वेव्हज फिल्म बाजार 2025 चा विक्रमी आंतरराष्ट्रीय सहभागासह समारोप
1050 कोटी रुपयांहून अधिकच्या व्यावसायिक प्रस्तावांसह, धोरणात्मक सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत, आयोजित करण्यात आलेल्या वेव्हज फिल्म बाजार 2025 चा आज उत्साहपूर्ण समारोप झाला. चित्रपट निर्मिती, सहकार्य आणि या क्षेत्राशी संबंधित बाजारपेठेचा विस्तार यासाठी भारत एक उदयोन्मुख जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण करत असल्याचे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या उपक्रमाच्या यावर्षीच्या आवृत्तीला अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय सहभाग लाभला, ऐतिहासिक भागीदारी स्थापित झाल्या आणि आशय निर्माते, वितरक तसेच या क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यावसायिकांसाठी असंख्य संधीही उपलब्ध झाल्या.

अभूतपूर्व जागतिक सहभाग
यावर्षीच्या या पाच दिवसीय बाजारात, 40 हून अधिक देशांतील 2,500 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला, आणि हा उपक्रम दक्षिण आशियातील अशा प्रकारच्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय आयोजनांपैकी एक ठरला. सादरीकरणे पाहण्यासाठीचे दालन, सह निर्मितीसाठीचा बाजार, पटकथा लेखकांची प्रयोगशाळा आणि या बाजारपेठेसाठीचे विशेष खेळ, अशा विविध उपक्रमांमध्ये 15 हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण 320 प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले. या सहभागातून भारताच्या आशय सामग्री व्यवस्थेमधील जगाचे मजबूत स्वारस्य दिसून आले.
मोठ्या प्रमाणातील व्यावसायिक व्यवहार आणि बाजारपेठेवरील प्रभाव
वेव्हज फिल्म बाजार 2025 ने परस्पर संपर्काचे जाळे, सहकार्य आणि करार करण्यासाठी एक बहुआयामी वातावरण उपलब्ध करून दिले होते:
- जगभरातील 220 हून अधिक खरेदीदारांसोबत बंद दाराआड 1200 हून अधिक प्रत्यक्ष (वन-टू-वन) व्यवसाय विषयक बैठका झाल्या.
- विविध बाजार विभागांमध्ये शेकडो खुल्या बैठका घेण्यात आल्या.
- 1050 कोटी रुपयांच्या महत्त्वाचे व्यावसायिक प्रस्ताव मांडले गेले आणि वाटाघाटी झाल्या, यातून जागतिक भागीदारी साकारण्याच्या प्रक्रियेतील या व्यासपीठाचा वाढता प्रभाव दिसून आला.
- विविध प्रकल्पांशी संबंधित बंद दाराआड झालेल्या 320 हून अधिक प्रस्तावांचे मूल्य 750 कोटी रुपयांहून अधिक होते.
- खुल्या बैठकांमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी 200 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या प्रकल्पांवर चर्चा केली.
- या उपक्रमांतर्गत प्रत्यक्षात 100 कोटी रुपयांचे सामंजस्य करारही करण्यात आले.
- वेव्हज फिल्म बाजार 2025 मध्ये ऑस्ट्रेलियातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासोबतच्या चार महत्त्वाच्या सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आल्या. ही एक ऐतिहासिक घडामोड ठरली. या करारामुळे शिक्षण, वितरण, प्रतिभेचा विकास आणि महोत्सव विषयक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार घडून आला आहे. या करारांअंतर्गत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न यांच्यातील सामंजस्य करार, तसेच डीकिन युनिव्हर्सिटी, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (पुणे) तसेच भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्था (मुंबई) यांच्यातील सामंजस्य करारांचा समावेश आहे.
- वेव्हज फिल्म बाजार 2025 अंतर्गत उच्च-स्तरीय जी टू जी आणि दूतावास ते दूतावास अशा बैठकांचे आयोजनही केले गेले. या माध्यमातून हे व्यासपीठ दृढ आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठीचे एक कारक घटक ठरले. याअंतर्गत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्पेन, फिनलंड, रशिया, ब्रिटन आणि न्यूझीलंडच्या शिष्टमंडळांचा समावेश होता.
या सर्व घडामोडींमुळे वेव्हज फिल्म बाजार हा दक्षिण आशियातील सर्वात प्रभावशाली चित्रपट बाजार म्हणून उदयाला आल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले. परिणामी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथात्मक मांडणीकार, निर्माते-दिग्दर्शक, वितरक आणि गुंतवणूकदारांसाठी असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील परस्पर सहकार्याला बळ : चार मोठे सामंजस्य करार
वेव्हज फिल्म बाजार 2025 मध्ये ऑस्ट्रेलियातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासोबतच्या चार महत्त्वाच्या सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आल्या. ही एक ऐतिहासिक घडामोड ठरली. या करारामुळे शिक्षण, वितरण, प्रतिभेचा विकास आणि महोत्सव विषयक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार घडून आला आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एनएफडीसी आणि मेलबर्न येथील भारतीय चित्रपट महोत्सव यांच्यातील सामंजस्य करार
महोत्सव देवाणघेवाण, उत्पादक प्रयोगशाळा आणि नवीन वेव्हज बाजार-आयएफएफएम सह-वितरण निधीद्वारे भारत-ऑस्ट्रेलियन सिनेनाते मजबूत करण्यासाठी तीन वर्षांची धोरणात्मक भागीदारी. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमध्ये क्युरेटेड स्क्रीनिंग, प्रीमियर, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सर्जनशील प्रकल्पांच्या संयुक्त प्रोत्साहनाला चालना मिळेल.
- डीकिन विद्यापीठ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय, पुणे) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी. मुंबई) यांच्यातील सामंजस्य करार: चित्रपट निर्माते आणि अॅनिमेटर्सच्या पुढील पिढीचे संगोपन करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रम भागीदारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आदानप्रदान, विशेष कार्यशाळा आणि सहयोगी शिक्षण मार्गांद्वारे चित्रपट शिक्षण वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणारी एक शैक्षणिक युती
- पीव्हीआर आयनॉक्स आणि माइंड ब्लोइंग फिल्म्स, ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामंजस्य करार: देशातील सर्वात मोठ्या सिनेमा साखळीद्वारे ऑस्ट्रेलियन चित्रपटांचे देशभरात सातत्यपूर्ण प्रदर्शन करण्यास सक्षम करणारी वितरण-केंद्रित भागीदारी. या करारामुळे दरवर्षी 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील कथाकारांसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल.
- पीटीसी पंजाबी आणि टेंपल फिल्म प्रोडक्शन कंपनी, ऑस्ट्रेलिया यांच्यात सामंजस्य करार: पीटीसी पंजाबीने ऑस्ट्रेलिया-भारत सह-निर्मिती करारांतर्गत पंजाबी भाषेतील तीन चित्रपट सह-प्रस्तुत करण्यासाठी ऑस्ट्रेलियन निर्मिती कंपनी टेंपलसोबत भागीदारी केली आहे. प्रकल्पांचे अंदाजे मूल्यांकन 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
इतर आंतरराष्ट्रीय महोत्सवांसोबत मजबूत सहकार्य
वेव्हज फिल्म बाजार 2025 हे प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले. एका महत्त्वपूर्ण घडामोडीत रेनडान्स फिल्म फेस्टिव्हल (यूके), ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हल लिस्बोआ आणि बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (दक्षिण कोरिया) यांनी आपल्या आगामी आवृत्त्यांमध्ये भारताची 'फोकस कंट्री' म्हणून गणना करण्यास स्वारस्य दर्शविले आहे.
वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियनने इफ्फी 2025 मध्ये 14 क्रिएटिव्ह-टेक इनोव्हेटर्सचे प्रदर्शन केले.
वेव्हएक्स स्टार्टअप पॅव्हेलियनने वेव्हज फिल्म बाजार येथे क्रिएटिव्ह, मीडिया आणि मनोरंजन-तंत्रज्ञान क्षेत्रातील 14 उदयोन्मुख स्टार्टअप्सना सहभागी करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला.

या सहभागामुळे WaveX स्टार्टअप्सना हे करता आले:
- जागतिक प्रेक्षकांसमोर आपली उत्पादने आणि आयपी सादर करणे
- बिझनेस टू बिझनेस नेटवर्किंग आणि धोरणात्मक कॉर्पोरेट बैठकांमध्ये सहभागी होणे
- ओटीटी, उत्पादन संस्था आणि वितरकांसह भागीदारीचा वेध घेणे
- सर्जनशील अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्याप्ती मिळवणे

इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/तुषार पवार/नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2195606
| Visitor Counter:
13