प्रगतीसाठी अंतराळ विज्ञानाने मोठी मदत केली. आज देशाच्या दुर्गम भागात शिक्षण, दळणवळण आणि आरोग्य सेवा पोहोचवण्यात अंतराळ क्षेत्राची मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये अमृत सरोवरे निर्माण केली जात आहेत. त्यांच्या टॅगिंगचे, देखरेखीचे कामही अंतराळ तंत्रज्ञान सहाय्यानेच केले जात आहे. अंतराळ तंत्रज्ञानावाचून आपण टेली मेडिसिन आणि टेली एज्युकेशन यांची कल्पनाही करू शकत नाही. देशाच्या स्रोतांचा सर्वोत्तम आणि पुरेपूर वापर करण्यातही अंतराळ तंत्रज्ञानाने आपल्याला मोठी मदत केली आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला बळ देण्यात, हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी अंतराळ क्षेत्राची मदत देशाचा प्रत्येक शेतकरी जाणतोच. पुढच्या आठवड्यात हवामान कसे असेल, हे तो आज आपल्या मोबाईलवर पाहतो. देशातल्या कोट्यवधी मच्छिमारांना ‘नाविक’ प्रणालीद्वारे जी अचूक माहिती मिळत आहे, त्यामागेही आपणा संशोधक वर्गाचेच योगदान आहे. देशात जेव्हा पूर येतात, एखादी नैसर्गिक आपत्ती येते, भूकंप होतो तेव्हा परिस्थितीची तीव्रता जाणण्यासाठी आपणच सर्वप्रथम पुढे येता. चक्रीवादळ येते तेव्हा आपले उपग्रह त्याचा मार्ग सांगतात, त्याची वेळ सांगतात. यामुळे लोकांचे प्राण वाचतात, संपत्तीची हानी टळते. अशी हानी टाळलेल्या संपत्तीची जर बेरीज केली तर आज अंतराळ क्षेत्रावर जो खर्च केला जात आहे, त्यापेक्षा ही रक्कम जास्त होईल. आपला पीएम गतीशक्ती बृहत आराखडाही अंतराळ तंत्रज्ञानावरच आधारित आहे. नियोजन आणि व्यवस्थापन यासाठी गतीशक्ती मंच किती उपयुक्त आहे, यासाठी आज भारताच्या या गतीशक्ती मंचाचा अभ्यास संपूर्ण जग करत आहे. प्रकल्पांचा आराखडा, अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी याची मोठी मदत होत आहे. काळानुसार अंतराळ क्षेत्राच्या सामर्थ्याचा वाढता उपयोग आपल्या युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करत आहे. म्हणूनच आज मी एक सुचवू इच्छितो आणि मला वाटते आपल्यापैकी जे निवृत्त झालेले लोक आहेत, ते यामध्ये मोठे सहाय्य करू शकतात. इतक्या सकाळी-सकाळी मोदी जी आले आणि काम देऊन जात आहेत असे म्हणू नका.

मित्रहो,

 इस्रो, केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकारे यांनी एकत्र येत ‘प्रशासनात अंतराळ तंत्रज्ञान’ यावर एक राष्ट्रीय हॅकेथॉन आयोजित करावे असे मी सुचवतो. या हॅकेथॉनमध्ये जास्तीत जास्त युवक, जास्तीत जास्त युवा शक्ती, जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे. हे राष्ट्रीय हॅकेथॉन आपले प्रशासन अधिक प्रभावी करेल, देशवासियांना आधुनिक उपाययोजना देईल याचा मला विश्वास आहे.

आणि मित्रहो,

तुमच्याशिवाय मी आपल्या युवा पिढीला आणखी एक काम देऊ इच्छितो. गृहपाठ दिल्यावाचून मुलांना काम करण्याचा आनंद मिळत नाही. आपल्या भारताने हजारो वर्षांपूर्वीच धरतीच्या कक्षेच्या बाहेर अंतराळाचा ठाव घेण्याला सुरवात केली होती, हे आपण सर्वजण जाणतोच. शतकांपासूनच्या  संशोधन परंपरेतले  आर्यभट्ट, ब्रम्हगुप्त, वराहमिहिर आणि भास्कराचार्य यासारख्या महान विभूती आपल्याला लाभल्या. पृथ्वीच्या आकाराबाबत जेव्हा संभ्रम होता तेव्हा आर्यभट्ट यांनी आर्यभटीय या आपल्या महान ग्रंथात पृथ्वी गोलाकार असल्याबाबत सविस्तर लिखाण केले होते.  अक्षाभोवती पृथ्वीचे भ्रमण याबाबतही त्यांनी लिहिले होते. अशाच प्रकारे सूर्य सिद्धांत यासारख्या ग्रंथातही  म्हटले  आहे - सर्वत्रैव महीगोले, स्वस्थानम् उपरि स्थितम्। मन्यन्ते खे यतो गोलस्, तस्य क्व ऊर्ध्वम क्व वाधः॥ म्हणजेच पृथ्वीवरचे काही लोक आपले स्थान सर्वात उच्च मानतात मात्र गोलाकार पृथ्वी आकाशात वसत असून त्यामध्ये वर आणि खाली कसे असू शकते ? हे त्या काळात लिहिले गेले होते. मी केवळ एका श्लोकाचा उल्लेख केला आहे. आपल्या पूर्वजांनी अशा अगणित रचना केल्या आहेत. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या मध्ये आल्याने निर्माण होणाऱ्या ग्रहण स्थितीची माहिती आपल्या अनेक ग्रंथांमध्ये आढळून येते. पृथ्वीशिवाय इतर ग्रहांच्या आकाराची गणना, त्यांची हालचाल याच्याशी संबंधित माहितीही आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येते. ग्रह आणि उपग्रह यांच्या गतीविषयी सूक्ष्म गणना करण्याची इतकी क्षमता आपण प्राप्त केली होती की आपल्या इथे शेकडो वर्ष पुढचे पंचाग म्हणजे दिनदर्शिका तयार केली जात असे. म्हणूनच याच्याशी संबंधित एक काम मी आपल्या नव्या पिढीला देऊ इच्छितो, शाळा-महाविद्यालयांमधल्या  विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. भारताच्या धर्मग्रंथांमध्ये खगोलशास्त्र विषयक जी सूत्रे आहेत, ती वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी नव्या पद्धतीने त्याचा अभ्यास करण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे. आपल्या वारश्यासाठीही हे आवश्यक आहे आणि विज्ञानासाठीही हे आवश्यक आहे. आज शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये जे विद्यार्थी आहेत, संशोधक आहेत त्यांच्यावर एक प्रकारे ही दुहेरी जबाबदारी आहे. भारताकडे विज्ञानाच्या ज्ञानाचा जो खजिना आहे  तो गुलामीच्या प्रदीर्घ कालखंडात दबला गेला, झाकोळला गेला. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात आपल्याला हा खजिना शोधून त्यावर संशोधन करायचे आहे आणि जगालाही सांगायचे आहे. दुसरी जबाबदारी आहे ती आपल्या युवा पिढीला आजचे आधुनिक विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा आयाम देण्याची. समुद्राच्या तळापासून ते आभाळापर्यंत आणि आभाळाच्या अथांगतेपासून ते अंतराळाच्या गहनतेपर्यंत आपल्याला करण्यासाठी खूप  कार्य आहे. आपण भूगर्भाचाही अभ्यास करा आणि त्याचबरोबर खोल समुद्राबाबतही संशोधन करू शकता. अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित संगणक तयार करा आणि त्याच्या जोडीने जेनेटिक इंजिनीयरिंगमधेही आपला ठसा उमटवा. भारतात आपल्यासाठी नव्या संधींची दालने सातत्याने खुली होत आहेत.  21 व्या  शतकाच्या या कालखंडात जो देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात आघाडी घेईल तो देश अग्रेसर राहील.

मित्रहो,

येत्या काही वर्षात  भारताचे अंतराळ उद्योग क्षेत्र 8 अब्ज डॉलर्स वरून 16 अब्ज डॉलर्स होईल, असे मत, मोठ-मोठे तज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारही अंतराळ क्षेत्रात सातत्याने सुधारणा करत आहे. आपले युवाही यासाठी सज्ज आहेत. अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट अप्सची संख्या गेल्या चार वर्षात वाढून 4 वरून सुमारे दीडशे झाली आहे, हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल. अनंत आकाशात  किती अगणित संधी भारताची प्रतीक्षा करत आहेत याची कल्पना आपण करू शकता. काही दिवसानंतर 1 सप्टेंबरपासून MyGov आपल्या चांद्रयान मिशन संदर्भात मोठी प्रश्नमंजुषा आयोजित करणार आहे. आपल्या देशातले विद्यार्थी यापासुनही सुरवात करू शकतात. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मी देशभरातल्या विद्यार्थ्यांना  करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

देशाच्या भावी पिढीला आपल्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. आपण ज्या अतिशय महत्वाच्या मिशनवर काम करत आहात, ते मिशन पुढे नेण्याचे काम भावी पिढीच करणार आहे. आपण त्या सर्वांचे आदर्श आहात. आपले संशोधन, आपली इतक्या वर्षांची तपस्या, मेहनतीने हे सिद्ध केले आहे की आपण एखाद्या गोष्टीचा निर्धार केला की ती गोष्ट नक्कीच साध्य करता. देशातल्या जनतेचा आपल्यावर विश्वास आहे आणि विश्वास संपादन करणे ही काही छोटी गोष्ट नाही मित्रांनो. आपल्या तपस्येतून आपण हा विश्वास कमावला आहे. देशातल्या जनतेचा आपणावर आशीर्वाद आहे. या आशीर्वादाच्या बळावर, देशाप्रती या समर्पणाच्या भावनेने भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर अग्रगण्य स्थान प्राप्त करेल. नवोन्मेषाची हीच भावना 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करेल, हे मी विश्वासाने आपल्याला सांगू इच्छितो. आपणा सर्वाना भेटून मला धन्यता वाटली. देशवासियांनाही अतिशय अभिमान वाटत आहे. स्वप्ने अतिशय वेगाने संकल्पांचे रूप घेत आहेत आणि आपले परिश्रम ते संकल्प वास्तवात साकारण्यासाठी मोठी प्रेरणा ठरत आहेत. आपल्याला कितीही शुभेच्छा दिल्या, आपले कितीही अभिनंदन केले तरी ते अपुरेच ठरेल. माझ्याकडून, कोट्यवधी देशवासियांकडून, जगभरातल्या वैज्ञानिक समुदायाकडून खूप-खूप धन्यवाद, खूप-खूप शुभेच्छा !

भारत माता की -जय

भारत माता की -जय

भारत माता की -जय

धन्यवाद !

अस्वीकरण: पंतप्रधानांच्या भाषणाचे हे अंदाजे भाषांतर आहे. मूळ भाषण हिंदीत करण्यात आले होते. 

***

AshishSangle/TusharPawar/NilimaChitale/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2205011) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam